नाट्यसमीक्षण
जातीभेदावर भाष्य करणारे नाटक "कन्यादान"
नगर : 63 व्या राज्य नाट्य स्पर्धेत अहिल्यानगरच्या नाट्य आराधना या संघाने जातीभेतांवर भाष्य करणार कन्यादान हे नाटक सादर केलं विजय तेंडुलकर लिखित या नाट्यसंहितेचे दिग्दर्शन अनंत जोशी यांनी केलं.
समाजातील जातीभेद नष्ट व्हावा यासाठी अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले. जातिभेदाच्या भिंती पडाव्यात यासाठी अनेकांनी आंतरजातीय विवाहांनाही प्रोत्साहित केलं.
समाजवादी विचारसरणीचे आमदार नाथ देवळालीकर आणि सामाजिक कार्यकर्ती असलेली त्यांची पत्नी सेवा हे दोघेही आपापल्या कामात अत्यंत व्यस्त असतात. मुलगी ज्योती आणि मुलगा जयप्रकाश अशा चौकोनी पुरोगामी विचारसरणीच्या कुटुंबात आ. नाथ देवळालीकर विधानसभेच्या कामकाजासाठी मुंबईला जायच्या तयारीत असतात, तर पत्नी सेवा ही महिला विषयक परिसंवादाला व्याख्याती म्हणून गेलेली असते. मुलगी ज्योती ही आमदार देवळालीकरांना मला तुमच्याशी आणि आईशी बोलायचं आहे ,असं सांगते . तेव्हा गाडीला वेळ असल्याने आणि पत्नी सेवा ही काही वेळात येणार असल्याने ते तिला होकार देतात. इतक्यात त्यांची पत्नी सेवा घरी येते. तेव्हा ज्योती दोन महिन्यापूर्वीच ओळख झालेल्या अरुण आठवले बरोबर तिने लग्न जमवलं असल्याचे सांगते. तेव्हा सेवा अरुण आठवले म्हणजे ब्राह्मण का असे विचारते. त्यावर ज्योती म्हणते नाही तो दलित आहे . तुमच्या वेळेनुसार मी तुमची आणि त्याची भेट घडवून आणेन असेही सांगते. त्यावेळी ज्योती अरुणच्या कवितांनी आणि तो लिहीत असलेल्या आत्मचरित्राने प्रभावित झालेली असते.
एक दिवस ज्योती अरुणला त्याच्या घरी बोलवते, त्यावेळी घरी कोणीच नसते त्यांचे प्रशस्त घर पाहून अरुण त्याच्या घराची तुलना करून लग्नासाठी आडवेढे घेण्याचा प्रयत्नात असतो. त्या दोघांच्या संभाषणानंतर अरुण ज्योतीचा हात पिरगाळतो , इतक्यात जयप्रकाश आणि सेवा तिथे प्रवेशतात. त्या घडल्या प्रसंगा नंतर काही वेळाने नाथ देवळालीकर येतात. त्याचवेळी अरुण आठवले काम असल्याचे सांगून तेथून निघून जातो. त्यानंतर त्या चौघांमध्ये ज्योतीच्या लग्नाबद्दलची चर्चा होते. जयप्रकाश आणि सेवा अरुणच्या आणि ज्योतीच्या लग्नाविषयी नापसंती व्यक्त करतात. तेव्हा नाथ देवळालीकर मात्र सेवा आणि जयप्रकाशचा विरोध पत्करून ज्योतीला लग्नाची परवानगी देतात.
लग्नानंतर पुण्यात स्वतःचे घर नसल्याने अरुण आणि ज्योती सतत जागा बदलत असतात. त्यावेळी नाथ देवळालीकर त्यांना आपल्या घरी येऊन राहण्याचा प्रस्ताव देतात, मात्र ज्योती त्याला ठाम नकार देते. मात्र एकेदिवशी अरुण ज्योतीला मारहाण करत असल्याने ज्योती अरुण कडे परत न जाण्याचा निर्णय घेऊन घरी येते. मात्र यावेळी नाथ देवळालीकर तिची समजूत घालतात . इतक्यात अरुण स्वतः तिथे येतो आणि ज्योतीची माफी मागतो ज्योती पुन्हा त्याच्याबरोबर जाते.
एक दिवस सेवा ज्योतीच्या घरी जाते. त्यावेळी ज्योती सहा महिन्यांची गरोदर असते. तिला त्रास होत असतो म्हणून सेवा तिला तिच्या मैत्रिणीच्या दवाखान्यात घेऊन जाते. त्याचवेळी अरुण रोज दारू पिऊन ज्योतीला मारहाण करत असल्याबद्दल ची माहिती सेवाला मिळते. आणि अरुण ज्योतीच्या आई-वडिलांबद्दल काही -बाही बोलून शिवीगाळ करत असल्याचे कळते . तेव्हा या लग्नाला परवानगी दिल्याबद्दल नाथ देवळालीकर यांनाही पश्चाताप होत असतो.
एक दिवस अरुण हंबीरराव कांबळे आणि वामनराव नेऊरगावकर या दोघांना घेऊन देवळालीकरांकडे येतो. माझ्या आत्मचरित्रावर चर्चासत्र ठेवले असून त्याचे अध्यक्ष म्हणून तुमचे नाव छापले आहे असे सांगतो. तेव्हा नाथ देवळालीकर माझ्या परवानगी शिवाय असं विचारतात आणि अध्यक्षपद स्वीकारायला नकार देतात. नंतर सेवा नाथ देवळालीकरांना तुम्ही चर्चासत्राला गेला नाहीत तर ज्योतीचा आणखीन छळ सुरू होईल असे सांगून चर्चासत्राला जाण्याविषयी गळ घालते. नाथ देवळालीकर चर्चासत्राला जातात आणि अरुणच्या आत्मचरित्राची खोटी प्रशंसा करतात. त्यांचे भाषण ऐकून ज्योती घरी येऊन वडिलांना तुम्हीच आमच्यावर जातीभेद नष्ट करण्याचे विचार बिंबवले ,त्याच्यामुळेच आता पुढची लढाई मलाच लढावी लागणार आहे असे म्हणून निघून जाते.
पश्चात्तापदग्ध नाथ देवळालीकर आपल्या स्वगतात आपल्या विचारांनी प्रेरित होऊन अनेकांनी जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या वाट्याला हे दुःख आले त्याबद्दल मी त्यांचा गुन्हेगार आहे असं म्हणत स्वतःच्याच कृतीला दोष देतात इथेच पडदा पडतो.
नाथ देवळालीकर यांच्या भूमिकेत श्रेणिक शिंगवे यांनी अत्यंत संयत अभिनय करून बापाची भूमिका उत्तम रित्या निभावली. तर सेवा देवळालीकर च्या भूमिकेत तेजा पाठक यांनी आणि जयप्रकाश देवळालीकर च्या भूमिकेत मोहित मेहेर यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडल्या. ज्योती देवळालीकरच्या भूमिकेत सिद्धी कुलकर्णी हिने ज्योती आणि आठवलेच्या पिडीत पत्नीची भूमिका सशक्तपणे निभावली. अरुण आठवलेच्या भूमिकेत तेजा अतीतकर प्रभावी वाटले. तर वामनराव नेऊरगावकर च्या भूमिकेत प्रसाद भणगे आणि हंबीरराव कांबळे यांच्या भूमिकेत अनंत रिसे ठीक वाटले.
नाटकाचे नेपथ्य अनंत रिसे यांनी कथेला साजेसे केलं होतं. तर गणेश लिमकर यांची प्रकाश योजना आणि शितल देशमुख यांचे संगीत आणि मैथिली जोशी यांची वेशभूषा कथेला पूरक अशीच होती. दुसऱ्या अंकातील खंगलेल्या ज्योतीची रंगभूषा चंद्रकांत सैंदाणे यांनी वाखाणण्याजोगी केली.प्रयोग सुरू असताना दोन वेळा विद्युत प्रवाह खंडित झाला. त्यामुळे प्रेक्षकांचा काहीसा रसभंग झाला. तर काही प्रसंगात अरुणच्या ऐवजी प्रकाश असा उल्लेख झाल्याचेही प्रेक्षकांच्या नजरेतून सुटले नाही. या काहीच त्रुटी वगळता नाट्य प्रयोगाचे सादरीकरण उत्तम होते.
0 Comments