'उत्तम कर्म' हेच 'मर्म' सांगणारं देखणं नाटक !

 नाट्य समीक्षण 

'उत्तम कर्म' हेच मानवतेचं 'मर्म'  सांगणारं  देखणं नाटक !



नगर : 63 व्या राज्य नाट्य स्पर्धेत रंगमुद्रा युवा प्रतिष्ठान, वडगाव गुप्ता या संघाचे  दोन अंकी नाटक 'मर्म' चे  देखणं सादरीकरण केलं.  प्राध्यापक रवींद्र काळे लिखित संहितेचं दिग्दर्शन रियाज पठाण आणि प्रा. रवींद्र काळे यांनी केलं होतं . 

पडदा उघडतो तसं मानव नावाच्या पात्राचं स्वागत सुरू होतं.  महाभारतातील एका प्रसंगावर आधारित  स्वागताचा आशय मनुष्याची सत्कर्म हीच मानवता धर्म सांगणारी असतात असा .....  

मूळचाच मनस्वी  प्रवृत्तीचा मानव ने आपल्या प्राध्यापक पदाचा  राजीनामा दिलेला असतो.  त्याच्या शिफारशीमुळेच गगनला प्राध्यापकाची नोकरी मिळालेली असते,आणि भूमी ही मानवची विद्यार्थिनी , तिच्यावरही मानवच्या विचारांचा पगडा असतो.  त्यांना मानव बद्दल अपार आदर असल्याने मानव बद्दल समाजातून उमटणाऱ्या उलट सुलट प्रतिक्रियाबद्दलही राग असतो.  मानव वेश्यावस्तीत  जाऊन त्यांच्या जागृतीचं कार्य करत असतो.  त्याच्या या  वेश्यावस्तीत जाण्याबद्दल  लोकांमध्ये अनेक गैरसमज असतात.  तरीही या सर्व बाबीतूनही मानव आपले काम चोख बजावत असतो. 

 

एकदा गावाहून  घरी येताना रस्तातील  झाडाझुडपातुन काही संवाद त्याच्या कानी पडतात.  दुसऱ्या दिवशी काही नराधमांनी एका मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस येते.  पुन्हा याच रस्त्याने जाताना मानवाच्या कानावर पहिल्यासारखाच संवाद कानी पडतो, त्या आवाजावरून तो त्या गुन्हेगारांना शोधून पोलिसांच्या हवाली करतो.  इथूनच जॉन ,बशीर आणि रंगा यांनी माणुसकी नावाच्या मुलीवर अत्याचार केल्याचे उघड होते.  तसे त्या तिघांचे पाठीराखे मानववर केस मागे घेण्या विषयी दबाव आणतात. मात्र त्या दबावाला न जुमानता मानव त्या लढ्यात खंबीरपणे उभा राहतो दबाव आणणाऱ्यांना मानव, कुठलाच धर्म अपप्रवृत्तींना खत पाणी घालत नाही.  आणि कुठल्याच धर्मांने  इतरांवर अत्याचार करा असं सांगितलेलं नाही.  प्रत्येक धर्माने मानवतेचाच  संदेश दिला आहे.  असे सांगून या प्रकरणाचा कायदेशीर पाठपुरावा करतो. यात  त्याचा वकील मित्र सन्मित्र त्याला मदत करत असतो. 

            तरुणपणी मानव अनुशीला नावाच्या मुलीवर प्रेम करत असतो. ते एकमेकांशी विवाह करण्याचाही विचार करत असतात.  एकदिवस  अनुशीला च्या वडिलांना हृदयविकाराचा झटका येतो.  मानव काही कारणाने बाहेर गावी गेलेला असल्याने त्याची काहीही मदत अनुशीलाला होत नाही .  एक रुबाबदार डॉक्टर अनुशीलाच्या वडिलांना या झटक्यातून सावरतो.  या प्रसंगात त्या डॉक्टरने केलेल्या मदतीमुळे अनुशिलेच्या घरच्यांना त्या डॉक्टरचा प्रचंड आधार वाटतो.   ते अनुशीलेच लग्न त्या डॉक्टर बरोबर करून देतात . मानव परत आल्यावर त्याला ही गोष्ट कळते आणि तो स्वतःला अनुशीलेपासून दूर करतो.  

दरम्यानच्या काळात मानववर काही जीवघे हल्लेही होतात.  आणि अखेर माणुसकी वरील अत्याचाराचा प्रकरणाचा निकाल लागतो.  यावेळी माणुसकी आणि तिचे वडील येऊन मानवचे  आभार मानतात.  त्याच दिवशी सन्मित्र प्राध्यापक गगन,भूमी येऊन मानवचे अभिनंदन करून मानवने मानवतावादातून दिलेल्या लढयाचे कौतुक करतात.  आणि इथेच पडदा पडतो 

 मानवची भूमिका लेखक दिग्दर्शक प्रा.  रवींद्र काळे यांनी अत्यंत समरसतेने वठवली .  त्यांची स्वगतं आणि पल्लेदार संवादफेक  यामुळे भूमिकेला विशेष उठाव मिळाला .  तर वकील सन्मित्रची भूमिका दिग्दर्शक रियाज पठाण यांनी अत्यंत प्रगल्भतेतून पेलल्याने त्यांनी या भूमिकेला न्याय दिला.  प्रा. गगन (ऍड.  माधव भारदे )आणि भूमी (शुभदा पटवर्धन) यांनी त्यांच्या भूमिका चांगल्या पेलल्या, माणुसकीच्या छोट्या भूमिकेत (हर्षदा वाघमारे) यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर ठसा उमटविला.  वडिलांच्या भूमिकेतील राजकुमार मोरे यांची त्यांची भूमिका चांगली वाटली मात्र, त्यांची वेशभूषा भूमिकेला साजेशी नव्हती.  रॉबर्ट (जयदेव हेंद्रे) अब्बास ( मंगेश शिदोरे) तर रघु( महेश काळे) यांनी आपापल्या भूमिका चोख  बजावल्या.  कथानकाला साजेस नेपथ्य उमेश गोसावी व परवीन  पठाण यांनी उभारले होते.  तर गणेश लिमकर यांनी प्रकाश योजना  चांगली होती.  मात्र त्यात प्रयोगशीलतेला वाव होता.  वेदश्री देशमुख आणि आदेश चव्हाण यांचे संगीतही चांगले होते.  अविनाश डोंगरे आणि बाबासाहेब डोंगरे यांनी केलेल्या वेशभूषा ठीक वाटल्या मात्र त्यातही आणखीन प्रयोगशीलतेला वाव  होता.  एक-दोन प्रसंगात मानवच्या भूमिकेतील शिवतांडवाचा श्लोक म्हणताना काढलेल्या स्टेजवरतश्याच  राहिल्या आणि पुढच्या प्रवेशात मानव बूट घालून आला.  अशा किरकोळ चुका सोडल्यास नाटकाचा देखणा प्रयोग सादर करण्यात कलाकार व तंत्रज्ञान यशस्वी झाले.,

Post a Comment

0 Comments