मौलाना आझाद व्याख्यानमाला पहिले पुष्प
मौलाना आझाद यांनी शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून अंमलात आणले - प्रा.डॉ.महेबुब सय्यद
नगर: भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांनी देशाची शैक्षणिक प्रगती व तरुणांना प्रशिक्षणाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी शैक्षणिक धोरण आखले. शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून त्यांनी अंमलात आणले. व त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होऊन शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुली झाली. त्यामुळे शिक्षण विस्ताराचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, शिक्षणाचे महत्व विशद करतांना संसदेत मौलाना आझाद म्हणाले होते की, देशाचे अंदाजपत्रकात शिक्षणाला महत्वाचे स्थान देणे गरजेचे आहे.
अन्न, वस्त्रानंतर शिक्षणाचा क्रम लावला पाहिजे. त्यांचे असे मत होते की, देशाच्या पंचवार्षिक योजनेचा हेतू केवळ शेती, उद्योग, वीज, दळणवळणाची साधने यांची प्रगती एवढाच असू नये तर देशाच्या नवीन पिढीची जडण घडण योग्य प्रकारे होण्यासाठी शिक्षणाकडेही तेवढेच लक्ष दिले पाहिजे. म्हणूनच सुरुवातीच्या काळात देशाचे शैक्षणिक बजेट दोन कोटीचे होते. ते 1958 साली 30 कोटींचे झाले. शैक्षणिक विकासासाठी त्यांनी ठोस पाऊले उचचली. अनेक नविन शैक्षणिक संस्था निर्माण करुन विकसित केल्या.
1923 साली अवघ्या 35 व्या वर्षी ते काँग्रेस पक्षाचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले. धारासना सत्याग्रहाचे ते प्रमुख क्रांतीकारक होते. पुढे 1940-45 या काळात सलग सहा वर्षे ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहिले. त्यांच्याच काळात 1942 चे अंग्रेजो भारत छोडो ही चळवळ उभी राहिली. स्वातंत्र्यासाठी एकूण साडे सात वर्षे त्यांनी कारावास भोगला. स्वातंत्र्य लढ्यात सर्वाधिक काळ कारावास भोगण्याचा उच्चांक त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या आयुष्यातील सरासरी आठवड्यातील एक दिवस कारावासात गेला आहे. असे नमूद केले.
मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त मखदुम सोसायटीच्यावतीने आयोजित कौमी एकता सप्ताह मध्ये मुकुंदनगर येथील मौलाना आझाद उर्दु मुलींचे हायस्कुल मध्ये डॉ.महेबुब सय्यद यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा डॉ अब्दुस सलाम सर, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, सचिव डॉ कमर सुरुर, संचालक राजुभाई शेख, डॉ शमा फारुकी, प्राचार्या फरहाना सय्यद, हसीब शेख, फरीदा जहागिरदार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ कमर सुरुर यांनी तर सूत्रसंचालन अंजुम खान यांनी केले. आभार यास्मिन शेख यांनी मानले.
0 Comments