भूमिपुत्रांच्या यशात गावाचाही महत्वाचा वाटा
प्रा.डॉ.आर.के.आहेर : पिंपळगाव रोठा येथे माजी विद्यार्थी संघ व ग्रामस्थांच्या वतीने भूमिपुत्रांचा सन्मान
नगर - लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री कोरठण खंडोबा देवस्थान पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा माजी विद्यार्थी संघ व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने गावातील नवयुवकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे यासाठी गावातील विविध क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केलेल्या युवकांचा सन्मान सोहळा दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर संपन्न झाला.
या सोहळ्यात गावातील शिक्षण,वैद्यकीय,कृषी,व्यवसाय,नोकरी,क्रीडा,संगीत इत्यादी क्षेत्रात यश संपादन केलेल्या गावातील 23 युवकांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री ढोकेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर गावातील माजी सैनिक मथा घुले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिक्षण विस्तार अधिकारी संभाजी झावरे यांची आवर्जून उपस्थिती लाभली.
यश मिळविण्यासाठी शिक्षणाचे महत्व, तसेच आपल्या यशात सर्वप्रथम आपल्या पाठीशी आपला गाव प्रथम उभा राहतो, त्यावेळी तो क्षण युवकांना अधिक प्रेरणादायी आहे. तसेच भूमिपुत्रांनी मिळवलेल्या यशात गावाचा ही महत्वाचा वाटा असतो. गावाची कौतुकाची थाप या प्रेरणासोहळ्याचे रुपाने त्यांना प्रेरित करत असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ.आर.के.आहेर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. व सन्मान सोहळा हा जय जवान, जय किसान, जय विज्ञान या नार्याला अनुसरून असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात माजी सैनिक मथा घुले म्हणाले की, गावातील प्रत्येक युवकाने निर्धार करून मेहनत आणि कष्टाच्या बळावर यशाचे पदक घेऊन गावभूमीत आल्यास गावाला अभिमान वाटेल असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमात गावातील संरक्षण दल, सागरी दल, अग्निशामक दल, महाराष्ट्र पोलिस दल, भारतीय सेना दल अशा विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या विद्यमान तसेच सेवानिवृत्त अश्या एकुण 23 जवानांचाही सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. आदर्श गोपालक म्हणून सुजीत लोळगे आणि परिवार यांच्या वतीने दिला जाणारा वत्सला पुरस्कार 2024 गावातील तरुण सत्यवान बाळासाहेब घोडके व परिवाराला देऊन सन्मानित केले. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये 3069/-, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम सुंबरे, सूत्रसंचालन राजाराम शिंदे, राजाराम मुंढे यांनी केले तर जिजाभाऊ घुले यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन समितीतील संतोष जाधव (भारतीय आर्युविमा प्रतिनिधी), वसंत जगताप, सुरेश घुले, शमशुद्दीन हवालदार, खंडु फापाळे, बाळासाहेब मुंढे, वसंत पुंडे, शहाजी शिंदे, यांनी आपले मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती लाभली.
0 Comments