सनातन धर्मसभेच्या शारदीय व्याख्यानमालेचा उत्साहात शुभारंभ
सर्वत्र व्यापलेल्या जगदंबेच्या स्वरूपाला जाणणे महत्वाचे - वैद्य अनिकेत घोटणकर
नगर - सनातन धर्मसभेने महाजन गल्लीमधील गायत्री मंदिरात आयोजित केलेल्या शारदीय व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. व्याख्यानमालेचा शुभारंभ सरस्वती देवीच्या प्रतिमा पूजनाने विधीवत करण्यात आले. पौरोहित्य वेदमूर्ती चकोर मुळे आणि वेदमूर्ती निलेश धर्माधिकारी यांनी केले. व्याख्यानमालेच्या संयोजिका प्रा.डाॅ.प्रभाताई मुळे यांनी स्वागत केले. सनातन धर्मसभेचे अध्यक्ष वेदमूर्ती दत्तोपंत पाठक गुरूजी यांनी प्रास्तविक करताना धर्मसभेच्या स्थापनेपासूनचा नेमकेपणाने आढावा घेतला.
वैद्य घोटणकर पुढे म्हणाले, आपल्या अवती-भवती निर्माण झालेली सकल सृष्टी आणि सर्व जीव अर्थात उत्पत्ती हे जगदंबेचेच रूप आहे. त्या रूपाला जाणले तर व्यवहारातील सर्व कार्य आणि परमार्थातील मुक्तीपर्यंतची स्थिती सहज प्राप्त होऊ शकते. आपण सकारात्मक राहिले पाहिजे. आपल्या चिंतनात आपली दैनंदिनी आली पाहिजे. चित्तशुध्द सत्कर्माने होते. आपण ज्या कुळात जन्मलो त्या कुळाच्या कुलदेवतेची उपासना जाणून-बुजून विचारपूर्वक करावी. वेद-पुराण वाचायला वेळ नाही. वाचले तरी चिंतनास वेळ नाही. महाभारतात जे घडले तेच आज घडते आहे. बाह्यरूपे वेगळी आहेत. अवघ्या सृष्टीतील यंत्रणा शक्तिरूपाने केंद्रित केली आहे. सृष्टीतील भगवतीला कसे बघायचे? याविषयीचे चिंतन ज्ञानेश्वर माऊलींच्या अमृतानुभवामध्ये पहायला मिळते. हे चिंतन परमात्म्याकडे आपण जावे म्हणून प्रेरणा देते. याकरिता करावयाच्या नामस्मरणातील नामा पलिकडेच परमात्मा कसा अनुभवायचा हे वैद्य घोटणकर यांनी सांगितले.
श्री क्षेत्र सोनई येथील प.पू. हरिहरानंदनाथ महाराजांचा आवडता अभंग, "अंबा विष्णू एकचि आहे | मना तूचि शोधूनी पाहे ||" हा निरूपणासाठी घेऊन वैद्य घोटणकर यांनी मांडलेले चिंतन उपस्थितांना चांगलेच भावले, असे सनातन धर्मसभेचे खजिनदार ह.भ.प. निळकंठराव देशमुख यांनी आभार मानताना सांगितले.
धर्मसभेचे मंत्री दिनकर देशमुख, विश्वस्त राजेंद्र नगरकर, समीर उपाध्ये, मोरेश्वर मुळे, व्यवस्थापक अनंतराव देशपांडे, गणेश वैकर यांचेसह श्रोतृवृंद उपस्थित होता.
0 Comments