दीडशे कोटींची रस्त्यांची कामे सुरू केल्याच त्यांनी नगरकरांना खोटं सांगितलं

 दीडशे कोटींची रस्त्यांची कामे सुरू केल्याच त्यांनी नगरकरांना खोटं सांगितलं


 किरण काळेंचा घाणाघात : लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी कोट्यावधी रुपये आणले कुठून ? आमच्या बहिणी हुशार, त्यांना कोणी वेड्यात काढू शकत नाही 

नगर  : शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून ती केली जात आहेत. दीडशे कोटी रुपयांच्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेल्या रस्त्यांच्या कामांची सोशल मीडियाद्वारे लाईव्ह पोलखोल करताना शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. काळे यांनी म्हटले आहे की, दीडशे कोटींची कामे शहरात सुरू असल्याचे चौका चौकात फलक लावले गेले.  फुटा फुटावर उद्घाटनाचे नारळ फोडून फोटोसेशन केले गेले. मात्र प्रत्यक्षात दीडशे कोटींची कामे सुरूच झालेली नाहीत. त्यांनी नगरकरांना धादांत खोटं सांगत धुळफेक केली असल्याचा घाणाघात काळे यांनी केला आहे. 


शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या पं. नेहरू पुतळा ते एमजी रोड, कापड बाजार ते भिंगारवाला चौक ते माळीवाडा वेस या दीडशे कोटी रुपयांमध्ये मंजूर झालेल्या मात्र प्रत्यक्षात काम न झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेवरून काळे यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांवर जोरदार शरसंधान साधले आहे. काळे यांनी यावेळी बोलताना उजेडात आणलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. त्यांनी दावा केला आहे की, दीडशे कोटी रुपयांमध्ये २३ रस्ते आणि १ नाला विकसित करण्याचे काम मंजूर आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ सातच रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. एकूण मंजूर निधी पैकी ७० टक्के म्हणजे १०५ कोटी शासन तर ३० टक्के म्हणजे ४५ कोटी मनपाला स्वतःच्या तिजोरीतून यासाठी खर्च करायचे आहे. मात्र लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनासह मनपाच्या तिजोरीत खडखडाट आहे. आज रोजी केवळ ३२ कोटीच शासनाकडून यासाठी प्राप्त झाले आहेत. तरी देखील दीडशे कोटींची कामे प्रत्यक्षात सुरू केल्याच खोटं सत्ताधारी रेटून बोलत आहेत. 

पीएमसी कशासाठी ?  

मनपाचा स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. तो असताना देखील दीडशे कोटींच्या कामांसाठी स्वतंत्र प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट (पीएमसी) म्हणून एका खाजगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वतःचा विभाग असताना पीएमसी कशासाठी नेमली ? त्यावर लाखो, कोट्यावधी रुपये कशासाठी खर्च केले जात आहेत ? मलिदा लाटण्यासाठीची ही सोय तर केलेली नाही ना, असे अनेक सवाल किरण काळे यांनी केले आहेत. 

उद्घाटनाचा बोर्ड काँक्रिटीकरणाचा, मात्र काम डांबरीकरणाचे 

गोगादेव मंदिराजवळ सत्ताधाऱ्यांनी तेली खुंट अप्पू हत्ती चौक असा काँक्रिटीकरणाच्या उद्घाटनाचा फलक लावला आहे. त्यावर इतिहास घडत आहे, नगरचे भाग्य बदलत आहे, असे घोषवाक्य नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी डांबरीकरणाचा एक थर मारण्यात आला आहे. तो देखील पावसामुळे वाहून गेला आहे. दोन महिन्यांपूर्वी शुभारंभचा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मात्र प्रत्यक्षात अजूनही काम पूर्ण केलेले नाही. हे म्हणजे दिवसाढवळ्या जनतेच्या पैशांवर दरोडा घालत फसवणूक केली जात आहे. अजीर्ण होईपर्यंत शहर लुटून खायचं ही मानसिकता म्हणजे सत्ताधाऱ्यांची शहर गिळंकृत करण्याची विकृती असल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे. 

नियोजन शून्य दर्जाहीन कामे  

विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ऐन पावसाळ्यात कामे सुरू केली गेली आहेत. एकाच वेळी वर्दळीचे असणारे शहरभरातील प्रमुख रस्ते खोदून ठेवले आहेत. मागील दहा वर्ष सत्ताधारी झोपा काढत होते काय ? नोव्हेंबर, डिसेंबर २०२३ पासून जर कामे सुरू केली असती आणि पावसाळ्यापूर्वी टप्प्याटप्प्याने संपवली असती तर नागरिकांची गैरसोय झाली नसती. शासनाचा पावसाळ्यात कामे न करण्याबाबतचा जीआर असताना देखील मनपाने त्याचे उल्लंघन का केले ? दर्जाहीन कामे सुरू असून मंजूर अंदाजपत्रकां मधील नमूद तरतुदीं प्रमाणे ती होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. ७७६ रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. तोच डाव दीडशे कोटींच्या कामात देखील यांचा आहे काय ? दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी, सर्वत्र धुळीचे साम्राज्य यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. पंधरा मिनिटांच्या प्रवासासाठी दीड - दीड तास लागत आहेत. या कामांसाठी एकच ठेकेदार का नेमला ? तो कोणाच्या मर्जीतला आहे ? असे अनेक प्रश्न उपस्थित करत किरण काळे यांनी नागरिकांना गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा सणासुदीच्या काळात सत्ताधाऱ्यांनी वेठीस धरल्याची टीका केली आहे. 

लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी कोट्यावधी रुपये आणले कुठून ?

विश्वास जुना, आम्हीच पुन्हा म्हणत शहरभर लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आमच्या भगिनींसाठी आयोजन केले जात आहे. मागील दहा वर्षात असे कार्यक्रम कधी घेतले गेले नाही. मात्र या माध्यमातून आमच्या बहिणींना बक्षिसांच्या नावाखाली प्रलोभण दाखविण्याचा काहींचा डाव आहे. या कार्यक्रमांमध्ये देखील सेटिंग होत आहे. आपल्याच कार्यकर्त्यांच्या घरात बक्षीसं वाटली जात आहेत. आमच्या लाडक्या बहिणी मात्र हुशार आहेत. त्यांना कोणी वेड्यात काढू शकत नाही. गहू निवडताना ज्या प्रमाणे खडा वेचून त्या बाहेर काढतात, त्याच पद्धतीने गुंडगिरी, ताबेमारी बेरोजगारी, नळाला दररोज स्वच्छ व मुबलक पाणी न येणे, कचरा संकलणासाठी दररोज घंटागाडी न येणे, शिक्षण व रोजगारासाठी शहरातून आपल्या मुलांना शहर सोडून जावे लागणे अशा अनेक कारणांतून शहराची दयनीय अवस्था करणाऱ्या तथाकथित कार्यसम्राटांना त्या खड्या सारख वेचून बाहेर काढतील. शहरातील रस्त्यांच्या कामात निकृष्ट कामे करत कोट्यावधींचा भ्रष्टाचार एका बाजूला सुरू आहे. त्याच भ्रष्टाचाराच्या पैशातून दुसरीकडे असे कार्यक्रम तर केले जात नाहीत ना ? लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी कोट्यावधी रुपये यांनी आणले कुठून ? असा परखड सवाल किरण काळे यांनी उपस्थित केला आहे. काळेंच्या या आरोपांमुळे लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रम संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 

Post a Comment

0 Comments