डोंबिवलीतील सिस्टर निवेदिता शाळा प्रशासनाविरुध्द गुन्हा

डोंबिवलीतील सिस्टर निवेदिता शाळा प्रशासनाविरुध्द गुन्हा

विधानसभा निवडणुकीसाठी कर्मचारी देण्यास दिला होता नकार ; त्यामुळे हा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

 डोंबिवली: आगामी विधानसभा निवडणूक कामासाठी शाळेतील शिक्षक देण्यास महसूल अधिकाऱ्यांना नकार देऊन राष्ट्रीय कर्तव्याच्या कामात कसूर केल्याने डोंबिवली एमआयडीसीतील सिस्टर निवेदिता शाळा प्रशासना विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ प्रमाणे हा गुन्हा दाखल केला आहे.

महसूल विभागाचे डोंबिवली एमआयडीसी परिसराचे तलाठी लक्ष्मण नाना शिंदे यांनी याप्रकरणी उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या आदेशावरून सिस्टर निवेदिता शाळे विरुध्द तक्रार केली आहे. २३ फेब्रुवारी २०२४ ते ५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी सांगितले, लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला कर्मचारी वर्ग लागतो. हा कर्मचारी वर्ग ठाणे जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय, अनुदानित, विना अनुदानित शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून उपलब्ध केला जातो. यामध्ये तांत्रिक महाविद्यालयांचा समावेश असतो. निवडणूक कामासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे काम निवडणूक आयोगाच्या आदेशावरून निवासी उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्या समन्वयातून करतात.

तहसिलदारांच्या आदेशावरून स्थानिक मंडळ अधिकारी, तलाठी आपल्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना त्यांच्या शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचारी वर्ग निवडणूक कामासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करतात. आगामी विधानसभा निवडणूक कामासाठी कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी महसूल विभागाने निवडणूक आयोगाच्या आदेशावरून डोंबिवली, कल्याण परिसरातील शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्याकडे केली होती. इतर शाळांनी कर्मचारी वर्ग निवडणूक आयोगाला उपलब्ध करून दिला. पण, सिस्टर निवेदिता शाळा प्रशासनाने कर्मचारी वर्ग देण्यास नकार दिला. या शाळेने निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार तलाठी लक्ष्मण शिंदे यांनी सांगितले, डोंबिवली, एमआयडीसी, २७ गाव परिसरातील ४९ शाळांनी निवडणूक कामासाठी शिक्षक वर्ग उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याची माहिती महसूल विभागाला दिली. पण, सिस्टर निवेदिता शाळेने महसूल विभागाला पत्र लिहून जुन्या शासकीय आदेशाचा आधार घेऊन अशाप्रकारे निवडणूक कामासाठी कर्मचारी घेण्याची सक्ती करता येणार नाही, असे कळवून निवडणूक कामासाठी शाळेचा कर्मचारी वर्ग देण्यास नकार दिला. त्यामुळे हा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक वर्षानंंतर प्रथमच अशाप्रकारचा गुन्हा कल्याण-डोंबिवली परिसरात दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक राम चोपडे, उपनिरीक्षक भारत ढेंबरे याप्रकरणाचा तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments