छायाचित्रणाचा (फोटोग्राफीचा) रंजक इतिहास
नगर : नुकत्याच पार पडलेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये ब्राझीलचा सर्फिंग स्टार गॅब्रियल मदिना या खेळाडूचे सर्फिंग करतानाचे छायाचित्र जेरोन ब्रायोलेट या छायाचित्रकारांनी टिपले हे ए एफ पी न्यूज एजन्सी चे छायाचित्रकार आहेत. त्यांनी टिपलेल्या छायाचित्राला समाजमाध्यमातून अवघ्या दोन दिवसात सहा कोटी लाईक्स मिळाल्या टाइम्स मॅक्झिन या नियतकालिकानेदेखील जेरोम ब्रायोलेट यांच्या छायाचित्राचे कौतुक 2024 मधील टिपलेले उत्तम छायाचित्र असे केलेआहे .
19 ऑगस्ट 1837 साली फ्रेंच सायन्स अकादमीने फोटोग्राफी या कलातंत्राला मान्यता दिली. त्यानंतर दहा दिवसात फ्रेंच सरकारने नाविन्यपूर्ण पेटंट मिळवत हे तंत्र कॉपीराईट शिवाय वापरण्यासाठी अखिल जगाला भेट म्हणून दिले. तिथून पुढे फोटोग्राफी हे तंत्र जगभरात प्रसार पावले. फोटोग्राफीचा हा 187 वर्षांचा प्रवास तितकाच रंजक आहे.
सुरुवातीच्या काळात पिनहोल कॅमेऱ्या पासून सुरु झालेलं हे तंत्र आता मिररलेस कॅमेरा पर्यंत येऊन थांबलेले दिसत आहे . 1816 मध्ये जोसेफ निसेफर निप्स याने पिनहोल ऑबस्क्यूरा कॅमेरा चा शोध लावला असे आपण वाचतो. मात्र त्यापूर्वीपासून हजारो वर्षापासून पीनहोल कॅमेराचे तंत्र भारतातील ऋषीमुनींना अवगत असल्याची साक्ष कर्नाटकातील हम्पी मध्ये असलेल्या विरुपाक्ष मंदिरातील पिनहोल कॅमेरा देतो.
पिनहोल कॅमेरा म्हणजे एक बंद बॉक्स, ज्याच्या एका बाजूला बारीक छिद्र असते. त्या छिद्रा समोर असलेल्या वस्तूंवर प्रकाशकिरणे परावर्तित होऊन बॉक्सच्या दुसऱ्या बाजूला त्या वस्तूची उलटी प्रतिमा दिसते. हा पिन होल कॅमेऱ्याचा सिद्धांत असून हम्पी येथील वीरूपाक्ष मंदिरात याच तंत्राचा वापर हजारो वर्षांपूर्वी करण्यात आला आहे. मंदिर परिसरात असलेल्या "राजा गोपुरम" या वास्तूची उलटी प्रतिमा तेथून 300 फूट दूर असलेल्या 'सेलू मंडपा' या वास्तू मधील गाभाऱ्याच्या भिंतीवर दिसते . विशेष म्हणजे या प्रतिमा सकाळी कृष्णधवल आणि संध्याकाळी सोनेरी रंगात दिसतात.
पिनहोल कॅमेरा नंतर प्लेट कॅमेरा अस्तित्वात आला म्हणजे ज्या आकाराचे छायाचित्र हवे त्याच आकाराची निगेटिव्ह चित्रीत केली जायची, अर्थात त्यावेळी निगेटिव्ह मिळवण्यासाठी काचांचा वापर प्लेट कॅमेऱ्यात केला जायचा .
मात्र पुढे दळणवळणा साठी हे कॅमेरे अवजड वाटू लागले, आणि काचेचा वापर असल्याने फुट-तुटीचे प्रमाणही मोठे असायचे. त्यामुळे फोटोग्राफी या तंत्राला आजच्या तुलनेत मर्यादा यायच्या. शिवाय काचेवर विविध मुलामे देऊन छायाचित्रण केले जात असल्याने डार्क रूम (अंधाऱ्या खोली) मध्ये त्यावर प्रक्रिया करताना फूट -तूट आणि किरकोळ अपघातही संभवायचे . मात्र 1850 पर्यंत फोटोग्राफी हे तंत्र जगभरातल्या बऱ्याच देशांमध्ये पोहोचले होते. फ्रान्समध्ये तर मोठ्या शहरातील मुख्य रस्त्यांवर जवळपास 50 स्टुडिओ उघडले गेल्याचा उल्लेख सापडतो. फोटोग्राफीतील फूट -तुट किरकोळ अपघात टाळण्यासाठी शास्त्रज्ञांची धडपड चालूच होती . काचे ऐवजी पारदर्शक जिलेटिनवर सिल्वर ब्रोमाइड ,सिल्वर क्लोराइड सारखे थर देऊन जिलेटिनची निगेटिव्ह फिल्म तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले. त्यामुळे कोठेही फोटोग्राफी करणे सुलभ झाले. शिवाय त्याचबरोबर अवजड अशा प्लेट कॅमेऱ्याची जागा मिनीएचर कॅमेऱ्यांनी घेतली कॅमेरा आणि निगेटिव्ह प्लेट च्या ऐवजी फिल्मची गुंडाळी (रोल) कॅमेरात बसवण्याची सोय निर्माण झाली. या रोलमध्ये 12 फोटो 16 फोटो सलग काढण्याची सोय निर्माण झाल्याने आता, फोटोग्राफीचा प्रसार वेगाने होऊ लागला.
पुढे 35 मिलिमीटरच्या मिनीएचर कॅमेरा अस्तित्वात आला . या कॅमेरात 36 फोटो बसतील एवढी फिल्मची गुंडाळी (रोल) लावता येईल अशी सोय होती. त्याचबरोबर कॅमेऱ्याच्या लेन्सेसचाही विकास सुरू होता. कॅमेराला सहजगत्या लावता येतील अशा भिंगांचा( लेन्स)वापर त्यात होता. लांबचे छायाचित्र टिपण्यासाठी टेली लेन्स ,कमी जागेत छायाचित्रण करण्यासाठी वाईड अँगल लेन्स आणि वस्तुनिष्ठ छायाचित्रणासाठी नॉर्मल लेन्स उपलब्ध झाल्या . वाहतुकीसाठी सहज सोपे कॅमेरे सलग छायाचित्र टिपण्याची सोय सहजगत्या हाताळण्या जोग्या लेन्सेस अस्तित्वात आल्या . नंतर फोटोग्राफीचा प्रसार जगभरात जोमाने होऊ लागला. शिवाय कोठेही छायाचित्रण करता येईल अशा सुविधांमुळे कॅमेरा ही वस्तू जास्तीत जास्त लोकप्रिय होऊ लागली.
कृष्णधवल छायाचित्रणा बरोबरच आता रंगीत छायाचित्रणाचे तंत्र विकसित झाले. 1914 साली नॅशनल जिओग्राफीच्या अंकात पहिले रंगीत छायाचित्र प्रसिद्ध झाले. मात्र जगभरात या तंत्राचा प्रसार व्हायला वेळ लागला. भारतात तर याचा प्रसार व्हायला 1970 सालची वाट पहावी लागली. रंगीत छायाचित्रा च्या बरोबरच रंगीत पारदर्शिकाही उपलब्ध झाल्या. त्याचबरोबर आता मिनीचर कॅमेरे लेन्सेस त्यातही टेली लेन्स , वाईड अँगल लेन्स, बरोबर त्यांचे मिश्रण असलेली झूम लेन्स ही उपलब्ध झाल्याने जगभरात फोटोग्राफी तंत्राचा चांगलाच प्रसार झाला. शिवाय या तंत्राच्या कक्षाही विस्तारू लागल्याचे दिसून येत होते . आजमितीला आकाश ,पृथ्वी, पाताळ यातील कुठलाही विषय फोटोग्राफीसाठी वर्ज्य नाही.
जगात किंवा जगाबाहेरील कोठेही फोटोग्राफी करणे शक्य आहे. 1969 साली नील आर्मस्ट्राँग आणि बेझ ऑल्ड्रिन यांच्या रूपाने मानवाने चंद्रावर स्वारी केली . चंद्रावर मानवी पाऊल पहिल्यांदा पडल्याचे छायाचित्र तेव्हा नासाला पाठविण्यात आले . तेव्हा डिजिटल कॅमेऱ्याचा शोध लागलेला होता. चंद्रावरच्या पहिल्या मानवी पाऊल पडल्याची छायाचित्र हा डिजिटल फोटोग्राफीचा अविष्कार होता .
डिजिटल कॅमेरा म्हणजे निगेटिव्हचा वापर टाळून त्याऐवजी सेंसर आणि एक्स डी कार्ड वर छायाचित्र टिपण्याची सोय झाल्याने फोटोग्राफी जगताची निगेटिव्ह फिल्म पासून मुक्तता झाली . त्याचबरोबर हळूहळू अंधाऱ्या खोलीची संकल्पना ही संपुष्टात आली. आणि आता पुनर्लेखन करण्याच्या क्षमतेचे कार्डस उपलब्ध असल्याने फोटोग्राफरचा बऱ्याच अंशी खर्च व मेहनत याची बचत होऊ लागली.
डिजिटल कॅमेऱ्या वर फोटोग्राफीची प्रगती न थांबता आता त्याची जागा मिररलेस डिजिटल कॅमेऱ्याने घेतली आहे. अशाच तंत्राचा मोबाईल मध्ये वापर करून त्यातही उच्च प्रतीचे कॅमेरे बसवण्याची सोय निर्माण करण्यात आली आहे . अर्थात मोबाईल मधला कॅमेरा आणि व्यावसायिक कॅमेऱ्यात तशी बरीच तफावत आहे. मोबाईलच्या कॅमेराला मर्यादा येतात. मात्र एकूणच मोबाईलचा प्रसार वेगाने होत असताना त्यातील कॅमेराही प्रत्येकाच्या खिशात मावेल एवढ्या आकारात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य ही त्यांच्याकडील मोबाईल फोनच्या माध्यमातून कॅमेराने कुठेही फोटो काढू शकतो.
फोटोग्राफीच्या व्यावसायिक कक्षा
फोटोग्राफीच्या प्रसारामुळे त्याची व्यावसायिक कक्षाही रुंदावल्या आहेत . उदाहरणार्थ वेडिंग फोटोग्राफी, प्री-वेडिंग फोटोग्राफी, मॅटरनिटी फोटोग्राफी, बेबी शॉवर फोटोग्राफीचे प्रकार आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनले आहेत . मात्र त्याचबरोबर इंडस्ट्रियल फोटोग्राफी, स्पोर्टस फोटोग्राफी , इंटेरियर फोटोग्राफी, फॅशन फोटोग्राफी, ऍस्ट्रोलॉजिकल फोटोग्राफी,वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, बर्ड्स फोटोग्राफी, ट्रॅव्हल फोटोग्राफी ,कमर्शिअल फोटोग्राफी आणि इतरही बऱ्याच विषयात चांगले छायाचित्र तंत्र अवगत केल्यास त्याचा व्यावसायिक दृष्ट्या ही चांगलाच फायदा होऊ शकतो. 19 ऑगस्ट ही तारीख जगभरातील छायाचित्रकारांना त्यांनी या कलेची उपासना करून त्या मध्ये आपल्या पाऊलखुणा उमटवल्या आहेत . अशा सर्वांनाच हा दिवस फोटोग्राफी कला तंत्रातून उतराई होण्यासाठी प्रेरक ठरतो.
(देविप्रसाद अय्यंगार )
0 Comments