।। जागर शक्तीचा ।। जागर भक्तीचा ।।
नवसाला पावणारी मोहोटादेवी
गर्भगिरी पर्वत रांगेतील उंच डोंगर पायथ्याशी असलेल्या मोहटा गाव हा दंडकारण्याचा भाग होता पूर्वी येथे मोहाचे खूप झाडे होती.म्हणून गावास मोहटा गाव असे म्हणतात गडाच्या दहाही दिशा पुण्य पावन पवित्र व महामुनी साधुसंतांच्या तपश्चर्येने पुनीत झालेली भूमी अशा पवित्र पुण्यावाहन नक्षत्रामध्ये कल्याणार्थ मोठा गाव ग्राम नावाने श्री मोठा देवी अवतीर्ण होऊन प्रसिद्ध झाली.
मोहटे मोठा गावचे श्री रेणुकामातेचे परमभक्त श्री बन्सीबाबा दहिफळे गावोगावचे अनेक भक्तांना संघटित करून श्रीक्षेत्र माहूरगडाची वारी करायचे सर्व संसार गाईगुरे बरोबर असायची.पायी चालावे मुखाने जय जगदंब,जय जगदंब असे नामस्मरण करावे अशा दिनचर्या ने माहूरगडी पोहोचल्यावर मातृतीर्थ स्नान करून पवित्र तीर्थजलाने श्री रेणुकामातेची पुजा अभिषेक साडी चोळी व पुरणपोळीचा महानैवेद्य अर्पण करावा, श्री सप्तशती पाठ, होमहवन चंडी यागाचे आचरण करावे अशी सारी सेवा करून परत मोहोटा गावी यायचे त्यांना जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागायचा.त्यांच्या आचरणातून प्रामाणिकपणे प्रपंच हाच जणू परमार्थ हि शिकवण समाजास मिळायची.
" आधी प्रपंच करावा नेटका मग परमार्थ सुभटा "
हि समर्थांची शिकवण बाबांनी आचरणात आणून धन्य तो गृहस्थाश्रम असे म्हणून त्यांनी देवीजवळ अधिकार मिळवला होता.मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव ही शिकवण स्वतःच्या अंगी बाणवून प्रयत्नपूर्वक स्वधर्माची ओळख करून उत्तम जीवन बाबा जगले .
माहूरगडाची वारी करताना बाबा वयोमानाने थकले व त्यांनी रेणुकामातेची करुणा भाकली आई तुझा वियोग होऊ देऊ नको, त्याच दिवशी बाबांना दृष्टांत झाला मी तुझ्या बरोबर आहे असे आकाशवाणीने बाबांच्या कानावर पडले त्यावेळी बाबांना विदेही अवस्था प्राप्त झाली बाबा गावी निघाले तेव्हा त्यांचे जवळ असणारी पांढरी देवगुणी गाय हरवली.बाबा हळहळले गावाकडे आल्यावर कालांतराने ही गाय डोंगर पायथ्याशी आहे अशी वार्ता बाबांच्या कानी पडली तेव्हा सवंगड्यांसह बाबा गाय धरण्यासाठी आले,गाय डोंगरात वर-वर चढू लागली पुढे गाय मागे भक्तगण अरण्याच्या उंच डोंगरावर अशा अवस्थेत गाय डोंगर माथ्यावर आली आणि तिथे थांबून पान्हा सोडला, मग आश्चर्य ज्याठिकाणी गाय पान्हावली तेथे भव्यदिव्य सौंदर्य संपन्न तेजोमय देवीचा तांदळा दिसला गाय देवीस दुधाचा अभिषेक करताना पाहून बाबा धन्य झाले भक्तगणांनी धन्य झालो असे उद्गार काढून श्री रेणुकेचा जय जयकार केला.महाआनंदाने दर्शन घेतले.
पैठण क्षेत्री जाऊन भक्तगणांनी पायी जाऊन कावडीने गंगोदक आणून पवित्र गंगोदक तीर्थ जलाने अभिषेक करून अन्नदान केले हा साक्षात्कार पुण्यपावनदिन अश्विन शुद्ध एकादशी होय तेव्हापासून आजपर्यंत हजारो भाविक पायी पैठणहून गंगाजल आणून श्री मोहोटादेवीला गंगा स्नान घालतात.अश्विन शुद्ध एकादशी यात्रा उत्सव साजरा करतात मोहटे गावापासून शक्तिपीठ श्री मोहटादेवी गडापर्यंत भव्य पालखीची सवाद्य मिरवणूक निघते.हा पालखी सोहळा तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे. पालखीपुढे शेकडो महिला आपल्या पदराने वाट झाडतात.नवसाला पावणारी अशी या देवीची महती आहे.
या मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याशिवाय मंदिरात नित्य पूजा कायमस्वरूपी सुरू असतात.
0 Comments