पाच जणांना उडवत कारचालकाने काढला पळ

पाच जणांना उडवत कारचालकाने काढला पळ 

वेब टीम राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात उंबरे येथे माळवाडी शिवारात शुक्रवारी रात्री  ७.३० वाजेच्या सुमारास राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावर एका भरधाव कारने पाच जणांना उडविल्याची घटना घडली आहे.यामध्ये दोघांचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.संतापजनक बाब म्हणजे अपघात झाल्यानंतर कारचालकाने जखमीला मदत न करता कार भरधाव वेगात पळवली आणि यानंतर पुढे दोन दुचाकींना धडक देत त्यावरील चौघांना गंभीर जखमी केले.संजय उर्फ सांडू अर्जुन हिवराळे (वय ३२) आणि कैलास छबुराव पंडित (वय ४५,दोघेही रा.माळवाडी,उंबरे) अशी मृतांची नांवे आहेत.तर सुरेश झुगाजी ससाणे,सोन्याबापू बाबासाहेब गायकवाड आणि बादशहा शेख (तिघेही रा. माळवाडी,उंबरे) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. 

      याबाबत अधिक माहिती अशी की,शनिशिंगणापूरच्या दिशेने एक कार (एमएच ०९ बीएक्स ३६१६) भरधाव वेगाने चालली होती,मोलमजुरी करुन उपजिविका करणारे सुरेश ससाणे रस्त्याने पायी चालले होते.त्यांना कारने जोरदार धडक दिली.धडक दिल्यानंतर गंभीर जखमी झालेले सुरेश ससाणे यांना मदत न करता या कार चालकाने भरधाव वेगाने कार शनिशिंगणापूरच्या दिशेने नेली.पुढे एक किलोमीटर अंतरावर पोहोचला असता त्याने आणखीन दोन दुचाकींना कारने जोरदार धडक दिली. या दोन दुचाकींवर एकुण चारजण प्रवास करत होते.हे चौघेही बांधकाम मजुरी करणारे कामगार होते.या अपघाताची माहीती मिळताच स्थानिक तरुण सुभाष वैरागर,लालासाहेब वैरागर आणि इतरांनी तत्परता दाखवत मदकार्य केले.यावेळी दोन रुग्णवाहिकांमधून सर्वांना  जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.कार तेथेच सोडून कारमधील लोकांनी पलायन केले.या कारमधून तीन जण पळाल्याचे स्थानिक नागरिकांनी माहिती दिली.

Post a Comment

0 Comments