शिवसेना विरुद्ध शिंदे सेना संघर्ष तीव्र
थेट कायदेशीर लढाईचे संकेत
वेब टीम मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंना समर्थन करणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असतानाच शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आता या बंडखोर गटाविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याची घोषणा केलीय. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी शरद पवारांविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करतानाच बंडखोर आमदारांची संख्या ही केवळ कागदावर असल्याचं म्हटलंय. आम्हाला पूर्ण विश्वास आहे सभागृहामध्ये हा विषय येईल तेव्हा महाविकास आघाडीच्या बाजूने आमदारांचा कौल असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
शिंदे यांच्या १२ समर्थक आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवावे, अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे गुरुवारी रात्री करण्यात आल्याचं संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच पुढे बोलताना, “संख्याबळ अधिक असू शकतं पण ते कागदावर. आता ही कायदेशीर लढाई होणार आहे. आता त्यांचं सरकार कधी बनणार हे मला माहिती नाही. बनणार की नाही हे सुद्धा माहिती नाही,” असंही राऊत म्हणाले आहेत.
पक्षाने बुधवारी बोलावलेल्या बैठकीस गैरहजर राहून शिस्तभंग केल्याबद्दल एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे, भरत गोगावले यांच्यासह एकूण १२ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करत त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करणारे पत्र शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिले आहे. आता त्यावर झिरवळ काय निर्णय घेतात आणि एकनाथ शिंदे गटाकडून काय उत्तर मिळते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी बंडाचा झेंडा उभारल्यानंतर मागील ४८ तास शिवसेनेकडून त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना मुंबईत परत येण्याचे आवाहन केले जात होते. गुरुवारी रात्री मात्र शिवसेनेने कारवाईचे अस्त्र उगारले. एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनवणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदीपान भुमरे, महेश शिंदे, अब्दुल सत्तार या १२ आमदारांचे सदस्य रद्द करण्याची मागणी शिवसेनेने नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे.
शिवसेना पक्षाच्या बैठकीबाबत मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी पत्र पाठवून त्या बैठकीस हजर राहण्याबाबत आदेश दिला होता. त्यानंतरही बैठकीसाठी बोलावलेले शिवसेनेचे १२ आमदार त्या बैठकीस हजर राहिले नाहीत. त्यानंतर नियमाप्रमाणे त्यांना नोटीस पाठवून खुलासा विचारण्यात आला. पण त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे पक्षाच्या आदेशाचा व शिस्तीचा भंग केल्याबद्दल अपात्रतेची कारवाई करून या १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करावे, असे पत्र शिवसेना गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना दिल्याचे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते अरिवद सावंत यांनी माध्यमांना सांगितले.
या याचिकेवर शिंदेंचं उत्तर
शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासह १२ आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका विधानसभा उपाध्यक्षांकडे दाखल केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यास प्रत्युत्तर दिले आहे. कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहात. तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो. घटनेच्या १० व्या परिशिष्टाप्रमाणे पक्षादेश हा विधानसभा कामकाजासाठी लागू होतो. बैठकीसाठी नाही. कायदा आम्ही जाणतो त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे, असे एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले.
पवारांवरील टीकेवरुन नारायण राणेंवर निशाणा
सध्या राज्यामधील सत्ता वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरद पवारांना केंद्रीय मंत्र्यांकडून घरी जाऊ देणार नाही अशाप्रकारच्या धकम्या दिल्या जात असून हे अत्यंत चुकीचं असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलंय. “आता लोक धमक्या देतायत. शरद पवारांना धमकी देण्यापर्यंत काही लोकांचा माज वाढलेला आहे. या लोकांनी पूर्वी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आम्हाला धमक्या दिलेल्या आहेत. देऊ द्या हरकत नाही. ही त्यांची संस्कृती आहे. पण ही भाजपाची संस्कृती आहे का असा मी प्रश्न विचारलाय,” असं राऊत म्हणालेत.
“शरद पवारांना घरी जाऊ देणार नाही अशी धमकी देणारा कोणी महाराष्ट्रात असेल तर त्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांना करावा लागेल. या देशात लोकशाही, स्वातंत्र्य आहे. शरद पवारांसारख्या नेत्याचा आदर पंतप्रधान मोदी करतात, जगभरात त्यांना मान आहे अशा नेत्याविषयी फक्त सत्ता मिळावयचीय चोरीच्या मार्गाने म्हणून अशा धमक्या देणं चुकीचं आहे. आम्हाला द्या धमक्या आम्ही समर्थ आहोत. पण त्यांच्या वयाचा, अनुभवाचा, तपस्येचा तुम्हाला आदर नसेल तर मला असं वाटतं की आपण मराठी म्हणून घ्याला नालायक आहोत,” असा टोला राऊत यांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणेंना लागवलाय.
0 Comments