नुपूर शर्मा बेपत्ता? दिल्लीत मुंबई पोलिसांकडून शोध सुरु
समन्स बजावल्यानंतर कारवाईसाठी दिल्ली पोलीस योग्य सहकार्य करत नसल्याचा मुंबई पोलिसांचा आरोप
वेब टीम मुंबई : प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी नुपूऱ शर्मा यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्याप नुपूर शर्मा मुंबई पोलिसांसमोर हजर झाल्या नाहीत. त्यामुळे त्या कुठे गेल्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबई पोलीस दिल्लीत त्यांचा शोध घेत आहेत. इंडिया टुडेने याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे. रझा अकादमीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना समन्स बजावले आहे.
महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नुपूर शर्मा यांना अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे पुरेसे पुरावे आहेत. मात्र, त्या नॉट ट्रेसेबल असल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडथळा निर्माण होत आहे. नुपूर शर्मा यांनी प्रेषित यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर ठाण्याबरोबरच पायधूनी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समन्स बजावल्यानंतर कारवाईसाठी दिल्ली पोलीस योग्य सहकार्य करत नसल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे.
एका टिव्ही कार्यक्रमात चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी प्रेषित महोम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. देशात ठिकठिकाणी नुपूर शर्मा यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली होती. तसेच मुस्लिम बांधवानी शर्मा यांच्या अटकेची मागणी केली होती. भारतासोबत अखाती देशातही या विधानाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर भाजपाने नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करत त्यांना प्रवक्ता पदावरुन निलंबित केले होते.
0 Comments