एस टी च्या सेवेत इलेक्ट्रिक बस रुजू

एस टी च्या सेवेत 'शिवाई'इलेक्ट्रिक बस रुजू 

“आपण राज्याचं वैभव आहोत याचं भान ठेवा”उद्धव ठाकरेंचा एसटी कर्मचाऱ्यांना सल्ला

विद्युत प्रणालीवरील बसेसचा लोकार्पण सोहळा 

वेब टीम मुंबई : उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची आठवण करुन देत तो काळ वेदनादायी होता असं सांगितलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलं आहे.. यानिमित्ताने विद्युत प्रणालीवरील बसेसचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पुणे ते अहमदनगर या राज्यातील पहिल्या इलेक्ट्रिक एसटी बसचं उद्धाटन करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी करोना काळात केलेल्या कामाचं कौतुक केलं. तसंच त्यांच्या आंदोलनावरही भाष्य केलं.

एसटीची विजेवरील ‘शिवाई’ आजपासून सेवेत

ते म्हणाले की, “गेल्या वर्षीचा मधील काळ सर्वांसाठी वेदनादायी होता. एसटीचे फक्त कर्मचारी म्हणून नाही तर कुटुंबाचे सदस्य म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. अनेकदा एसटी तोट्यात असल्याचं सांगितलं जातं. पण आपण जर खासगी बसेसच्या बरोबरीने तिकीट दर ठेवणार असू तर एसटी सेवेचा फायदा काय? त्यामुळे आपल्याला साहजिकपणे तोटा सहन करावा लागतो. आपले परिवहनमंत्री अनेकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबद्दल काय करायचं असं विचारता. त्यामुळे आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन शासनाकडून दिलं असून पुढील काही वर्षाचीही हमी घेतली आहे”.

“मधला काळ वेदनादायी होता कारण सर्व काही करता येतं पण पैशांचं सोंग आणता येत नाही. तुमच्या व्यथा आमच्याकडे नाही मांडणार तर कोणाकडे मांडणार. पण फक्त बरं वाटावं म्हणून न झेपणाऱ्या गोष्टी केल्या आणि उद्या शक्य नसल्या तर मग काय होणार? त्यामुळेच आम्ही त्यावेळी जे शक्य आहे ते करु आणि यापुढेही करु. पण आपण आपल्या राज्याचं वैभव आहोत याचं भान तुम्हीही ठेवलं पाहिजे,” असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला.

सर्वात जास्त इलेक्ट्रिक बस असणारं मुंबई पहिलं शहर ठरणार आहे असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. एसटीची सेवा प्रदूषणविरहीत कशी होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला. नव्या संकल्पना आपण आणत आहोत अन्यथा आजही चित्रपटात दिसणारी ती एसटी तशीच राहिली असती. काळानुसार गरजा वाढत असून आपणही बदलत प्रगती कऱणं उद्धिष्ट आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

करोना काळातील कामाचं कौतुक

“करोना काळात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पराक्रमच केला आहे. त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊच शकत नाही. समोर धोके असतानाही त्यांनी काम केलं. शहरातही समर्थपणे सेवा दिली. महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षणाला, दिवसाला, क्षेत्रात एसटीचं योगदान आहे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

एसटीची विजेवरील ‘शिवाई’ आजपासून सेवेत

पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ‘शिवाई’च्या दिवसाला सहा फेऱ्या होतील.  एका कंपनीकडून प्रथम ५० ‘शिवाई’ बस घेण्यात येतील. त्यानंतर आणखी १०० ‘शिवाई’ बस येत्या ऑगस्टपर्यंत ताफ्यात समाविष्ट होतील. ५० पैकी दहा बस पुणे-अहमदनगरबरोबरच पुणे ते औरंगाबाद मार्गावर चालवण्याचे नियोजन आहे. याशिवाय १२ बस पुणे-कोल्हापूर, १८ बस पुणे-नाशिक, १० बस पुणे-सोलापूर मार्गावर चालवण्यात येतील. एका चार्जिगमध्ये २५० किलोमीटपर्यंत धावण्याची या बसची क्षमता आहे. या बसची लांबी १२ मीटर असून टू बाय टू आसन व्यवस्था आहे. बसमध्ये एकूण ४३ आसने असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.

Post a Comment

0 Comments