डोंबिवलीमध्ये बँकेची ७३ लाख ९५ हजारची फसवणूक
वेब टीम डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील एका बँकेची ७३ लाख ९५ हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्या सोसायटी अध्यक्षांसह चार जणांविरुद्ध बँक अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेकडून घेतलेले कर्ज सोसायटी पदाधिकाऱ्याने मागील साडे तीन वर्षापासून भरलेले नाही. याच कारणामुळे बँकेने ही कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी देलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेत डोंबिवली पालिका विभागीय कार्यालयासमोर भारत को. ऑपरेटिव्ह बँक आहे. या बँकेकडून सोसायटीचे अध्यक्ष संतोष म्हात्रे, अरविंद बच्चुभाई गाला, गणेश खेडेकर, अरविंद ओझा यांनी एका भूखंडावर भारत को. ऑपरेटिव्ह बँकेकडून कर्ज घेण्याची शक्कल लढवली. या भूखंडाच्या नावे यापूर्वी इंडियन बँकेने कर्ज घेतले होते. याची जाणीव या चारही आरोपी असलेल्या सोसायटी पदाधिकाऱ्यांना होती.
तरीही त्यांनी संबंधित भूखंडावर कोणत्याही बँकेचे कर्ज नाही असे भारत को. ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. तशी कागदपत्रे आरोपींनी सादर केली. या कागदपत्रांवर आणि सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन भारत को. ऑपरेटिव्ह बँकेने ७३ लाख ९५ हजार ९९२ रूपयांचे कर्ज अरविंद गाला यांना साडे तीन वर्षापूर्वी मंजूर केले.
कर्जदार अरविंद गाला कर्जाचे हप्ते फेडत नसल्याने बँकेने तारण भूखंडासंदर्भात चौकशी केली. त्यांना संबंधित भूखंडावर अन्य एका बँकेचे कर्ज असल्याचे आढळले. त्यानंतर अरविंद गाला यांच्यासह सोसायटी पदाधिकाऱ्यांनी बँकेला खोटी माहिती देऊन कर्ज मंजूर करून घेतले. त्या कर्जाची रक्कम बँकेला परतफेड न करता बँकेची फसवणूक केली, अशी तक्रार बँक अधिकाऱ्याने केली आहे. या तक्रारीनंतर पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक जी. आर. जाधव तपास करत आहेत.
0 Comments