एकाच दिवशी १३५ करोनाबाधित वाढल्यानंतर आरोग्यमंत्र्यांचं विधान
म्हणाले, “पाश्चात्य देशांप्रमाणे जर परिस्थिती जाणवली…!”
वेब टीम मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात आणि देशभरात सातत्याने करोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतेच २ एप्रिल अर्थात पाडव्यापासून राज्यातील सर्व प्रकारचे निर्बंध उठवले आहेत. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया जरी उमटल्या असल्या, तरी राज्यातलं जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलेलं असतानाच गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे काहीशी शंका उपस्थित केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात सूचक विधान केलं आहे.
एकाच दिवशी १३५ रुग्ण!
गेल्या दोन दिवसांत राज्यात अचानक करोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी महाराष्ट्रात ५९ रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी त्यात दुपटीहून अधिक म्हणजेच १३७ नवे करोनाबाधित वाढले आहेत. देशभरात २४ तासांत १२४७ रुग्ण वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. ही चौथी लाट असल्याची देखील भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वाढत्या रुग्णसंख्येवर सविस्तर भूमिका मांडली आहे.
घाबरण्याचं कारण नाही!
एकाच दिवसात दुपटीहून जास्त रुग्ण वाढले असले, तरी घाबरण्याचं कारण नसल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. “केंद्रानं दिलेल्या पत्रात काही राज्यांचा उल्लेख केला आहे. काल मी घेतलेल्या आढाव्यात महाराष्ट्रात एकूण १३५ केसेस आढळल्या आहेत. त्यात मुंबईमध्ये ८५ केसेस आहेत. महाराष्ट्राने ६० हजार केसेस रोज पाहिल्या आहेत. त्यामुळे अतिशय नियंत्रित अशी ही परिस्थिती आहे. कुठेही घाबरण्याचं कारण नाहीये. लसीकरणाचं प्रमाण देखील चांगलं झालं आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.
लसीकरणाचं आवाहन
दरम्यान, राजेश टोपेंनी सर्वांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचा देखील सल्ला त्यांनी दिला आहे. “१२ ते १८ वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला देखील आम्ही प्रोत्साहन देतोय. त्यासाठी जनजागृती करतो आहोत. लसीकरण स्वत:च्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं आहे. बूस्टर डोससंदर्भात केंद्र सरकारने तसे निर्देश दिले आहेत. लोकांनी खासगी केंद्रात शुल्क देऊन बूस्टर डोस घ्यायला हरकत नाही. पण आज काळजीचा विषय नाही. आपण निर्बंध मुक्त केले आहेत. मास्कसक्ती हटवली आहे. पण ज्येष्ठ नागरिक किंवा सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींनी गर्दीत मास्क घालण्याची काळजी घ्यावी”, असं ते म्हणाले.
“परिस्थितीवर लक्ष आहे”
वाढलेले रुग्ण ही चिंतेची बाब नसल्याचं नमूद करतानाच आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं राजेश टोपे म्हणाले. “आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. पाश्चात्य देश, युरोप, चीनमध्ये असलेली परिस्थिती जर आपल्याला जाणवली, काही प्रमाणात दिल्लीतही रुग्ण वाढत आहेत, तर त्या पद्धतीने आयसीएमआर, केंद्र सरकार, आमचं टास्क फोर्स, आरोग्य विभाग या सगळ्या गोष्टीत लक्ष ठेवून आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल”, असं राजेश टोपे म्हणाले.
0 Comments