सवलतीच्या दरात इंधन मिळत असेल तर का खरेदी करू नये : निर्मला सीतारामन

सवलतीच्या दरात इंधन मिळत असेल तर का खरेदी करू नये : निर्मला सीतारामन 

वेब टीम नवीदिल्ली : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह मित्रराष्ट्रांनी रशियावर मोठे आर्थिक निर्बंध लादले. रशियाच्या कच्चा तेलाची खरेदीही थांबवण्यात आली. या पार्श्वभूमीवर रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चे तेल देऊ केले. त्यावर भारत काय भूमिका घेतो, ही ऑफर स्वीकारणार की नाही यावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अशातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे.

निर्मला सीतारमन म्हणाल्या, “माझ्यासाठी देशाची उर्जा सुरक्षा पहिल्या प्राधान्यावर आहे. जर सवलतीच्या दरातइंधन मिळत असेल तर आम्ही ते का खरेदी करू नये? आम्ही रशियाकडून इंधन खरेदीला सुरुवात केली आहे. आम्हाला भरपूर प्रमाणात बॅरल मिळाले आहेत.”

“माझ्यामते भारताला रशियाकडून आतापर्यंत ३ ते ४ दिवस पुरेल इतका पुरवठा झाला आहे. ही खरेदी सुरूच राहील. आमच्यासाठी देशहीत सर्वप्रथम आहे,” असंही सीतारमन यांनी नमूद केलं.एकूणच केंद्रीय अर्थमंत्री यांनी अमेरिकेसह मित्रराष्ट्रांनी रशियावर निर्बंध लादले असले तरी भारत रशियासोबतचे आपले व्यापारी संबंध कायम ठेवेल असंच स्पष्ट केलंय.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील केंद्र सरकारच्या भूमिकेचं समर्थन करत भारताच्या इंधन पुरवठ्यातील केवळ १ टक्के पुरवठा रशियाकडून होत असल्याचं म्हटलं. तसेच रशियाच्या तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे मुख्य ग्राहक युरोपीय देशच असल्याचं नमूद केलं. जेव्हा बाजारात इंधनाच्या किमती वाढतात तेव्हा इतर देशांना बाजारात इतर कोठे स्वस्त इंधन मिळतं हे शोधून आपल्या लोकांच्या हिताचा निर्णय घ्यावा लागतो, असंही जयशंकर यांनी म्हटलं होतं. 


Post a Comment

0 Comments