शत्रुघ्न सिन्हांची पंतप्रधान मोदींवर टीका म्हणाले, “देशात हुकूमशाही…

शत्रुघ्न सिन्हांची पंतप्रधान मोदींवर टीका म्हणाले, “देशात हुकूमशाही…”


वेब टीम आसनसोल : तृणमुल काँग्रेसचे नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही इंधनाच्या दरवाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

देशात गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. या दरवाढीवरून विरोधी पक्ष केंद्र सरकारवर टीका करत आहे. आता तृणमुल काँग्रेसचे नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही इंधनाच्या दरवाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या काळातील आठवणी सांगताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, “अटलबिहारी वाजयेपी सत्तेत असताना आपल्याकडे लोकशाही होती, परंतु पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आपल्याकडे हुकूमशाही आहे.” बंगालमध्ये एप्रिल महिन्यात पोट निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमिवर प्रचार करताना सिन्हा यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

शत्रुघ्न सिन्हा हे तृणमूलच्या तिकिटावर १२ एप्रिल रोजी पश्चिम बंगालमधील आसनसोलमधून पोटनिवडणूक लढवत आहेत. पंतप्रधान मोदींवर टीका करताना ते म्हणाले की, “त्यांना गर्व आणि अहंकार आहे. त्या पदावर असल्यामुळे तुम्हाला हवं ते करा, अशी त्यांची भूमिका आहे. नऊ दिवसांत आठ वेळा इंधनाचे दर वाढले. हा अहंकार आहे. नऊ दिवसांत डिझेल आणि पेट्रोलचे दर आठ वेळा वाढल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

देशातील इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडतोय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सकाळी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या १० दिवसांत नवव्यांदा इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे फक्त गेल्या १० दिवसांत इंधन तब्बल ६ रुपये ४० पैशांनी महागलं आहे.


Post a Comment

0 Comments