विमानतळाला टाळे ठोकण्याचा सरपंचाचा इशारा

विमानतळाला टाळे ठोकण्याचा सरपंचाचा इशारा 

वेब टीम राहाता : करांच्या थकबाकीपोटी एखाद्या अस्थापनेला सील करण्याचा अधिकार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला आहे. याच अधिकाराचा वापर करून काकडी ग्रामपंचायतीने थेट शिर्डीच्या विमानतळालाच टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.

तशी अधिकृत नोटीस सरपंचांनी विमानतळ प्रशासनाला दिली आहे. कोपरगाव तालुक्यातील काकडी गावच्या हद्दीत शिर्डी विमानतळ आहे.

त्यामुळे विमानतळ प्रशासनाने ग्रामपंचयतीचे कर भरणे आवश्यक आहे. याची तब्बल साडेपाच कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे.

अनेकदा मागणी करूनही ती भरली गेली नसल्याने ग्रामपंचायतीने हे पाऊल उलचले आहे. गावाचा विकास होईल, उत्पन्न वाढेल, या आशेने त्यावेळी ग्रामस्थांनी विमानतळासाठी कमी मोबदल्यात जमीन दिली होती.

प्रत्यक्षात कर वसुलीसाठीही संघर्ष करण्याची वेळ आली आहे. २०१७ मध्ये काकडी शिवारात शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले. तेव्हापासून ग्रामपंचायतीचा कर भरला नाही.ही थकबाकी वाढत जाऊन साडेपाच कोटींवर पोहचली आहे. विमानतळ प्राधिकरणाकडे वारंवार मागणी करूनही कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत.गेल्या अधिवेशनात राज्य सरकारने शिर्डी विमानतळासाठी दीडशे कोटींचा निधी जाहीर केला.

मात्र ग्रामपंचायतच्या थकीत काराबाबत काहीही तरतूद नाही.त्यामुळे काकडी गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी विमानतळ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.

येत्या पंधरा दिवसात थकीत कर भरण्यासंबंधी निर्णय झाला नाही तर विमानतळाला टाळे ठोकण्याचा इशारा सरपंच पूर्वा गुंजाळ यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments