यंदा 'हापूस 'आंबा मुबलक !
वेब टीम रत्नागिरी : सतत बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत असल्याने सध्या हापूस आंब्याची बाजारातील उलाढाल काहीशी संथ असली तरी मे महिन्यात मुबलक प्रमाणात आंबा उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अवकाळी पावसानंतर मार्चच्या पहिल्या आठवडय़ात कोकणामध्ये प्रखर उन्हाचा तडाखा आणि पाठोपाठ सध्याही ढगाळ वातावरण आहे. पण या महिन्यात सुरुवातीला वाढलेल्या तापमानामुळे आंबा भाजला आहे. कणीएवढी कैरी गळून गेली आहे. तसेच दोन दिवस सलग ढगाळ वातावरणामुळे तुडतुडय़ाचा प्रादुर्भाव शक्य आहे. तशाही परिस्थितीत सुरुवातीला येथून जाणाऱ्या पाच ते सहा हजार पेटय़ांमध्ये ३० टक्के रत्नागिरी हापूस होता. त्यात आता वाढ होऊन सध्या कोकणातून दररोज सुमारे १५-१६ हजार पेटी आंबा जात आहे. त्यापैकी सुमारे ४० टक्के रत्नागिरी हापूसह्ण आहे. एप्रिल महिन्यात हा जोर पुन्हा काहीसा ओसरेल, पण हंगामातील अखेरच्या टप्प्यात, मे महिन्यापर्यंत मात्र सामान्य माणसाला हापूसची चव चाखायला मिळेल, असे सध्याचे चित्र आहे.
येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार सलील दामले यांनी सांगितले की, यंदाच्या हंगामाच्या आरंभापासून प्रतिकूल वातावरणाचा फटका हापूसला बसला. त्यामुळे एक महिना उशिराने मोहोर आला. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या कालावधीत अवकाळी पावसामुळे मोहोरासह बारीक कैरीचे नुकसान झाले. त्याला सामोरे जाण्यासाठी औषध फवारणीचा हात मारावा लागला. या परिस्थितीवर मात करत असतानाच जानेवारी महिन्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे सुमारे ९९ टक्के झाडांना फुलोरा आला होता. पण त्यातील नर मोहोराचे प्रमाण अधिक असल्याने अपेक्षित उत्पादन येणार नसल्याचे चित्र त्याच वेळी स्पष्ट झाले. तरीही संजीवकाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांनी गेल्या जानेवारी महिन्यापासून, तुरळक प्रमाणात का होईना, आंबा बाजारात पाठवण्यास प्रारंभ केला. चालू महिन्यात ही आवक आणखी वाढली आहे. पुढील महिन्यात आंबा उत्पादनाचे प्रमाण पुन्हा थोडे खाली येईल. पण मे महिन्यात सर्वत्र तो उपलब्ध होईल.
दरम्यान, लहरी हवामानापासून पहिल्या टप्प्यात वाचलेला आंबा फेब्रुवारीच्या अखेरीस वाशी बाजार समितीत दाखल झाला. चालू महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मुंबईतील वाशी बाजार समितीमध्ये रत्नागिरी, देवगड या दोन्ही ठिकाणांहून दररोज सुमारे पाच हजार पेटी जात होती. त्यापैकी ३० टक्के आंबा रत्नागिरीतील होता. सध्या रोजच्या १६ ते २० हजार पेटी कोकणातून वाशीमध्ये जात आहे. त्यात ४० टक्के रत्नागिरीतील आहे. पण सध्या मुंबईत एक डझन आंब्यासाठी १००० ते १८०० रुपये मोजावे लागत आहेत. वाशी बाजारात पाठवण्यात येत असलेल्या एकूण पेटय़ांपैकी ९० टक्के महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये आणि गुजरात, राजस्थानात जात आहे. १० टक्के आंबा आखाती प्रदेशात निर्यात झाला आहे.
आखाती देशांकडून हापूसची मागणी वाढू लागल्यामुळे वाशी बाजारातून हापूसच्या पेटय़ा हवाईमार्गे विक्रीस पाठविला जात आहे. आतापर्यंत वाशी बाजारातून दहा हजार हापूसच्या पेटय़ा पाठविण्यात आल्या आहेत. यामध्ये रत्नागिरीतील आंब्याचे प्रमाण कमी आहे. सर्वाधिक आंबा सिंधुदुर्गचा आहे. करोनामुळे गेली दोन वर्षे आंबा नियार्तीसाठी विविध समस्यांचा सामना करावा लागला.आखाती प्रदेशातील मागणीमुळे दर टिकून आहेत. उष्मा सुरू झाल्याने आंबा लवकर तयार होऊन बाजारातील आवक वाढण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये पवित्र रमजान सुरू होणार आहे. त्यामुळे आखाती प्रदेशातून आंब्यासाठी मागणी वाढणार आहे. निर्यात वाढली की स्थानिक बाजारपेठेतील दर स्थिर राहाण्यास मदत होईल.
0 Comments