पती आणि मुलांदेखत महिलेवर सामूहिक बलात्कार
वेब टीम ढोलपूर : विवाहित महिलेवर तिच्याच पती आणि मुलांसमोर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील ढोलपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामध्ये महिलेने सहा जणांविरोधात बलात्काराचा आरोप केला आहे.
महिलेने पोलिसांकडे दिलेल्या जबाबानुसार, आपल्या दलित पतीलाही आरोपींकडून मारहाण करण्यात आली. “पोलिसांनी बलात्कार, शारिरीक छळ तसंच SC/ST शी संबंधित कलमांतर्गंत गुन्हा दाखल केला आहे,” अशी माहिती पोलिस उपअधीक्षक विजय कुमार सिंह यांनी दिली आहे.
महिला आपला पती आणि दोन मुलांसोबत शेतातून परतत असताना ही घटना घडली. सहा जणांनी त्यांना अडवलं आणि बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं. आरोपींनी महिलेच्या पतीला मारहाण केली आणि यानंतर सहापैकी दोघांनी मुलांसमोर महिलेवर बलात्कार केला. यानंतर त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली आहे. तसंच पोलीस अधिक्षकांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्यास सांगितलं आहे.
राज्य सरकारवर टीका करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले की, “या घटनेमुळे पुन्हा एकदा राजस्थानची मान खाली घातली आहे. अशोक गहलोत यांच्या राज्यात तालिबानी पद्धतीने कारभार सुरु असल्याचं दिसत आहे”.
0 Comments