एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं पहिलं राज्य

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं पहिलं राज्य

 वेब टीम मुंबई : काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याची घोषणा केली होती. या घोषणेची जोरदार चर्चा देशभर झाली होती. त्यावर अनेक अर्थतज्ज्ञ आणि विरोधी पक्षांनी देखील तोंडसुख घेतलं होतं. याविषयी अजूनही चर्चा सुरू असताना आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या नव्या तरतुदींमुळे देशभरात एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरेल, असं अजिच पवार यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आता एक ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेची चर्चा सुरू झाली आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा २०२२-२३ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी विकासाच्या पंचसूत्रीवर सरकार काम करणार असल्याचं नमूद केलं. यामध्ये कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, उद्योग या क्षेत्रांसाठी भरीव कामगिरी करून त्यांचा विकास साध्य करण्याचं धोरण राज्यानं ठेवल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. ही पंचसूत्रीच यंदाच्या अर्थसंकल्पाचा पंचप्राण असल्याचं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेणार असल्याचं अजित पवारांनी यावेळी अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केलं. “राज्यात राबवण्यात येणाऱ्या विकासाची पंचसूत्री या कार्यक्रमासाठी ४ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या कार्यक्रमानंतर राज्यातली गुंतवणूक वाढेल आणि एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल”, असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना सुरुवातीलाच एक मोठी घोषणा केली आहे. हवेलीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं अजित पवार म्हणाले. “हवेलीत संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येईल. त्यासाठी २५० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यात असामान्य शौर्य गाजवणाऱ्या नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे”, अशी देखील घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली.

Post a Comment

0 Comments