बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू 

वेब टीम संगमनेर : जिल्ह्यात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दितील मेंढवण गावच्या बढे वस्तीवर घडली. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, हिराबाई एकनाथ बढे (वय 45) ही महिला आपल्या घराच्या बाहेरील बाजूस आवरासावर करीत असतांना जवळच्या झुडपात घात लावूल बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक घात केला.

बिबट्याने महिलेचा गळाच जबड्यात पकडला, त्यातून त्यांना गंभीर दुखापत झाली, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांच्या कुटुंबातील अन्य लोकांसह आसपासच्या मंडळींनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने काही अंतर ओढीत नेल्यावर त्या महिलेला सोडून दिले व तेथून धूम ठोकली.

त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने खासगी वाहनातून त्यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक व वनविभाग घटनास्थळी दाखल झाले.

सदर महिलेचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यातच झाल्याच्या वृत्ताला वनपाल पुंड यांनी दुजोरा दिला आहे. या घटनेने परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments