‘या’ अग्रगण्य बँकेत 150 कोटीची फसवणूक
वेब टीम नगर : नगर अर्बन बँकेसह खातेदार, ठेवीदार आणि सभासदांची सुमारे २८ प्रकरणांत १०० ते १५० कोटी रूपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी सुमारे २८ प्रकरणांत ही फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. राजेंद्र ताराचंद गांधी (वय ५६, रा कोहिनूर गार्डन, माळीवाडा, अहमदनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
आरोपींमध्ये सन २०१४ ते २०१९ या कालावधीतील अर्बन बँकेचे चेअरमन माजी खासदार (कै.) दिलीप गांधी, संचालक मंडळातील सदस्य, बँकेचे अधिकारी, आशुतोष सचिन लांडगे, सचिन गायकवाड, रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी आणि बँकेच्या मुख्य शाखेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक अच्युत घनशाम बल्लाळ यांचा समावेश आहे.
नगर अर्बन बँकेचे सन २०१४ ते २०१९ या कालावधीतील तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळातील सदस्य व नगर अर्बन बँकेचे अधिकारी जबाबदार पदावर कार्यरत होते. त्यांनी २०१५ ते आजपर्यत कर्ज प्रकरणांचे निर्णय घेण्यासाठी संचालक मंडळाच्या सभा घेऊन कर्ज मंजूर केले आहे.
काही कर्जदार आणि इतर संबंधितांशी संगनमत करून बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट, आर्थिक पत्रके आणि इतर कागदपत्रे तयार करून त्याच्या आधारे माझ्यासह नगर अर्बन बँक, सभासद, खातेदार आणि ठेवीदार यांचे आर्थिक नुकसान करून १०० ते १५० कोटी रूपयांची फसवणूक केली आहे.
कोतवाली पोलिस ठाण्यात या संदर्भात गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत.
0 Comments