पंचगंगेत हजारो मासे पाण्यावर…; वाढते प्रदूषण

पंचगंगेत हजारो मासे पाण्यावर…; वाढते प्रदूषण

वेब टीम कोल्हापूर : येथील पंचगंगा नदीमध्ये माशाची फौज तरंगताना दिसत आहे. माशांचे जणू संचलन सुरू आहे की काय असा भास होत आहे. नदीतील प्रदूषणामुळे प्राणवायूची कमतरता झाल्यामुळे मासे पाण्यावर तरंगत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

पंचगंगा नदीतील माळी पाणंद भागातील चित्रफीत समाज माध्यमात अग्रेषित झाली आहे. त्यामध्ये हजारो मासे एकामागोमाग एक पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. माशांचे संचलन सुरू असल्याचे मनोहारी चित्र दिसत आहे. तरंगणाऱ्या माश्यांना भक्ष्य करण्यासाठी पक्ष्यांचे थवे घोंगावत आहेत. तर काहींनी ही संधी साधत मासेमारी सुरू केली आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात मासे तरंगत कसे आहेत याचा शोध सुरू आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी डॉ. अर्जुन जाधव यांनी नदीच्या पाण्याचा नमुना घेतला आहे. त्याचे पृथक्करण झाल्यानंतर कारण स्पष्ट करता येईल असे गुरुवारी नमूद केले आहे. मत्स्य विभागाचे अधिकारी सतीश खाडे यांनी, जलाशयात काही वेगळी हालचाल घडले आहे का, की विशिष्ट भागात काही कुजले आहे हेही पाहावे लागेल. पाण्याचा रंग माशांची पोहण्याची स्थिती पाहून भाष्य करता येईल. मृत माशांचे डोळे, कातडी पाहता विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत. नदीत प्राणवायूची कमतरता आहे का याचा अहवाल विद्यापीठाकडून आल्यानंतर निष्कर्ष काढता येईल. जल प्रदूषण किंवा अन्य काही घटक जबाबदार आहेत का, हे आत्ताच स्पष्ट करता येणार नाही, असे सांगितले.

Post a Comment

0 Comments