ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थी आक्रमक
वेब टीम मुंबई : परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. तर, धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचं समोर आलं आहे.
शाळा ऑनलाईन असताना, परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल आंदोलक विद्यार्थांकडून केला जात आहे. तर विद्यार्थ्यांना भडकवण्यामागे कोणी आहे का? याचा देखील शोध घेतला जात असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर आक्रमकपणे उतरले असून, बसच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत.
धारावीत मोठ्या संख्येने विद्यार्थी जमलेले आहेत. यंदा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशी त्यांची मागणी आहे. कालच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी, परीक्षा ऑफलाईन आणि वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नाही. शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा ऑफलाईन घेण्याचं जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर देखील विद्यार्थ्यांकडून या विरोधात प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
यानंतर आज मुंबईत विविध भागातून विद्यार्थी धारावीत जमले व त्यांनी आंदोलनास सुरूवात केली. पोलीस प्रशासन या विद्यार्थ्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून, विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने, पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे.
तर, दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होतील. विद्यार्थी संख्या बरीच जास्त असल्याने ऑनलाइन परीक्षा शक्य नाही. असं राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं आहे.
0 Comments