“जीभ कापू”; तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भाजपा नेत्यांना इशारा
वेब टीम हैद्राबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांच्यावर कडाडून टीका केली आणि राज्यातील शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्याचे आश्वासन फसवे असल्याचे म्हटले. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेत्यांना आमच्याबद्दल अनावश्यक टिप्पण्या टाळा नाहीतर जीभ कापून टाकू, असा इशाराही दिला. केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की ते धान्य खरेदी करणार नाही आणि कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दुसरे पीक निवडण्यास सांगितले आहे असेही केसीआर म्हणाले.
“”मी थेट संबंधित केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना खरेदी केलेला तांदूळ घेण्यास सांगितले. ते म्हणाले की मी निर्णय घेईन आणि मला सांगेन. पण आजपर्यंत मला कोणतेही उत्तर मिळाले नाही. तेलंगणा राज्यात गेल्या वर्षीपासून आतापर्यंत सुमारे ५ लाख टन धान्य पडून आहे. केंद्र ते विकत घेत नाही, असे के चंद्रशेखर राव म्हणाले.
भाजपा प्रदेशाध्यक्षांवर आक्रमक भूमिका घेत केसीआर म्हणाले, “केंद्र म्हणत आहे की ते धान्य खरेदी करणार नाही आणि राज्यात भाजपा म्हणत आहे की ते खरेदी करेल. तुम्ही आमच्याबद्दल उद्धटपणे बोललात तर आम्ही तुमच्या (राज्यातील भाजपा नेत्यांच्या) जीभ कापून टाकू.”
बंदी संजय संजय म्हणाले होते की ते मला तुरुंगात पाठवणार आहेत. मी त्यांना मला स्पर्श करण्याचे आव्हान देतो. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका करताना केसीआर म्हणाले की, आम्ही केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आहोत.“शेती कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देऊ. शेतकऱ्यांना वाचवण्याची जबाबदारी आपली आहे. विरोधक राजकारण करुन शेतकर्यांच्या भावनांशी खेळत आहेत. तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) शेतकर्यांच्या हक्कासाठी केंद्राविरोधात आंदोलन करणार आहे,” असे चंद्रशेखर राव म्हणाले.
केसीआर यांनी केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलवरील उपकर मागे घेण्यासही सांगितले. “केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत खोटे बोलत आहे. २०१४ मध्ये कच्च्या तेलाची किंमत १०५ डॉलर होती ती आता ८३ डॉलरवर आली आहे. परदेशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत असल्याचे भाजप जनतेसोबच खोटे बोलत आहे,” असे चंद्रशेखर राव म्हणाले.
0 Comments