पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण करून खिशातील १७ हजार रुपये लांबवीले
वेब टीम पाथर्डी : पोलिस उपनिरीक्षकालाच जबर मारहाण करून त्यांच्या खिशातील १७ हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेतल्याची खळबळजनक घटना पाथर्डी शहरात घडली आहे.याप्रकरणी संबंधित पोलिस उपनिरीक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी येथील संदीप भगवान फुंदे मुंबई येथे पोलीस खात्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. सुट्टीवर गावी असताना रविवारी दुपारच्या सुमारास पाथर्डी शहरातील एका मेडिकल दुकानासमोर ते आपली चार चाकी रस्त्याच्या कडेला पार्क करत होते.त्यावेळी पाठीमागे असलेल्या बोलेरो गाडीच्या पुढील बंपरला फुंदे यांच्या गाडीचा धक्का लागला. गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून फुंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील १७ हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली.
याबाबत फुंदे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात नामदेव कोंडीराम केळगंद्रे, प्रकाश नामदेव केळगंद्रे , सचिन गोरख केळगंद्रे, अक्षय ज्ञानदेव केळगंद्रे, राहुल बापुराव त्र्यंबके , लतीफ शेख व अनोळखी तीन अशा एकूण नऊ लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
0 Comments