महात्मा गांधींना सत्तेची भूक होती म्हणणाऱ्या कंगनाला तुषार गांधींनी दिलं उत्तर

महात्मा गांधींना सत्तेची भूक होती म्हणणाऱ्या कंगनाला तुषार गांधींनी दिलं उत्तर

वेब टीम मुंबई : "गांधीवादी फक्त दुसरा गाल पुढे करतात असा आरोप करणारे भित्रट असून यासाठी लागणारं धाडस ते समजू शकत नाहीत"

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही असा दावा कंगनाने केला आहे. कंगनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका बातमीचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये महात्मा गांधी आणि इतर सुभाषचंद्र बोस यांना ब्रिटीशांकडे सोपवण्यास तयार झाले होते असा उल्लेख आहे. कंगनाने यावेळी महात्मा गांधींनी दिलेल्या अहिसेंच्या शिकवणीचीही खिल्ली उडवली होती. दरम्यान महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी कंगनाच्या या टीकेला उत्तर दिलं आहे.

“दुसरा गाल पुढे करण्यासाठी गांधींचा द्वेष करणारे समजू शकतील त्यापेक्षा जास्त हिंमत लागते,” असं तुषार गांधींनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यसैनिकांना त्या लोकांनी ब्रिटीशांच्या हवाली केलं ज्यांच्यामध्ये लढण्याची हिंमत नव्हती, मात्र सत्तेची भूक होती असं म्हणत कंगनाने महात्मा गांधींवर निशाणा साधला आहे. पुढे बोलताना तिने म्हटलं आहे की, “हे तेच लोक आहेत ज्यांनी आपल्याला कोणी एक कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा आणि अशाप्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशी शिकवण दिली. अशाप्रकारे स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते. आपले हिरो हुशारीने निवडा”.

कंगनाच्या या टीकेला तुषार गांधी यांनी लेखाच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. “दुसरा गाल पुढे करण्यासाठी गांधींचा द्वेष करणारे समजू शकतील त्यापेक्षा जास्त हिंमत लागते” (Turning the other cheek requires more courage than Gandhi-haters can fathom) असं या लेखाचं शीर्षक आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, “गांधीवादी फक्त दुसरा गाल पुढे करतात असा आरोप करणारे भित्रे असून यासाठी लागणारं धाडस ते समजू शकत नाहीत. हे धैर्य समजून घेण्यास ते असमर्थ आहेत. पण आपण विसरता कामा नये”.

“दुसरा गाल पुढे करणं हे भीतीचं लक्षण नाही. यासाठी खूप धाडस लागतं आणि हे त्यावेळीच्या भारतीयांनी मोठ्या प्रमाणात दाखवून दिलं होतं. ते सर्वजण हिरो होते, तर भित्रे लोक आपल्या डोळ्यांची पापणीही न हालवता वैयक्तिक फायद्यासाठी दयेसाठी याचना करत होते,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

“बापू भिकारी म्हणून शिक्का मारल्याचं स्वागत करतील. आपल्या देशासाठी, लोकांसाठी त्यांची भीक मागायला हरकत नव्हती. ब्रिटीश पंतप्रधानांनी अर्धनग्न फकीर म्हणून हिणवल्याचंही त्यांनी कौतुक केलं होतं. पण शेवटी याच फकिरासमोर ब्रिटीश राजवट अखेर शरण आली,” असंही तुषार गांधींनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “तुम्ही खोटं कितीही जोरात ओरडून सांगितलं आणि सत्याचा आवाज कितीही छोटा वाटत असला तरी तेच टिकतं. खोटं जिवंत ठेवण्यासाठी एकामागोमाग अनेक खोटं सांगावं लागतं. सध्याच्या घडीला काही खोट्या गोष्टी ओरडून सांगितल्या जात आहेत ज्यांना उत्तर देणं गरजेचं आहे”.

तुषार गांधी यांनी कंगनाने १९४७ ला मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती असंही म्हटलं होतं. तुषार गांधी यांनी कंगनाच्या या वक्तव्यावरही टीका केली असून, हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या शूरता आणि बलिदानाचा हा अपमान असल्याचं म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments