“खंडणीसाठीच आर्यन खानचं अपहरण केलं”, नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप!
समीर वानखेडेंच्या दाव्यावर नवाब मलिक यांचा पलटवार!
वेब टीम मुंबई : गेल्या महिन्याभरापासून आर्यन खान प्रकरणावरून मोठा वाद सुरू आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यामध्ये सातत्याने वाद सुरू आहेत. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आज नवाब मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आर्यन खानचं अपहरण करून खंडणी उकळण्याचा हा सगळा डाव असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. शिवाय या अपहरण नाट्याचे मास्टरमाईंड मोहीत कंबोज असल्याचा देखील दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
आर्यन खानला क्रूजवर बोलावण्यात आलं…
आर्यन खानला २ ऑक्टोबरच्या दिवशी क्रूजवर बोलावण्यात आलं होतं, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. “प्रतीक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यन खान क्रूजवर गेला. मोहीत कंबोज यांच्या साल्याच्या माध्यमातून हे जाळं टाकण्यात आलं. तिथे आर्यन खानला पोहोचवलं गेलं. आर्यन खानचं अपहरण करून २५ कोटींची खंडणी मागण्याचा खेळ सुरू झाला. याची डील १८ कोटींमध्ये झाली. ५० लाख रुपये उचलले देखील गेले होते. पण एका सेल्फीने खेळ बिघडवला”, असं नवाब मलिक म्हणाले आहे. के. पी. गोसावीचा आर्यन खानसोबतचा सेल्फी व्हायरल झाला होता.
मोहीत कंबोज आणि समीर वानखेडे मित्र
दरम्यान, भाजपाचे नेते मोहीत कंबोज आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे मित्र असल्याचा देखील दावा नवाब मलिक यांनी केला. “अपहणाराचे मास्टरमाईंड मोहीत कंबोज आहे. खंडणीच्या खेळात मोहीत कंबोज वानखेडेचे सहकारी आहेत. मोहीत कंबोज आणि वानखेडेचे चांगले संबंध आहेत. स्मशानभूमीत आपला कुणीतरी पाठिंबा करतंय असा दावा वानखेडेंनी केला. ७ तारखेला मोहीत कंबोज आणि वानखेडे स्मशानभूमीच्या बाहेर भेटले. तिथल्या रहिवाशांनी सांगितलं की एक गाडी आली, त्यात बॉडिगार्ड होते. एक दाढीवाला त्यांना भेटला”, असा दावा नवाब मलिक यांनी केला.
वानखेडेंचं नशीब चांगलं…
“वानखेडेंचं नशीब चांगलं की आम्हाला स्मशानभूमीच्या जवळचं सीसीटीव्ही फूटेज मिळालं नाही. तिथला सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता. या प्रायव्हेट आर्मीचे कंबोज देखील एक खेळाडू आहेत. वानखेडे या शहरात एकच खेळ खेळतात ड्रग्ज माफियांना संरक्षण दिलं जावं आणि त्यांच्याकडून खंडणी उकळली जावी. ड्रग्ज घेणाऱ्यांना अडकवून त्यांच्याकडून खंडणी घ्यावी हा खेळ ते खेळत आहेत” असा आरोप नवाब मलिक यांनी केला.
0 Comments