बाळ बोठेवर कायदेशीर कारवाई करावी !
बेनामी संपत्ती जमविल्याचा रुणाल जरे यांचा आरोप
वेब टीम नगर : राज्यात बहुचर्चित ठरलेल्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने तब्बल १ हजार २०० कोटी रुपयांची अवैध व बेनामी संपत्ती जमवली असल्याचा आरोप रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांनी केला आहे.
बोठेच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा कितीतरी अधिक पटीने जमवलेल्या बेनामी संपत्तीची चौकशी करावी व अवैधरित्या जमवलेली संपत्ती जप्त करावी,व बोठेवर कायदेशीर कारवाई करावी अशा विविध मागण्या रुणाल जरे यांनी आयकर विभागाच्या आयुक्तांकडे केल्या आहेत.
विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता :-
यासंदर्भात आयकर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,बाळ बोठे आणि पत्नी सविता बोठे यांच्या नावावर नगर, पुणे नाशिक,औरंगाबाद,सोलापूर या शहरांसह राज्यातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता असल्याची माहिती समजली आहे.
बोठे दांपत्याची मोठी गुंतवणूक :-
राज्यातील विविध शहरांमधील नामवंत रुग्णालये, गृहनिर्माण प्रकल्प, व्यापारी संकुले (रिअल इस्टेट) यामध्ये बोठे दांपत्याची मोठी गुंतवणूक असल्याची चर्चा आहे.
मोठ्या प्रमाणावर खंडणी वसूल :-
बोठेने विविध प्रकरणात लोकांना धमकावून (ब्लॅकमेलींग) मोठ्या प्रमाणावर खंडणी वसूल केली असून या पैश्यातून नातेवाईक,मित्र यांच्या नावावर काही संपत्ती घेतली असल्याचा आरोप रुणाल जरे यांनी निवेदनात केला आहे.
बोठेचा पत्रकार ते संपादक हा प्रवास पहाता,या पदांवर काम करताना बोठेला मिळत असलेल्यावेतनाचा अंदाज बांधला असता बोठेने अवैध व अज्ञात मार्गाने ज्ञात उत्पन्नापेक्षा कितीतरी अधिक पटीने संपत्ती जमा केली असल्याचा दावा जरे यांनी निवेदनात केला आहे. आपल्या पदाचा गैरवापर करून विविध प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन बोठेने अमर्याद संपत्ती गोळा केली आहे.त्यासाठी राजकीय व्यक्ती, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या सलगीचा बोठेने गैरवापर केला असल्याचा संशय निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
0 Comments