अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगात सहा नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी
वेब टीम मुंबई : सोमवारी रात्री उशिरा महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. ईडीने अनिल देशमुखांना मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. देशमुख यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात १२ तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी रात्री उशिरा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली होती. त्यानंतर आता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी विशेष न्यायालयाने अनिल देशमुख यांना सहा नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी ईडीची कोठडी सुनावली आहे.
अनिल देशमुखांना अटक करण्यात आलेले मनी लाँड्रिंग प्रकरण महाराष्ट्र पोलीस आस्थापनातील एका कथित खंडणी टोळीशी संबंधित आहे. देशमुख यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अटक करण्यात आली आहे, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. देशमुख यांनी चौकशीदरम्यान प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले, असा दावा त्यांनी केला. ईडीने देशमुख यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले आणि १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.
मुंबईच्या विशेष न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या कोठडीदरम्यान घरचे अन्न आणि औषधे मिळण्यासाठी केलेल्या अर्जाला परवानगी दिली आहे. तसेच ईडीकडून चौकशीदरम्यान अनिल देशमुखांच्या वकिलाला हजर राहण्याची परवानगीही न्यायालयाने दिली आहे.
अनिल देशमुख यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी ईडीने न्यायालयात केली होती. न्यायालयाने अनिल देशमुखला सहा नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी दिली आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयात एजन्सीच्या वतीने युक्तिवाद केला.त्याआधी अनिल देशमुख यांना सोमवारी रात्री उशिरा संचालनालयाने सुमारे १३ तासांच्या चौकशीनंतर अटक केली. मंगळवारी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले होते.
0 Comments