सरकार त्यांचे आहे म्हणून ..... वानखेडेंच्या वडिलांची प्रतिक्रिया

सरकार त्यांचे आहे म्हणून ..... वानखेडेंच्या वडिलांची प्रतिक्रिया  

वेब टीम मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या क्रूझ पार्टी प्रकरणातील पंचाने अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे  विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. ‘एनसीबी’वरील लाचखोरीच्या आरोपांमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एनसीबीने मात्र आरोप फेटाळले आहेत. दरम्यान समीर वानखेडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे नवाब मलिक यांनी ट्वीटरवर समीर वानखेडे यांच्या एका प्रमाणपत्राचा जुना फोटो शेअर केल्याने या प्रकरणाला आता आणखीन एक वळण मिळालं आहे. या प्रमाणपत्रावरुन चर्चा सुरु असतानाच आता समीर वानखेडे यांच्या वडिलांनी या फोटोसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

“माझं नाव ज्ञानदेव कचरू वानखेडे आहे दाऊद नाही. हे कोणीतरी केले असेल किंवा लिहिले असेल, याच्याबद्दल माहिती नाही. पण माझे खरे नाव ज्ञानदेव कचरू वानखेडे आहे. माझ्याकडे शाळा सोडल्याचा दाखला, पदवीचे प्रमाणपत्र, पत्नीने हिंदू पद्धतीने लग्न केल्याचे प्रमाणपत्र आहे. त्यानंतरही प्रश्न कुठून उद्भवतात हे मला समजत नाही,” असे समीर वानखेडेंच्या वडिलांनी झी चोवीस तास बोलताना सांगितले. 

तुम्ही नावात बदल केला म्हणून प्रमाणपत्रावर दाऊद असे नाव असल्याचे सांगितले जात आहे असे विचारल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हे सर्व खोटे आहे. कोणीतरी बनावट पद्धतीने हे केले आहे. सर्व कागदपत्रांवर मुलाचेही नाव समीर ज्ञानदेव वानखेडे असेच आहे. समीर वानखेडेच्या पहिल्या पत्नीच्या मुलाच्या जन्म प्रमाणपत्रावरही समीर ज्ञानदेव वानखेडे असाच उल्लेख आहे,” असे समीर वानखेडेंचे वडील म्हणाले.

“नवाब मलिके हे त्यांच्या जावयाला पकडल्यापासून मागे लागले आहेत. सरकार त्यांचे असल्याने ते काहीही करु शकतात. माझ्याकडे पुरावे आहेत. त्यांनी समोर आणलेले प्रमाणपत्र हे खोटे की बनावट आहे हे मला माहित नाही.” समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाबाबतही त्यांच्या वडिलांनी भाष्य केले आहे. तो फोटो बरोबर आहे. नियमानुसार घटस्फोट देखील झाला आहे. त्यात काही चुकीचे नाही असे समीर वानखेडेंचे वडील म्हणाले.

“हे प्रकरण संपल्यानंतर त्याला राजीनामा द्यायला सांगू. तो वकिल आहे. देशाची सेवा करण्याची जिद्द आहे म्हणून तो हे काम करत आहे. त्याच्यावर हल्ला झाला तरी हे सरकार काही करत नाही,” असे समीर वानखेडेंचे वडील म्हणाले.



Post a Comment

0 Comments