महिला अत्याचार प्रकरणात वाढ ;अश्लील बोलून विनयभंग
वेब टीम पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटना सुरूच असून, वेगवेगळ्या ठिकाणी महिला अत्याचाराचे तीन गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीन मुलीस गणपती पाहण्याच्या बहाण्याने मुलीचा विनयभंग केल्याची घटना खडकी बाजार येथे घडली, तर कोंढव्यात महिलेशी अश्लील बोलून तिचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे.
खडकी बाजार परिसरातील घटनेबाबत पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. पीडित मुलगी १३ वर्षांची आहे. ती तिच्या मावशीकडे हडपसर येथे गेली होती. त्या वेळी आरोपीची तिच्याशी ओळख झाली. तिला मोबाइलवर मेसेज पाठविला. तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिला खडकीत भेटण्यास बोलावले. त्यानंतर तिला गणपती पाहण्यासाठी घेऊन जाऊन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला; तसेच तिला सतत व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओ पाठवून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी अविराज कांबळे, शाहीद शेख, तन्वीर शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपले लग्न लपवून ठेवून आरोपीने हडपसर परिसरातील एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. महिला गर्भवती राहिल्यानंतर तिला डॉक्टरांकडे नेऊन गर्भपात केला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आशिष शैलेश सपकाळ (वय ३४, रा. लोहगाव) आणि डॉ. दत्ता खैरनार (रा. धानोरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सपकाळ याचे लग्न झाले आहे; तरीही त्याने पीडित तरुणीला त्याची माहिती दिली नाही. उलट, तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर गर्भवती राहिल्यावर गर्भपात करायला लावला. पीडित तरुणीचे काढलेले व्हिडिओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस तपास करीत आहेत.
अश्लील बोलून विनयभंग
कोंढवा परिसरात घरासमोर उभी असताना अश्लील बोलून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या महिलेचा विनयभंग केल्यामुळे तिच्या पतीने जाब विचारल्यानंतर आरोपीनी त्यांना मारहाण केली.
0 Comments