संस्था नीट न चालवल्यास सहकाराचा स्वाहाकार : विजय चौधरी
जिजामाता आदिवासी भूजलाशयीन मच्छीमार संस्थेचा शुभारंभ
वेब टीम अकोले : आपल्या राज्याला ७२० किमी चा समुद्र किनारा लाभला असून सिंधुदुर्गच्या मालवण पर्यंत मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते तिथल्या मच्छीमारांच्या बोटींतुन कर रूपाने मिळणारा महसूल काही कोटींच्या घरात आहे. आज स्थापन केलेल्या जिजामाता भूजलाशयीन मच्छीमार संस्था तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार चालली तर संस्थेची भरभराट होईल. योग्य काळात, योग्य प्रमाणात मत्स्यबीज तलावात सोडून त्याची निगा राखल्यास भरपूर उत्पादन मिळेल.तसेच मूळा नदीतील मासा अत्यंत चविष्ट आहे असे म्हंटले जाते त्याचा "ब्रँड" झाला पाहिजे . संस्था नीट चालवली नाही तर सहकाराचा स्वाहाकार होतो अशी खूप उदाहरणे आहेत असे प्रतिपादन नगर विकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी यांनी केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी समाजातील दैवतांचे पूजन करून जिजामाता आदिवासी मच्छीमारी भूजलाशयिन प्राथमिक सहकारी संस्थेच्या फलकाचे अनावरण अकोले येथील पंचायत समितीच्या सभापती उर्मिला राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. पांगरी येथील जिजामाता मच्छीमार संस्थेच्या उदघाटन प्रसंगी विजय चौधरी बोलत होते. यावेळी अकोले पंचायत समितीच्या सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख,गटनेता (भाजप) सीताराम भांगरे, पोलीस पाटील नारायण डोंगरे,संस्थेचे तज्ञ मार्गदर्शक माजी सहाय्यक आयुक्त राजेंद्र डांगरे ,जिजामाता मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष अशोक मधे, सरपंच रामदास खंडवे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी विनोद लहरे आदी मंडळी उपस्थित होती.
यावेळी प्रास्तविकात तज्ञ मार्गदर्शक राजेंद्र डांगरे यांनी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करत असतांना त्याला आधुनिकतेची जोड दिल्यास मोठी प्रगती होऊ शकते. मत्स्य बीजा बरोबरच कोळंबीचे पालन केल्यास चांगले उत्पन्न मिळते. सिप्रिनस माश्या पासून चांगले उत्पन्न मिळते मात्र एकीचे बळ मोठे असते या न्यायाने एकत्र राहून व्यवसाय करायला हवा जेणेकरून शासनाच्या सवलती मिळवता येऊ शकतील. संस्थेच्या प्रत्येक सदस्याचा २ लाखाचा विमा उतरवण्यात येणार असून, पंचायत समितीने जागा उपलब्ध करून दिल्यास सरकार कडून मोफत घरे बांधून दिली जातात मात्र या साठी गरज आहे ती सर्वांनी एकत्र राहण्याची आणि या तलावात अवैध मासेमारी करणाऱ्यांवर पोलिसी कारवाई कारण्यासंबंधी पाठपुरावा करण्यात आल्याचे डांगरे यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलतांना विजय चौधरी म्हणाले कि,आपल्याकडे रोहू, सिप्रिनस, कटला, मृगळ या माश्यांना इतकी मागणी आहे कि आपल्याकडचा माश्याच उत्पादन इतकं कमी पडत कि आंध्र परदेशातून दररोज १०० पेक्षा जास्त ट्रक मुंबईत दाखल होतात. एखाद्या डाळिंबाच्या बागेचं जितकं उत्पन्न मिळत असेल त्यापेक्षा शेततळ्यातील माश्यापासून मिळणार उत्पन्न अधिक आहे.
माश्यांची निगा कमी गुंतवणुकीत राखली पाहिजे. माश्यांसोबतच कोळंबी,वाढवली तर अधिक फायदा होईल. वास्तविक पाहता मासेमारीकरता वापरल्या जाणाऱ्या जाळीचा व्यास ४० मिमी पेक्षा जास्त असावा जेणेकरून छोटी पिल्ले जाळीतून निसटून फक्त मोठे मासेच जाळ्यात सापडतील. छोटे मासे २ महिने पाण्यात राहिल्यानंतर त्यांची योग्य ती वाढ होऊन चांगले उत्पादन मिळेल मात्र मासे मारी करणारे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करतात वास्तविक पाहता ४० मिमीच्या जाळीसाठी २५०० हजार इतका वाजवी खर्च येतो त्यातील १२५० रुपयांचे अनुदान मिळते मात्र तरीही मच्छीमार या योजनांचा लाभ घेत नाहीत. कोळंबी वाढवत असतांना ती पकडण्यासाठी विशिष्ठ प्रकारचं कौशल्य लागतं. हे कौशल्य कष्ट करण्याची तैयारी असेल तर व्यवसायात वृद्धी कराल यात शंका नाही. शासनाच्या योजनांचा योग्य पद्धतीने पाठपुरावा केल्यास त्याचा लाभ नक्की मिळेल.शासनस्तरावर त्या मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करू.संस्थेबद्दल सभासदत्व देतांना जो मूळ मच्छीमार आहे त्यालाच सभासद करा. अन्य शेतकऱ्यांनाही सभासद केल्यास त्यांचीही भरभराट होईल. संस्थेने सुरवात चांगली केली आहे. धरणात पाण्याचा मृतसाठा व्यवस्थित ठेवल्याने अडचण येणार नाही. मात्र मत्स्य उत्पादन करत असतांना सगळेच मासे एकदम काढू नका त्यामुळे पुढच्यावेळी माश्यांचा तुटवडा होऊ शकतो असे सांगतांना चौधरी यांनी जपान मधील काही उदाहरणे दिली.
जिजामाता मत्स्य व्यवसाय संस्थेला राजेंद्र डांगरेंसारखे चांगले मार्गदर्शक मिळाले त्यांच्या अनुभवाचा चांगला वापर करा. मत्स्यबीज योग्य वेळी सोडून मत्स्य शेती करा माश्यांबरोबर कोळंबीही वाढवा आज शुल्लक वाटणारा व्यवसाय उद्या चांगला फोफावल्या शिवाय राहणार नाही. ऊस,टोमॅटोला जसे चांगले पैसे मिळतात तसेच पैसे कोळंबी आणि माश्यातही मिळतात. एकीच्या बळाने संस्थेचा विकास करा,अनधिकृत मासेमारी होणार नाही याची काळजी घ्या असे सीताराम भांगरे यांनी सांगितले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती उर्मिला राऊत आणि पंचायत समितीचे उपसभापती दत्ता देशमुख यांची समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमात संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांना ओळख पत्रे देण्यात आली.संस्थचे अध्यक्ष अशोक मधे व अन्य सदस्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजेश कडाळी, देवराम पारधी,भीमा डोके,रमेश मधे,शरद खंडवे आदी उपस्थित होते.सोमनाथ मधे यांनी सुत्रसंचलन तर नारायण डोंगरे यांनी आभार प्रदर्शन केले.
0 Comments