एकादशी व्रताचे आणि विधी

एकादशी व्रताचे आणि विधी  


एकादशी व्रत - एकादशी व्रत करणे फारसे अवघड नाही. एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीस व पुढील दिवशी द्वादशीस एक वेळ जेवण घ्यावे. एकादशीचे दिवशी ईश्वराचे चिंतन,मनन व पूजन करावे.दैनंदिन कामकाज सांभाळून परमार्थ व धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्यात हा वेळ घालवावा.

व्रताचे फल : 

व्रत केल्यावर मग त्याचे फल आलेच.मनशुद्धी व आरोग्य प्राप्त होते. परमात्म्याचा लाभ होतो. हेच त्याचे फल समजावे. 

व्रताचे माहात्म्य : 

एकादशीचा उपवास करतांना सदा सर्वकाळ  ईश्वराचे ध्यान राहावे हि ज्यांची इच्छा असते ते वारकरी पंढरीच्या वारीला जातात. वारी म्हणजे पंढरीच्या दिशेनें जाणाऱ्या प्रत्येक गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. यात्रेत व वारीत  "ग्यानबा तुकाराम" या नामाक्षरांचा सारखा घोष होत असतो. यात्रेकरूंना विठ्ठल माउलीसह संतांची दर्शने घडतात व त्यांची पवित्र वाणी ऐकावयास मिळते.यात्री हरी भजनात तल्लीन होऊन जातात. त्यांचा बाहेरील जगाशी संबंध तात्पुरता तुटतो व ते ईश चरणी लीन होतात.यात्रेमुळे त्यांचे मन व शरीर शुद्ध,पवित्र होते त्यामुळे त्यांची वृत्तीही पालटते. प्रत्येक मनुष्याने आपल्या आयुष्यात एकदा तरी यात वारी अवश्य करावी. यात्रेर्तील वातावरणाचे स्मरण त्याला पुढील आयुष्यात नेहेमी होत राहील.             

एकादशी व्रत - विधी : 

दशमीच्या रात्री पूर्ण ब्रम्हचर्याचे पालन करावे भोगापासूनही दूर राहावे. एकादशीच्या दिवशी पहाटे लाकडी दातण व पेस्टचा वापर करू नये, लिंबू,जांभूळ किंवा आंब्याची पाने घेऊन चावावीत आणि बोरांनी घसा स्वच्छ करावा.झाडाची पाने तोडणेही वर्ज्य आहे, म्हणून आपोआप पडलेली पानेच वापरावीत, जर शक्य नसेल तर पाण्याने १२ चुळा भराव्यात. स्नान वैगेरे करून मंदिरात जावे. संतांची अभंग गाथा , गीतापाठ करावा किंवा पुरोहित द्वारे किंवा  सत्संगी कडून ऐकावा. कोणाचेही मन दुखावणार नाही, प्राणी , जनावरे आणि उपेक्षितांना फलाहार व अन्नादि देऊन प्रसन्न करावे. जागरण करून भजन कीर्तन करावे. संतांचे अभंग,त्यांचे चरित्र यावर चर्चा घडावी.रात्रीचे जागरण एकादशी व्रतात विशेष लाभ देतात. 

एकादशीच्या दिवशी अशुद्ध द्रव्ययुक्त पेय पदार्थ पियू नयेत. कोल्डड्रिंक्स,ऍसिड इत्यादी फळांचे डबाबंद रस खाऊ नयेत. दोन वेळा भोजन करू नये. आईस्क्रीम , तळलेले पदार्थ खाऊ नये. फळ किंवा घरात काढलेला फळाचा रस किंवा थोडे दूध किंवा पाण्यावर राहाणे हे विशेष लाभदायक आहे . व्रताच्या (दशमी,एकादशी व द्वादशी) या तीन दिवसात काशाच्या भांड्यात, मांस,कांदा,लसूण,मसूर,उडीद,चणे,कोदो (धान्य), भाजी,मध,तेल व अधिकजल यांचे सेवन करू नये. व्रताच्या पहिल्या दिवशी (दशमीला) व एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला हविष्यान्न (जव,गहू,मूग,सेंधवमीठ,काळेमिरे,साखर,व गाईचे तूप.ई) चे सेवन करावे. 

फलाहारीने कोबी,गाजर,शलगम,पालक,घोळाची भाजी इ. खाऊ नये.आंबे,द्राक्षे,केळी,बदाम,पिस्ता इ. अमृतफळांचे सेवन केले पाहिजे. 

जुगार,निद्रा,पान,परनिंदा,चुगली,चोरी,हिंसा,मैथुन,क्रोध व खोटे बोलणे,कपटादी अन्य कुकर्मापासून नितांत दूर राहिले पाहिजे. 

यथाशक्ती अन्नदान करावे किंतु स्वतः कोणी दिलेले अन्न ग्रहण करू नये,प्रत्येक वस्तू प्रभूला नैवैद्य दाखवून तुळशीदल टाकून ग्रहण केली पाहिजे. 

एकादशीच्या दिवशी एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाला,तर त्यादिवशी व्रत करून त्याचे फळ, संकल्प करून मृतकाला दिले पाहिजे आणि गंगेत अस्थीं विसर्जन केल्यानंतरही एकादशी व्रत करून व्रताचे फळ प्राण्याला अर्पण केले पाहिजे. प्राणीमात्राला अंतर्यामी परमात्म्याचा अवतार समजून कोणाशीही कपट  करू नये. कोणी आपला अपमान केला किंवा कटू वचन बोलले तरी चुकूनही क्रोध करु नये.संतोषाचे फळ नेहेमी गोड असते. मनात दया ठेवली पाहिजे. या विधीने व्रत करणाऱ्यास उत्तम फळ प्राप्त होते. द्वादशीच्या दिवशी गुरूंना,उपेक्षितांना मिष्टान्न,दक्षिणा  इ. नी प्रसन्न करून  त्यांना प्रदक्षिणा घातली पाहिजे.

२४ एकादशांची नावे : 

चैत्र           शुद्ध ११    कामदा        वद्य ११      वरुथिनी 

वैशाख       शुद्ध ११    मोहिनी       वद्य ११      अपरा 

जेष्ठ         शुद्ध ११    निर्जला       वद्य ११      योगिनी 

आषाढी      शुद्ध ११    शयनी        वद्य ११      कामिका 

श्रावण       शुद्ध ११    पुत्रदा          वद्य ११      अजा 

भाद्रपद      शुद्ध ११    परिवर्तिनी   वद्य ११      इंदिरा 

अश्विन      शुद्ध ११    पाशांकुशा   वद्य ११       रमा 

कार्तिक      शुद्ध ११    प्रबोधिनी    वद्य  ११      उत्पत्ती 

मार्गशीर्ष    शुद्ध ११    मोक्षदा       वद्य ११       सफला 

पौष           शुद्ध ११   पुत्रदा          वद्य ११       षट्तिला 

माघ          शुद्ध ११   जया           वद्य ११       विजया 

फाल्गुन     शुद्ध ११   आमलकी     वद्य ११       पापमोचनी   

टीप - दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासातील दोन एकदशीनाही नावे आहेत.अधिकमासांतील शुक्लपक्षातील एकादशीला 'कमला' व कृष्ण पक्षातील एकादशीलाही 'कमला' म्हणतात. 

हिंदू धर्माच्या प्रत्येक महिन्यात दोन वेळा एकादशी येते. एखाद्या पंधरवड्यात क्वचित,एखादी २ दिवस लागोपाठ येते. त्यापैकी पहिली स्मार्त एकादशी तर दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असे म्हणतात.श्री शंकरांनी पहिल्या पूर्ण तिथीचा स्विकार केला तर श्री विष्णूंनी दुसऱ्या शेष तिथीचा स्विकार केला. 

प्रत्येक महिन्यात २ एकादशी असतात. पहिली एकादशी पंढरपूरची तर दुसरी आपल्या गावातील मंदिराची म्हणजे आळंदी,देहू, पैठण इ, संतांच्या गावची असते. 

आरोग्यासाठी उपवास : 

उपवास हे आरोग्यासाठी सांगण्यात आलेलं आहेत आणि तेहि याच जन्मातल्या आरोग्यासाठी आहे ! आणि उपवासामुळे मिळालेले हेच खरे महत्वाचे पुण्य होय. आषाढ-श्रावण हे महिने पावसाळ्याचे असतात बाहेरची कामे व फिरणे कमी असते.सहाजिकच अपचन होण्याची शक्यता असते.शरीराला हलक्या आहाराची जरुरी असते, म्हणूनच हे महिने उपवासाचे असतात.अर्थात उपवास खाऊन पिऊन नव्हे बरं ! तर केवळ फळे खाऊन ! पण तुम्हाला खरे आरोग्याचे पुण्य हवे असेल तर खरा उपवास करावा. 

लेखक : ज्योतिष ब.वि.तथा चिंतामणी देशपांडे (गुरुजी) 

डी -३ एस -१ तेजोवलय, सिप्ला सेंटरजवळ, वारजे पुणे ५८ 

संपर्क : ९७६४६७८५७९

Post a Comment

0 Comments