माजी केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, आरोपीला अटक
कित्ती कुमारमंगलम यांचा तोंडावर उशी दाबल्यानं गुदमरून मृत्यू
वेब टीम नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री पी रंगराजन कुमारमंगलम यांच्या पत्नीची दिल्लीतील राहत्या घरात निर्घृण हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. ही घटना समोर आल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीय. तसंच आणखीन दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमारमंगलम यांच्या पत्नी किट्टी कुमारमंगलम यांची हत्या मंगळवारी रात्री वसंत विहार भागातील निवासस्थानी करण्यात आली. ६७ वर्षीय किट्टी कुमारमंगलम यांच्या तोंडावर उशी दाबल्यानंतर गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय.
या प्रकरणात पोलिसांनी कुमारमंगलम यांच्या घरी धोब्याचं काम करणाऱ्या व्यक्तीला अटक केलीय. धोबी राजू याच्यासोबत या हत्येत सहभागी असलेल्या आणखी दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. हे दोघे संशयित आरोपी सध्या फरार आहेत.
ही घटना मंगळवारी रात्री ९.०० वाजल्याच्या सुमारास घडली. घटना घडली तेव्हा घरात किट्टी कुमारमंगलम यांच्यासोबत एक मोलकरीणही होती. चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या आरोपींनी माजी केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.
किट्टी कुमारमंगलम यांच्या घरातील मोलकरणीनं आरोपींना ओळखल्याचं लक्षात येताच आरोपींनी तिलाही दुसऱ्या एका रुममध्ये बंधक बनवून बंद केलं होतं. त्यानंतर त्यांनी घरातील किंमती वस्तू लुटताना किट्टी कुमारमंगलम यांची निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती ११.०० वाजल्याच्या सुमारास पोलिसांना मिळाली.
किट्टी कुमारमंगलम यांनी सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणूनही काम केलं होतं. कुमारमंगलम यांचा मुलगा काँग्रेसचा नेता आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते तातडीनं बंगळुरूहून दिल्लीला रवाना झाला.
माजी केंद्रीय मंत्री पी रंगराजन कुमारमंगलम हे काँग्रेसचे नेते होते तसंच त्यांनी पी व्ही नरसिम्हा राव यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदही हाताळलं होतं. त्यानंतर ते भाजपमध्ये दाखल झाले. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्येही त्यांना मंत्रिपद मिळालं होतं.
0 Comments