महाराष्ट्रात "ऑप्रेशन लोटस"

महाराष्ट्रात "ऑप्रेशन लोटस"

फडणवीसांनी घेतली अमित शाह यांची भेट

वेब टीम नवी दिल्ली : राज्यामध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण या विषयावरुन तापलेलं असतानाच आज फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी ही भेट झाली असली तरी त्याची माहिती आता समोर आलीय. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ दोन तास बैठक सुरु होती. मात्र या बैठकीत नक्की कोणत्या विषयांवर चर्चा झाली यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. तरी या बैठकीमुळे भाजपाच्या मिशन कमलची तसेच फडणवीसांना पंतप्रधान मोदींच्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये संधी मिळण्यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा रंगू लागल्यात.

विशेष म्हणजे अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि फडणवीस यांच्यामध्ये फोनवरुन २० मिनिटं चर्चा झाली. दिल्लीतील या चर्चेनंतर फडणवीस तातडीने महाराष्ट्रात परतले होते. त्यानंतर महाराष्ट्रामधील भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भाजपाचे मोजके महत्वाचे नेते उपस्थित होते अशी माहिती समोर येत आहे. या बैठकीनंतर अनेक नवीन विषय राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेत आले असून यामागे ऑप्रेशन लोटससंदर्भातील शक्यताही काही जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीही एक गुप्त बैठक मंगळवारी पार पडल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासहीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.


Post a Comment

0 Comments