हिवरेबाजार मध्ये सोमवार पासून १ली ते ४ तिची शाळा सुरू
वेब टीम नगर: मार्च २०२० पासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे हिवरे बाजार मध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाला पत्र पाठवून शाळा सुरू करण्याची परवानगी मागितली पण शिक्षण विभागाने मान्यता न दिल्याने ग्रामसभा आयोजित करून ग्रामसभेने योग्य ती काळजी घेवून शाळा सुरू करण्याचा ठराव संमत केला. सोमवार दि. २१ पासून इ. १ ली ते ४ थीचे वर्ग सुरू करण्यात येणार असून कोरोना मुक्ती पॅटर्न पाठोपाठ हिवरे बाजार मधील ग्रामस्थांनी स्वतःच्या जबाबदारीवर ग्रामसभेद्वारे शाळा सुरू करण्याचा ठराव करून शाळा सुरू करण्याचा वेगळा पॅटर्न राज्यात दाखवला असल्याचे म्हणावे लागेल. ५ वी ते १० वीचे वर्ग १५ जून लाच ग्रामसभेच्या ठराव नुसार सुरू केले असल्याची माहिती उपसरपंच व राज्याच्या आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिली.
पोपटराव पवार म्हणाले की, हिवरेबाजार येथे कोरोनाचा एकही रुग्ण नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्याने कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. कोरोना रुग्ण नसल्याने ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाला पत्र पाठवून परवानगी मागितली होती.मात्र, अधिकार्यांनी जोखीम न पत्करण्याचे धोरण ठेवत मान्यता दिली नाही. त्यामुळे ग्रामसभा आयोजित करण्यात आली. त्यात योग्य ती काळजी घेऊन शाळा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकही शाळा सुरू करण्याबाबत आग्रही होते. पालकांनी स्वत:च्या जबाबदारीवर मुले शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. यावेळी ’मुले आजारी असतील अथवा घरात कोणी आजारी असेल तर मुलांना शाळेत पाठवू नका,’ असे आवाहन करण्यात आलेले आहे. पाचवी ते सातवीच्या वर्गात १८२, तर आठवी ते दहावीच्या वर्गात ११२ विद्यार्थी असून उपस्थिती सुमारे शंभर टक्के आहे. असेही ते म्हणाले.
मुलांची प्रथम दररोज आरोग्य तपासणी होते. त्यानंतर शारीरिक अंतर ठेवून मुलांना बसविले जाते. सकाळी १० ते १ या वेळेत वर्ग भरतात. शाळेत जेवणाचे डबे आणू दिले जात नाहीत, तसेच मैदानावर खेळण्यास परवानगी नाही. केवळ वर्गात बसायचे व त्यानंतर गावात कोठेही न थांबता थेट घरी जायचे असे कडक नियम लावले आहेत.
दहावीच्या परीक्षा यावर्षी झाल्या नाहीत. हिवरेबाजारच्या माध्यमिक विद्यालयाने मात्र दहावीच्या मुलांना अकरावीत अडचण येऊ नये, यासाठी त्यांची शाळेत चाळीस गुणांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा २५ जूनला होणार आहे. हिवरेबाजारच्या प्राथमिक शाळेत सात शिक्षक आहेत. त्यापैकी चार शिक्षक गावात राहतात. उर्वरित शिक्षकांनीही गावाबाहेर न जाता त्यांना कोरोना काळात गावातच राहण्याचे आवाहन गावकर्यांनी केले आहे. या शिक्षकांना योग्य त्या सुविधा पुरविण्याची ग्वाही ग्रामस्थांनी दिली आहे. - पोपटराव पवार
0 Comments