कोरोना बाधितांना म्युकर मायकोसिसचा संसर्ग
वेब टीम सुरत : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड कहर निर्माण केलेला असतानाच आता कोरोना बाधितांमध्ये म्युकर मायकोसिसचा संसर्ग पाहायला मिळत आहे. या आजारावर वेळीच उपचार न झाल्यास रुग्णांचे डोळे काढावे लागत असून सुरतमध्ये ८ जणांना आपली दृष्टी गमवावी लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गुजरातच्या सुरत शहरामध्ये म्युकर मायकोसिस या आजाराचे गेल्या१५ दिवसांत ४० पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. आज तक या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सुरतमध्ये या आजाराच्या ८ रुग्णांचे डोळे काढण्यात आले आहेत. तर बऱ्याच रुग्णांना या आजारामुळे प्राणासही मुकावं लागलं आहे.
मेंदूपर्यंत इन्फेक्शन
म्युकर मायकोसिस हे एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन आहे. नाक आणि डोळ्याला हे इन्फेक्शन होतं. आणि डोळे आणि नाकाच्या मार्गाने मेंदूपर्यंत पोहोचतं. वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास या आजाराने मृत्यू ओढवतो. एवढं हे इन्फेक्शन्स धोकादायक असतं. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी या आजाराबाबतची माहिती समोर आली होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या आजाराने अनेकांची दृष्टीच हिरावून गेतली आहे.
डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर काही रुग्णांना डोळ्यांची समस्या निर्माण होते किंवा त्यांचं डोकंदुखू लागतं. त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. या त्रासामुळे म्युकोर मायकोसिस फंगलचं इन्फेक्शन होऊ शकतं. सायनसमध्ये आधी त्रास होतो. नंतर दोन ते चार दिवसात हे इन्फेक्शन डोळ्यापर्यंत जातं. त्यानंतर २४ तासात मेंदूपर्यंत जातं. अशा परिस्थितीत रुग्णाचे डोळे काढण्याशिवाय काहीच पर्याय राहत नाही. तसे न केल्यास रुग्णाचा जीव जाऊ शकतो, असं सुरतचे ईएनटी स्पेशालिस्ट डॉ. संकेत शाह यांनी सांगितलं.
धोका कुणाला?
ज्यांची इन्युनिटी अत्यंत कमजोर आहे. त्यांना या आजाराचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे या लोकांना अधिक सतर्क राहावे लागते. या लोकांना प्रचंड डोकेदुखी होते. डोळे लाल होतात, डोळेही प्रचंड दुखतात, डोळ्यांमधून पाणी येते, डोळ्यांची हालचाल कमी होते, असं तज्ज्ञ सांगतात.
म्युकोर मायकोसिस म्हणजे काय?
म्युकोर मायकोसिस हे फंगल इन्फेक्शन आहे. हे इन्फेक्शन शरीरात वेगाने पसरते. त्याला ब्लॅक फंग्सही म्हणतात. मेंदू, फुफ्फुस आणि त्वचेवर याचं इन्फेक्शन होतं. या आजारात डोळ्यांची दृष्टीही जाते. काही रुग्णांच्या नाकाचे हाड ठिसूळ होते. वेळीच उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
0 Comments