कोविन अ‍ॅपवर आता स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय

 कोविन अ‍ॅपवर आता स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय

स्पुटनिक व्ही लसीचं बुकींग सुरु

वेब टीम नवी दिल्ली : करोनाविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हे सर्वात मोठं हत्यार आहे. त्यामुळे जगभरात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. भारतातही लसीकरणाचा वेग वाढण्यात आला असून आता १८ वर्षावरील सर्वांचं लसीकरणं होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. मात्र गेल्या काही दिवसात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी हेलपाटे मारूनही लस मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. तर अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड लसीनंतर सरकारने स्पुटनिक व्ही या तिसऱ्या लशीला परवानगी दिली आहे. स्पुटनिक व्ही लशींच्या दोन खेप भारतात पोहोचल्या असून रशियन बनावटीची पहिली लस डॉ. रेड्डीज लॅबोरेटीजच्या सदस्याने घेतली. आता या लसीचा पर्याय कोविन पोर्टलवर दिसू लागला आहे. त्यामुळे आता नागरिकांना तीन पर्याय उपलब्ध झाले आहेत.

कोविन अ‍ॅपवरून स्लॉट बुक करताना पिनकोड टाकून ऑप्शन सर्च करण्याचा पर्याय आहे. स्पुटनिक व्ही लसीवर क्लिक केल्यास आपल्याला त्याच्याशी निगडीत रुग्णालयांची यादी समोर दिसेल.

स्पुटनिक व्ही लसीचा एक डोस ९४८ रुपयांना उपलब्ध असणार आहे. त्यावर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार असल्याने एकूण किंमत ९९५ रुपये ४० पैसे इतकी असेल असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ही रशियन बनावटीची लस भारतात सरासरी हजार रुपयांना उपलब्ध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

रशियामधून पहिला साठा हा १ मे रोजी भरतात दाखल झाला. स्थानिक औषध प्रशासनाने त्याला १३ मे रोजी मान्यता दिली. पुढील काही महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यात या लसीचा साठा पाठवला जाईल. त्यादरम्यान दुसरीकडे भारतीय कंपन्यांच्या माध्यमातूनही या लसींची निर्मिती केली जाणार आहे. अनेक संशोधनांमध्ये ही लस ९० टक्के परिणामकारक असल्याचं दिसून आलं आहे.

Post a Comment

0 Comments