'सरकार मथळ्यांच्या व्यवस्थापनात व्यग्र'
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पतीची नरेंद्र मोदींवर थेट टीका
वेब टीम नवी दिल्ली : मानवता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व याच गोष्टी टिकावू ठरतात. पंतप्रधानांनी आतातरी योग्य आचरणाची निवड करायला हवी, असं म्हणत निर्मला सीतारमण यांचे पती परकाल प्रभाकर यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केलीय.
करोना संकटावर मोदी सरकारच्या धोरणावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आणि नामवंत अर्थतज्ज्ञ परकाल प्रभाकर यांनी पुन्हा एकदा कडवी टीका केलीय. 'करोना संकटकाळात लोकांना मदत करण्याऐवजी सरकार हेडलाईन्स मॅनेजमेंट आणि स्वत:चीच पाठ थोपटवून घेण्यात व्यग्र आहे' असा प्रहार प्रभाकर यांनी आपली पत्नीच अर्थमंत्री पदावर असताना मोदी सरकारवर केलाय. आपल्या यूट्यूबवर चॅनलवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओद्वारे प्रभाकर यांनी देशातील सद्य परिस्थितीवर आपलं मत व्यक्त केलंय. 'माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी अनेक रचनात्मक सूचना केल्या होत्या. परंतु, यावर केंद्रीय मंत्र्यांनी मात्र असभ्य प्रतिक्रिया दिली आणि याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला' असंही परकाल प्रभाकर यांनी म्हटलंय.
'जगात सर्वाधिक करोना संक्रमण भारतात वाढताना दिसतंय. मृत्यूदर रेकॉर्ड तोडत आहे. ही आरोग्य आणीबाणीची परिस्थिती आहे. केंद्र सरकारची तयारी आणि त्यांचं उत्तरदायित्व ओळखण्याची हीच वेळ आहे. यांना आपल्या जवळच्यांचा मृत्यू त्रासदायक वाटतो आणि इतरांचा मृत्यू यांच्यासाठी केवळ एक आकडा ठरतो', अशा शब्दांत प्रभाकर यांनी आपला संताप व्यक्त केलाय.
याचसोबत देशात दररोज जाहीर केल्या जाणाऱ्या करोना संक्रमणाच्या आकडेवारीवरही प्रभाकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 'आकडेवारीनुसार करोनाची चाहूल लागल्यापासून देशात जवळपास १.८० लाख जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. परंतु, खरा आकडा मात्र सादर करण्यात येत नाही. जाहीर करण्यात येणारे आकडे वास्तविक स्थितीहून अत्यंत कमी आहेत', असं प्रभाकर यांनी म्हटलंय.
'करोनाच्या या संकटकाळात अनेक जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. उपचार करण्यात आयुष्यभर कष्ट करून जमवलेला पै न पै खर्च होत आहे. अधिकांश लोकांना आर्थिक नुकसान भरून काढणंही शक्य होताना दिसत नाही' असं म्हणत त्यांनी देशातील सामान्य जनतेची व्यथाच व्यक्त केलीय.
'करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच करोना चाचण्यांची संख्या मात्र घटताना दिसत आहे. देशात लसीकरणाचा वेगही अत्यंत मंदावलेला आहे. रुग्णालय आणि लॅबला नमुने घेणं शक्य होत नाही. रुग्णालयांवर इतका दबाव आहे की वेळेवर चाचण्यांचा रिपोर्ट देणं त्यांनाही शक्य होताना दिसत नाही. रविवारी केवळ ३.५६ लाख चाचण्या झाल्या अर्थात आदल्या दिवसापेक्षा २.१ लाख कमी चाचण्या झाल्या. स्मशानभूमीत रांगा लागल्यात. बेड मिळवण्यासाठी मारामारी सुरू आहे. परंतु, कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा धार्मिक नेत्याला यामुळे काहीही फरक पडत नाही' असं म्हणत त्यांनी प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केलाय.
करोना संक्रमण काळातच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कशा रॅली करत आहेत, हे टीव्हीवरून दिसत होतं. दुसरीकडे कुंभमेळा सुरू आहे. स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर त्यांना जाग येतेय. काही तज्ज्ञ आणि इतर लोक ही गर्दी कशी योग्य आहे, हे समजावून द्यायची सुरूवात करतात ती तर हद्दच ठरते. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाची परिस्थिती चांगली आहे, असा तर्कही ते देतात. हे ऐकून मोठा धक्का बसतो, असं म्हणत त्यांनी निवडणूक धोरणावरही टीका केलीय.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आत्ताच ही महामारी आटोक्यात येणार नाही. अशावेळी कमीत कमी १४० कोटी डोस लसींची आवश्यकता आहे. जो वेळ रुग्णालय आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी वापरायला हवा होता त्यावेळी टाळ्या आणि थळ्या वाजवल्या गेल्या. लोकांना मदत पोहचवण्याऐवजी सरकार हेडलाईन्स मॅनेजमेंट करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री स्वत: सांगत आहेत की ९ राज्यांच्या रुग्णालयांची क्षमता घटलीय. त्यामुळेच आज अँ म्ब्युलन्सच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत, असं म्हणतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात राज्यातील सद्य परिस्थितीवर प्रभाकर यांनी बोट ठेवलंय.
आपल्याला अडचणीत आणणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं सरकारकडून टाळलं जातं. ही चुप्पी देशासमोर फार काळ टिकणार नाही. मानवता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व याच गोष्टी टिकावू ठरतात. पंतप्रधानांनी आतातरी योग्य आचरणाची निवड करायला हवी, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट टीका प्रभाकर यांनी केलीय.
मोदी सरकारवर सार्वजनिकरित्या टीका करण्याची परकाल प्रभाकर यांची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही देशाच्या ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेला 'ॲ क्ट ऑफ गॉड' अर्थात 'देवाची करणी' म्हणणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पतीचं म्हणणं मात्र वेगळंच होतं. देशातील सद्य परिस्थितीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती परकाल प्रभाकर यांनी केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरलं होतं. आपल्या पत्नीच्या 'ॲक्ट ऑफ गॉड' वक्तव्यावर प्रत्यूत्तर देताना 'कोव्हिड तर नंतर आला परंतु, आर्थिक आव्हानांचा सामना करताना कोणत्याही ठोस धोरणाचा अभाव' हे यामागचं कारण असल्याचं प्रभाकर यांनी म्हटलं होतं.
0 Comments