कोरोना महामारीत निस्वार्थ भावनेच्या रुग्णसेवेबद्दल
डॉ. रवी आरोळे यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी
पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाचे पंतप्रधान व राष्ट्रपतींना पत्र
वेब टीम नगर : कोरोनाच्या दुसर्या लाटेत हॉस्पिटलसह आरोग्य यंत्रणेमध्ये अनागोंदी माजली असताना, या परिस्थितीमध्ये निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा देऊन अनेक कोरोना रुग्णांना बरे करणारे डॉ. रवी आरोळे यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे पत्र संघटनेच्या वतीने पंतप्रधान व राष्ट्रपतींना पाठविण्यात आले असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
रेमन मॅगसेस पुरस्कारप्राप्त दिवंगत डॉ. रजनीकांत आरोळे यांच्या आरोग्य क्षेत्रातील निस्वार्थ भावनेच्या रुग्णसेवेचा वसा घेऊन त्यांचे चिरंजीव डॉ. रवी आरोळे कार्यरत आहे. जामखेड तालुक्यात ग्रामीण विकास प्रकल्पाचे जुलिया हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांची रुग्णसेवा सुरु आहे. सध्या खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना उपचारासाठी लाखो रुपये खर्च येत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शनसाठी पळापळ करावी लागत आहे. तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांना इतर ठिकाणी हालवण्याची वेळ आली आहे. अनेक रुग्णांचे कुटुंबीय हॉस्पिटलचे बील भरता भरता कर्जबाजारी झाले आहेत. तर कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीचे मृतदेह देखील बील न भरल्याने हॉस्पिटल अंत्यसंस्कारासाठी देत नसल्याचे विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये जामखेड येथील आरोळे पॅटर्न या अनागोंदीत सर्वसामान्यांसाठी जीवनदायी संजीवनी ठरला आहे. अनेक भेडीया डॉक्टर रुग्णांना लुटत असताना डॉ. आरोळे देवदूतप्रमाणे कोरोना रुग्णांना निशुल्क उपचार देत आहेत. त्यांनी ना रेमडेसिविर, ना ऑक्सिजन देता रुग्ण बरे केले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी 3 हजार सातशे रुग्णांना कोरोनामुक्त केले. दुसर्या लाटेत देखील हजारो रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. डॉ. आरोळे यांच्या सेवाभावी वृत्तीची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी अॅड. गवळी, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, कॉ.बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, वीरबहादूर प्रजापती, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.
0 Comments