हॉफकीन 'रेमेडिसिवीर' च्या निविदेला उत्पादकांच्या वाटाण्याच्या अक्षता

हॉफकीन 'रेमेडिसिवीर' च्या निविदेला उत्पादकांच्या वाटाण्याच्या अक्षता   

वेब टीम मुंबई : रेमडेसिवीर इंजक्शन मिळावे यासाठी राज्यात हजारो रुग्णांचे नातेवाईक जीवाच्या आकांताने धावपळ करत आहेत. या रुग्णांना रेमडेसिवीर मिळावे यासाठी ‘हाफकिन महामंडळा’ने सहा लाख रेमडेसिवीर खरेदीसाठी निविदा काढली होती. मात्र एकाही पुरवठादार कंपनीने निविदेला प्रतिसाद दिला नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या पार्श्वभूमीवर हॉफकीनने आज पुन्हा नव्याने दोन लाख रेमडेसिवीरचा पुरवठा व्हावा, यासाठी निविदा जारी केली आहे. दरम्यान ६६५ रुपये दराने ५७,४०० रेमडेसिवीर पुरवठ्याचे काम ज्या कंपनीला हाफकिनने दिले त्यांनी आपण हा पुरवठा आता करू शकत नसल्याचे हॉफकीन महामंडळाला कळवले आहे.

हॉफकीन महामंडळाने काढलेल्या निविदेत ६६५ रुपये प्रतिवायल दराने रेमडेसिवीर मिळत असताना मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी १५५७ रुपये प्रतिवायल दराने रेमडेसिवीर खरेदी केली. या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सुरु झाला असतानाच आता हॉफकीनला ६६५ रुपये दराने ५७,४०० रेमडेसिवीर आपण देऊ शकत नसल्याचे पुरवठादार झायडस कंपनीने म्हटले आहे. याबाबत कंपनीने हॉफकीनच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, यापूर्वी २५ मार्च च्या निविदेनुसार ( पीओ क्रमांक ४४६६) झायडस कंपनीने १,१४,२०० रेमडेसिवीरचा पुरवठा ६६५ रुपये दराने केला आहे. याच दरानुसार राज्यातील आरोग्य विभागाच्या जिल्हा रुग्णालयांनाही ४०,००० रेमडेसिवीरचा पुरवठा आम्ही केला आहे. आता देशभरातून मागणी येत असून आगामी काळातील हॉफकीनच्या नव्या निविदेत आम्ही सहभागी होण्यास इच्छुक आहोत.

हॉफकीनच्या सूत्रांनी याबाबत सांगितले की, हॉफकीनने झायडसला आधीच्या निविदेआधारे व दरानुसार ५७,४०० रेमडेसिवीर पुरवठा करण्याचे कार्यादेश जारी केले होते. नियमानुसार ते त्यांच्यावर बंधनकारक नसून मुळ निविदेनुसार त्यांनी एक लाख १४ हजार २०० रेमडेसिवीरचा पुरवठा वेळेत केलेला आहे. आता ही जादाच्या पुरवठ्याचे मागणी त्यांनी अमान्य केली आहे. दरम्यान रेमडेसिवीरची वाढती मागणी लक्षात घेऊन हॉफकीनने सात एप्रिल रोजी सहा लाख रेमडेसिवीर पुरवठ्यासाठी निविदा काढली होती. ही निविदा गुरुवारी उघडण्यात आली तेव्हा निविदेमध्ये एकही पुरवठादार सहभागी झाला नसल्याची धक्कादायक बाब आढळून आली. याची गंभीर दखल घेत वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विजय सौरभ तसेच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि हॉफकीनचे व्यवस्थापकीय संचालक संदीप राठोड तसेच अन्य अधिकार्यांनी तातडीने एक बैठक घेतली. देशभरातच करोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, छत्तीसगढ आदी अनेक राज्यांनी युद्धपातळीवर रेमडेसिवीर खरेदीसाठी प्रयत्न सुरु केले असल्याने कोणतीही एक कंपनी सहा लाख रेमडेसिवीरचा पुरवठा एकाच वेळी एका राज्याला करणार नाही, या निष्कर्षावर अधिकारी आले. 

आता मागणी जास्त असल्याने रेमडेसिवीर पुरवठादार कंपन्या जादा दर मिळतील तेथे प्राधान्याने पुरवठा करतील तसेच कमी मागणीच्या निविदांना प्राधान्य देतील हे लक्षात घेऊन दोन लाख रेमडेसिवीर पुरवठ्यासाठी निविदा काढण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार आता हॉफकीनने दोन लाख रेमडेसिवीर पुरवठ्यासाठी निविदा जारी केली आहे. एकीकडे गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान तसेच छत्तीसगढ या राज्यांनी मुंबई महापालिकेच्या दरानुसार म्हणजे १५५७ रुपये प्रतिवायल दराने रेमडेसिवीर खरेदीचा निर्णय घेतला असताना हॉफकीन महामंडळाच्या दोन लाख रेमडेसिवीर खरेदीच्या निविदेला आता प्रतिसाद मिळेल का, असा प्रश्न अधिकार्यांना सतावत आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका अभ्यास गटाने रेमडेसिवीरची वाढती मागणी तसेच कंपन्यांची पुरवठा करण्याची क्षमता तसेच रेमडेसिवीरच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन आगामी काळात साडेतीन हजार रुपये प्रतिवायल रेमडेसिवीरसाठी मोजावे लागतील असा अंदाज व्यक्त केल्याचे एका उच्चपदस्थ अधिकार्याने सांगितले.

Post a Comment

0 Comments