नगरटुडे बुलेटीन 07-04-2021
व्यावसायिकांना सायं.पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्या
काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी, प्रशासनाला सुचविले विविध पर्याय
वेब टीम नगर : मागील लॉकडाऊनमध्ये व्यापारी, फेरीवाले, पथारीवाले, हातावर पोट असणारे, सलून व्यावसायिक यांचे कंबरडे मोडले. त्यातून सावरत असतानाच दुसऱ्या लॉकडाऊनला सामोरे जाण्याची दुर्दैवाने आपल्यावर वेळ आली आहे. असे असले तरी कोरोना संदर्भातील आवश्यक ती खबरदारी घेत या सर्व घटकांना आर्थिक संघटनातून वाचविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने व्यापाऱ्यांना, दुकानदारांना सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी केली आहे.
किरण काळे म्हणाले की, आम्ही व्यापारी बांधवां समवेत आहोत. व्यापारी असोसिएशनशी देखील आम्ही चर्चा केली आहे. काँग्रेस पक्षाचा व्यापारी वर्गाला संपूर्ण पाठिंबा आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा म्हणाले की, वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय आहे.प्रशासन स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे.अनेक व्यवसायिक,व्यापारी, फेरीवाले, पथारीवाले, सलून व्यवसायिक आदींनी काँग्रेस पक्षाशी संपर्क साधला आहे. मागील लॉकडाऊन नंतर अनेकांचे बँकांचे कर्जांचे हप्ते यामुळे थकलेले आहेत. किरकोळ व्यापाऱ्यांनी घाऊक व्यापाऱ्यांकडून माल उचललेला आहे. तर घाऊक व्यापाऱ्यांनी मोठ्या कंपन्यांकडून माल उचललेला आहे. या खरेदीची देणी या व्यापाऱ्यांची बाकी आहेत. बाजारात माल विकलाच गेला नाही तर ही देणी कशी फेडायची असा प्रश्न व्यापारी बांधवांसमोर आ वासून उभा आहे.
कोरोनाची सध्याची गंभीर स्थिती लक्षात घेता तसेच व्यापाऱ्यांना आणि इतर वर्गांना देखील आर्थिक संकटातून काही अंशी आधार देण्याच्या दृष्टीने आम्ही किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला काही पर्याय सुचविले असल्याचे मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने सुचवलेले पर्याय पुढीलप्रमाणे आहेत. व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी अथवा बाजारपेठेतील तसेच ज्या-ज्या ठिकाणी व्यापारी संकुल, दुकाने आहेत अशा ठिकाणी सम-विषम प्रणालीचा उपयोग करत दुकानांच्या रांगेतील एक आड एक दुकाने सम व विषम तारखांना किमान सहा ते सात तासांसाठी उघडण्याची परवानगी देण्यात यावी. अशाच पद्धतीने फेरीवाले, हातगाडीवाले, पथारीवाले यांचे देखील नियोजन करण्यात यावे.
व्यापाऱ्यांना तसेच व्यापारी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे वयोगटाचा निकष शिथिल करत सरसकट लसीकरण करण्यात यावे. तसेच व्यापारी, हातावर पोट असणारे, किरकोळ विक्रेते, फेरीवाले, पथारिवाले, कामगार तसेच बचत गटाच्या महिला यांनी बँका, पतसंस्था, छोट्या फायनान्स कंपन्या यांच्या कडून कर्ज घेतलेली आहेत. आजमितीस मागील हप्ते देखील सुरळीत झालेले नाहीत. आताचा लॉकडाऊन सुमारे २५ दिवसांचा आहे. त्यामुळे या सर्वांना दरमहा अपेक्षित असणारे उत्पन्न येऊ शकणार नाही. सबब कर्ज पुरवठादारांची कर्ज या सर्व वर्गांना फेडणे कदापि शक्य नाही. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी बँका, पतसंस्था तसेच फायनान्स कंपन्या यांना लेखी पत्राद्वारे आदेश काढीत पुढील किमान तीन महिन्यांसाठी कर्ज वसुली न करण्याबाबतच्या सक्त सूचना द्याव्यात.
सलून व्यावसायिकांच्या प्रश्नांसंदर्भात माहिती देताना अनिस चुडीवाला म्हणाले की, सलून व्यावसायिकांचे पोट हातावर आहे. सलून व्यवसायिकांना देखील यातून दिलासा देण्याबाबत विचार होणे गरजेचे आहे. सलून व्यावसायिकांना दर ठराविक कालावधीनंतर कोरोना चाचणी करून दुकानातील कारागीर निगेटिव्ह असल्याचा अहवाल दुकानात दर्शनी भागात चिकटवण्याचा सूचना करता येऊ शकते. दुकानात असणाऱ्या क्षमतेपेक्षा ५० टक्के क्षमतेने का होईना परंतु त्यांना आपली दुकाने सुरू ठेवण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार प्रशासनाने करावा अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे.\
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नगर अर्बन बँकेतील सोने तारण प्रकरणाच्या चौकशीसाठी १२ एप्रिल पासून वंचितचे उपोषण
वेब टीम नगर : नगर अर्बन को. ऑप. बँकेच्या शेवगाव शाखेतील कथित सोने तारण प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व सामान्य शेतकरी व शेत मजुरांची फसवणूक करणाऱ्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सोमवार दि. १२ एप्रिल पासून शेवगाव शाखेच्या कार्यालयासमोर फसवणूक झालेले व्यक्तींसह बेमुदत उपोषण करणार असल्याची महिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी अहमदनगर येथे दिली.
याबाबत चे निवेदन नगर अर्बन को. ऑप. बँकेच्या प्रशासकांना सोमवारी देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल भाई शेख, तालुका संघटक शेख सलीम जिलानी तसेच फसवणूक झालेले थकबाकीदार सचिन महाजन, अशोक लोढे, गणेश भोंडे, बालाजी महाजन, अनिल निकम, संतोष झिंजे, शेषराव नवले, मच्छीन्द्र निकम, कृष्णा महाजन आदी यावेळी उपस्थित होते.
नगर अर्बन बँकेने १ एप्रिल रोजी नगर जिल्ह्यातून प्रसिद्ध होणाऱ्या एका दैनिकांमधून नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील सोने तारण कर्जदार व थकबाकीदारांची यादी नावसाहित प्रसिद्ध केली असून कर्जाची रक्कम व्याजासह १४ एप्रिल पर्यंत भरावी अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी नोटीस बजावली आहे. वास्तविक पाहता. सर्व सोने तारण कर्जदार व थकबाकी दार हे सर्वसामान्य, गरीब, शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील आहेत. त्यांनी सोने तारण कर्ज प्रकारणाबद्दल नगर अर्बन बँक कार्यालयाशी संपर्क साधून शेवगाव शाखेतील गोल्ड व्हॅल्यूअर कडून आपली फसवणूक झाली असल्याचे वारंवार लेखी स्वरूपात कळविले आहे. परंतु नगर अर्बन बँक प्रशासनाने या तक्रारीची कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही. किंवा चौकशी देखील केली नाही उलट कुठलीही चौकशी न करताच संबंधित व्यक्तींना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे संबंधित थकीत कर्जदार हवालदिल झाले असून त्यातील एका व्यक्तीने मागील महिन्यात आत्महत्या केली आहे. एवढे हे प्रकरण गंभीर आहे.
या सर्व थकबाकीदारांची फसवणूक करणाऱ्या शेवगाव शाखेतील अधिकारी, कर्मचारी व गोल्ड व्हॅल्यूअर यांचे एक रॅकेट आहे. या कर्जदार थकबाकीदारांना विश्वासात घेऊन या रॅकेटने पद्धतशीरपणे त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे या थकीत सोने तारण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. बँकेच्या नियमानुसार एका व्यक्तीला किती सोने तारण पावत्या करता येतात, परस्पर नूतनीकरण करता येते काय ? सगळ्या सोने तारण च्या वस्तु एक सारख्याच कशा ? (ब्रासलेट, बांगडी) असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करावी.
अन्यथा बँक प्रशासनाने चौकशी न करताच सरसकट कारवाई केल्यास थकीत कर्जदारांना व ज्यांची सोने तारण प्रकरणात फसवणूक झाली आहे, अशा सर्व थकबाकीदारांना आत्महत्येशिवाय पर्यायच उरणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची सक्षम अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करूनच पुढील कारवाई करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. १२ एप्रिल पासून कोरोना प्रतिबंधक सर्व नियम व अटी पाळून थकीत कर्जदार नगर अर्बन बँकेच्या शेवगाव कार्यालयासमोर बेमुदत प्राणांतिक उपोषणास बसणार आहेत. याची गंभीरपणे नोंद घ्यावी अशी मागणी नगर अर्बन बँक प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रति माहितीसाठी मुख्यमंत्री, सहकार मंत्री, सहकार आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, पोलीस निरीक्षक व शाखा व्यवस्थापक यांना पाठविण्यात आल्या आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला विभागात किरकोळ विक्रीस बंदी
गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार बाजार समितीचा निर्णय
वेब टीम नगर : कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोठी येथील कै.दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला विभागात जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार किरकोळ विक्रीस बंदी करण्यात आली आहे. भाजीपाला विभागात किरकोळ खरेदी करणार्या ग्राहकांनी गर्दी न करण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती आभिलास घिगे, उपसभापती संतोष म्हस्के व फळे- फुले भाजीपाला असोसिएशनच्या सर्व सभासदांनी केले आहे.
कै.दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला विभागात सकाळी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सदर ठिकाणी किरकोळ विक्री होणार नसून, बाजाराच्या आवारात किरकोळ विक्रीसाठी गर्दी करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मार्केट कमिटीच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच सर्व मार्केट मधील गाळेधारकांना शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे सांगण्यात आले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
विडी कारखाने सुरु ठेवण्याची विडी कामगारांची मागणी
लाल बावटा कामगार युनियनच्या (आयटक) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन
वेब टीम नगर : हातावर पोट असलेल्या विडी कामगारांना घरी विडी बनवण्यासाठी तंबाखू व पाने देण्याकरिता विडी कारखाने सुरु ठेवण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे लाल बावटा कामगार युनियनच्या (आयटक) वतीने देण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, इंटकचे कविता मच्चा, विनायक मच्चा उपस्थित होते.
विडी कामगार हातावर पोट असलेले श्रमिक कष्टकरी आहेत. घरच्याघरी विडी बनवून ते कारखान्यात देऊन मजुरीवर आपला उदरनिर्वाह करीत असतात. विडी बनविण्यासाठी कारखान्यातून त्यांना पाने व तंबाखू हा कच्चा माल घ्यावा लागतो. शहरात दोन मोठे विडी कारखाने असून, त्यांच्या माध्यमातून हजारो विडी कामगार आपला उदरनिर्वाह करीत आहे. विडी कारखाने बंद ठेवल्यास हजारो विडी कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. राज्य सरकारने कारखाने सुरू ठेवण्याचे व आवश्यक कामगार संख्या ठेवण्याचे निर्देश दिले आहे. तरी शहरातील विडी कारखाने विडी कामगारांना माल घेण्यासाठी व बनवलेल्या विड्या देण्यासाठी सुरु ठेवण्याची मागणी लाल बावटा कामगार युनियनच्या (आयटक) वतीने करण्यात आली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अन्यथा रस्त्यावर येऊन भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा
लॉकडाऊनला आरपीआय (गवई गट) चा विरोध : सर्व दुकानांना नियमांचे पालन करून उघडे ठेवण्यास परवानगी द्यावी
वेब टीम नगर : राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने विरोध दर्शवून या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तर सर्व दुकानांना नियमांचे पालन करून उघडे ठेवण्यास परवानगी देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. राज्य सरकार सर्वसामान्यांना भिकेला लावत असल्याचा आरोप करुन, राज्य सरकारने सर्वसामान्यांचा विचार न केल्यास रस्त्यावर येऊन भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, शहर संघटक आफताब भागवान, पवन भिंगारदिवे, जमीर इनामदार, शहर उपाध्यक्ष जावेद सय्यद, संतोष पाडळे आदी उपस्थित होते.
राज्य सरकारने मंगळवार (दि.६ एप्रिल) पासून मिनी लॉकडाऊन करुन जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ येणार आहे. सर्वच बाजारपेठा, सलून व इतर व्यवसाय बंद केल्याने तेथे काम करणार्या लाखो कामगारांचा रोजगार बुडणार असून, या निर्णयामध्ये बदल करणे आवश्यक आहे. मागील लॉकडॉऊनने आधीच सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. त्यांच्यावर कर्जाचे डोंगर असून, विविध व्यवसाय व कामधंदे बंद करुन ते आपला उदरनिर्वाह करीत आहे. परत राज्य सरकारने लॉकडाउन केल्याने त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अनेक व्यवसायिक, कामगारांनी गृह कर्ज, खाजगी कर्ज, वाहन कर्ज तसेच बचत गटाचे कर्ज घेतले आहे. त्यातून सर्वसामान्यांना बाहेर पडणे अवघड होणार आहे. जे भाडेकरू आहेत त्यांची अवस्था बिकट होणार आहे. मागील टाळेबंदीत थकलेले घर भाडे अद्यापि टप्प्याटप्प्याने भरले जात आहे. लॉकडाऊन करण्यापूर्वी राज्य सरकारने सर्वसामान्यांचा विचार केलेला नसून, या लॉकडाऊनने सर्वसामान्यांना भीक मागण्याची वेळ नक्कीच येणार आहे. हातावर पोट असणार्या गरीब कुटुंबातील व्यक्तीला कोणत्याही कारणाने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली तर त्यांना भीक मागण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. राज्य सरकारने घेतलेले कठोर निर्णय शिथील करुन सर्वसामान्यांना व गोरगरीब जनतेचा विचार करुन सर्व दुकानदारांना नियमांचे पालन करुन व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बँकांनी स्वखर्चाने कर्मचार्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करावे
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स एम्प्लॉईज युनियनची मागणी
वेब टीम नगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स एम्प्लॉईज युनियनने जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकाकडे कर्मचार्यांकरीता बँकच्या खर्चाने कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी दिली.
केंद्र सरकारने नुकतेच बँक कर्मचार्यांना कोरोना योद्धे म्हणून घोषित केले आहे. बँकिंग सेवा हि अत्यावश्यक सेवा आहे. या सेवा प्रकारात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे बँक कर्मचार्यांना दडपणाखाली काम करावे लागत आहे. या बाबींचा विचार करून बँकांनी आपापल्या बँक कर्मचार्यांकरीता कोरोना लसीकरण मोहिम राबवावे. जेणेकरून ग्राहकांना सेवा देताना कर्मचार्यांवर दडपण राहणार नाही. सर्व बँकांचे व्यवस्थापन कर्मचार्यांच्या हिताकरीता नक्कीच सकारात्मक निर्णय घेऊन त्यांचे लसीकरण करतील अशी आशा युनियनचे अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी व्यक्त केली. या मागणीचे निवेदन जिल्ह्या सहकारी बँक, अ.नगर मर्चंटस बँक, शहर बँक, अंबिका महिला बँक, संगमनेर मर्चंटस बँक, कोपरगाव पिपल्स बँक, भिंगार बँक आदि बँकांना देण्यात आले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मोची गल्ली व्यापारी असोसिएशनचा मिनी लॉकडाऊनला विरोध
बंद दुकाना समोर उभे राहून व्यापारी व कामगारांनी केला निर्णयाचा निषेध
सोमवार ते शुक्रवार सर्व नियमांचे पालन करुन व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी
वेब टीम नगर : मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारने केलेल्या मिनी लॉकडाऊनला मंगळवारी बंद दुकान समोर उभे राहून व्यापारी व कामगारांनी विरोध दर्शविला. तर या निर्णयाचा निषेध नोंदवून सोमवार ते शुक्रवार सर्व नियमांचे पालन करुन व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोची गल्लीतील दुकान मालक व कामगार फिजीकल डिस्टन्ससह नियमांचे पालन करुन उपस्थित होते.
मागील वर्षी झालेल्या टाळेबंदीमुळे व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हळहळू अर्थचक्र रुळावर येत असताना पुन्हा मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली लॉकडाऊनच करण्यात आले आहे. शहरातील कापड बाजार, मोची गल्ली ही मुख्य बाजारपेठ आहे. यामध्ये विविध दुकाने असून, हजारो कामगार आपला उदरनिर्वाह करीत आहे. राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तू वगळून सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इतर दुकानातील व्यापार्यांचा दिवाळा निघणार आहे. तर या दुकानात काम करणारे हजारो कामगारांचा रोजगार हिरावला जाणार आहे. कोरोनाची साखळी बाजारपेठा बंद करुन तुटणार आहे का? हा प्रश्न उपस्थित करुन यामुळे मोठ्या प्रमाणात अर्थचक्र बिघडणार असल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केली. तर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७ वाजे पर्यंत व्यापार्यांना नियमांचे पालन करुन आपला व्यवसाय करु देण्याची मागणी करण्यात आली आहे. शनिवार व रविवारच्या टाळेबंदीत व्यापारी स्वत:हून बंद ठेवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ओबीसी व्ही जे एन टी च्या पदाधीकाऱ्यानी दिला 'त्या' व्यावसायिकाला दिलासा
वेब टीम भिंगार : गवळीवाडा येथील सलुन व्यावसायिक संतोष गायकवाड याने शासनाचा सलून बंदचा आदेश अमान्य करत आत्मबलिदानाचा इशारा काल सोमवारी दि, ५ रोजी दिला होता. मात्र त्यांनी हा निर्णय मागे घेत परिस्थिती मान्य करण्याचे आश्वासन पोलिस प्रशासनाला दिल्याने गायकवाड याच्यावरची कारवाईही टळली आहे .ओबीसी व्ही जे एन टी ने तातडीने मुख्यमंत्र्याना निवेदन पाठविल्याने या व्यावसायिकाला दिलासा मिळाला.
या संदर्भातील माहिती समजताच ओ बीसी व्हिजेएनटी जनमोर्चाचे शहरजिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ ,सदस्य राजेद्र पडोळे व पत्रकार राजेश सटाणकर यांनी भिंगारला जावुन गायकवाड यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली जनमोर्चाचा माध्यामातुन हा विषय आणि सलुन कारागीराचा प्रश्न शासनाच्या दरबारी माडंला जाणार असुन तसे आश्वासन जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी गायकवाड यांना दुरध्वनी वरुन दिले.परिस्थितीची कल्पना भुजबळ यांनी.सानप यांना दिली.राज्य सरकारला निवेदन देण्यांचे यावेळी सानप यांनी सुचविले त्याप्रमाणे मुख्यमंत्री ,पालकमंत्री आणि संबधिकांना निवेदन पाठविण्यात आले आहे .यावेळी झालेल्या चर्चेत शिवसेनेचे अशोक जाधव ,भैरुप्पा मेजर उपस्थित होते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हाधिकारी साहेब दिलेला शब्द पाळा महापालिकेवर जबाबदारी टाकून पळ काढू नका
नितीन भुतारे : महानगरपालिकेवर आमचा विश्वास नाही सर्वात मोठी भ्रष्टाचार कंपनी
वेब टीम नगर : खाजगी हॉस्पिटल मधील कोरोना आजारावर उपचार घेतलेल्या रुग्णाची वाढीव बिलांची रक्कम परत मिळावी तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत खाजगी हॉस्पिटल शासन नियम डावलत असुन कुठल्याही प्रकारे शासन नियम दराप्रमाणे बिले दिली गेली जात नसल्यामुळें रुग्णांना पुन्हा लाखों रुपयांची बिले हे सर्व सामान्य जनतेला भरावी लागत असल्यामुळे मनसेच्या वतीने नितीन भुतारे यांनी जिल्हाधिकारी व महानगर पालिका आयुक्तांना निवेदन दिले.
निवेदन देण्याचे कारण काल सोमवार दिनांक ५/०४/२०२१ लॉक डाऊन बाबत पत्रकारांशी संवाद साधताना. खाजगी हॉस्पिटल मधील वाढीव बिलांची तपासणी तसेच मागील वाढीव बिलांची रक्कम परत देण्याबाबचा निर्णप्रक्रियेत महानगरपालिका आयुक्त पाहतील त्यांच्या अधिकाऱ्यानं मार्फत या पुढे चोकशी करुण कारवाई केली जाईल. असे सांगितले त्यामुळे मनसेच्या वतीन जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन २३/०१/२०२१ च्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या दौऱ्यात मनसेकडून होणारे आंदोलनं मागे घ्यावे. यापुढे खाजगी हॉस्पिटलची वाढीव बिलांची रक्कम परत मिळवून देण्याची जबाबदारी माझी असा शब्द जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिला होता. त्यामुळे आपण दिलेला शब्द पाळा तसेच वाढीव बिलांची रक्कम परत मिळवून देण्याची जबाबदारी आपलीच आहे त्यातुन तुम्ही पळ काढू नका खाजगी हॉस्पिटल च्या डॉक्टरांना पाठीशी घालू नका. या पुढे हि सर्व जबाबदारी महानगर पालिकेवर सोपवली तर वाढीव बिलांची रक्कम परत सर्व सामान्य जनतेला लवकर मिळणार नाही . महानगर पालिका हि भ्रष्टाचार करणारी मोठी कंपनी आहे त्यामुळे त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. आजही खाजगी हॉस्पिटलची वाढीव बिलांची तक्रार आमच्याकडे येत आहे परंतू महानगरपालिकेचे यावर कुठलेही नियंत्रण नाही सरकारी बेड फुल झाल्यामुळे खाजगी हॉस्पिटल मध्ये सर्वसामान्यांना उपचार करावे लागत आहे. ईतर रुग्णांच्या बिलांची रक्कम एकुण काही सर्वसामान्य रुग्ण घरीच उपचार घेत आहे. महानगरपालिकेच्या अश्या हलगर्जी पणामुळे आपण खाजगी हॉस्पिटलच्या वाढीव बिलांच्या तक्रारी चोकशी समिती आपल्या उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्याकडेच अंतर्गत ठेवावी त्यांच्यामुळेच आजपर्यंत १ कोटी २२ लाख रूपये एवढी वाढीव बिलांची वसुल पात्र रक्कम खाजगी हॉस्पिटल मधील बिलांच्या चौकशी मुळे समोर आली त्यामुळे आपण मनसेला दिलेला खाजगी हॉस्पिटलचा वाढीव बिलांची तपासणी तसेच पैसे परत मिळवून देण्या चा शब्द पाळा दिलेल्या शब्दाला जागा. आज कोरोना च्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती पाहता. मनसेचे प्रशासनाला सहकार्याची भूमिका आहे परंतू अशीच जर खाजगी हॉस्पिटलची लूटमार चालु राहिली तर आंदोलनं हे काही मनसेला नविन नाहि त्यामुळे या सर्व परिस्थितीवर आपण बारीक लक्ष्य द्यावे आजही अनेक रुग्णाची खाजगी हॉस्पिटल मध्ये पिळवणूक होत आहे अनेकांना डिस्चार्ज देण्यात आला परंतू पैश्या अभावी त्यांना डिस्चार्ज घेता येत नाही त्यामुळे पुन्हा वाढीव बिलाची चौकशी करुण खाजगी हॉस्पिटल मध्येच बिलांच्या चोकशी साठी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी तसेच मागील राहिलेल्या वाढीव बिलाची वसुल पात्र रक्कम आपण दिलेल्या शब्दा प्रमाणे संबंधित रुग्णांचा नागरिकांच्या बँक खात्यात जमा करावी अश्या मागणीचे निवेदन मनसेच्या वतीन जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांना देण्यात आले. तसेच महानगर पालिका आयुक्तांना सुध्दा निवेदन देण्यात आले आहे.
या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेन्द्र राशीनकर, उपजिल्हाध्यक्षमनोज राऊत, महिला जिल्हाध्यक्ष अॅड अनिता दिगे, तसेच सर्व उपशह राध्यक्ष्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments