उद्धव ,राज यांच्यात कोरोनामुळे संवाद

 उद्धव ,राज यांच्यात कोरोनामुळे  संवाद 

 वेब टीम मुंबई : राज्यात करोना संकट गडद झालेलं असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे बंधू तसेच मनसे अध्यक्ष

राज ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा सुसंवादाचा पूल बांधला जात आहे. लागोपाठ दोन दिवस हे दोन्ही नेते एकमेकांशी बोलले. रविवारी फोनवरून तर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात संवाद झाला. 

राज्यात करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन सारखा कठोर निर्णय घ्यावा लागल्यास सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी राज ठाकरे यांना फोनवरून केले होते. त्यानंतर कालच राज्य सरकारने कठोर पावले टाकली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यात ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावण्याबाबत तसेच वीकेंडला कडक लॉकडाऊन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्याअनुषंगाने गाइडलाइन्सही जारी करण्यात आल्या. या गाइडलाइन्स पाहता एकप्रकारे ३० एप्रिलपर्यंत राज्यात मिनी लॉकडाऊनसारखीच स्थिती राहणार आहे. या पार्श्वभूमीवर राज यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली.

उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात झूम मीटिंगद्वारे संवाद झाला. जवळपास २० मिनिटं ही चर्चा झाली. यावेळी राज यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे तसेच मनसेचे नेते संदीप देशपांडे हेसुद्धा उपस्थित होते. या संवादाचा एक फोटो मनसेने ट्वीट केला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्याशी टाळेबंदी, निर्बंध व उपाययोजना या मुद्द्यांवर दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा केली, असे ट्वीटमध्ये नमूद केले आहे. चर्चेचा तपशील हाती आला नसला तरी राज हे अनेक मुद्दे कागदावर उतरवूनच चर्चेला बसले होते व त्यांनी हे मुद्दे मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रातील करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. अशा स्थितीत आपलं सहकार्य राहावं, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोनवरील संवादात केली होती. त्यानंतर मनसेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून राज्यातील जनतेला आवाहन करण्यात आलं होतं. आपण सर्वांनी सरकारी सूचनांचं पालन करावं. सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करावं, असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments