परिचारिकेकडून उकळली १२ लाखाची खंडणी
वेब टीम अमरावती : आक्षेपार्ह सीसीटीव्ही फुटेज प्रसारित करून एका इसमाने शहरातील एका खासगी रुग्णालयातील परिचारिकेला ब्लॅकमेल केले आणि तिच्याकडून तब्बल १२ लाख रुपये खंडणी उकळली. पैसे घेतल्यानंतर तिच्याशी लगट साधण्याचा प्रयत्न करून अश्लिल चाळे केल्याची घटना उघडकीस आली .या कृत्याची तक्रार पीडीत ४६ वर्षीय परिचारिकेने गाडगेनगर पोलिस ठाण्यात १२ मार्चला दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी मंगेश त्र्यंबकराव चौधरी (रा. पार्वतीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही महिला एका खासगी रुग्णालयात हेड नर्स म्हणून नोकरी करत आहे. २०१२-१३ मध्ये तिचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. या रुग्णालयात असताना, तिचे प्रियकरासोबतचे आक्षेपार्ह सीसीटीव्ही फुटेज मंगेशने एका बाहेरील व्यक्तीसोबत शेअर केले. या फुटेजच्या आधारे मंगेश व त्याच्या सहकाऱ्याने या हेड नर्सला ब्लॅकमेल करून २५ लाखांची मागणी केली. दरम्यान १२ लाख रुपयांत ही तडजोड झाली. एका प्रतिष्ठीत डॉक्टरच्या मध्यस्थीतून हे प्रकरण मिटवले.
परंतु २०१६ मध्ये मंगेशने पुन्हा पीडीत महिलेशी लगट साधण्याचा प्रयत्न केला. तिच्या घरी जाऊन अश्लिल चाळे केले. तसेच हे आक्षेपार्ह सीसीटिव्ही फुटेज पेनड्राईव्हमध्ये देऊन एका पत्रकाराशी व्यवहार केल्याची माहिती पीडितेला मिळाली. त्यामुळे पीडितेने गाडगेनगर पोलिस ठाणे गाठून मंगेश चौधरीविरुद्ध तक्रार दिली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
0 Comments