नगरटुडे बुलेटिन ०६-०३-२०२१

 नगरटुडे बुलेटिन ०६-०३-२०२१

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सरकारी कामगार हॉस्पिटल एमआयडीसीहद्दीतच व्हावे  


कामगार संघटना महासंघ, कामगार हॉस्पिटल कृती समिती : एमआयडीसी कार्यालयाने सहकार्य करावे 

वेब टीम नगर : कामगार संघटना महासंघ आणि कामगार हॉस्पिटल कृती समितीच्या वतीने नुकतीच एमआयडीसी कार्यालयाचे क्षेत्र व्यावस्थापक  लोंढे ए.एम. यांची भेट घेण्यात आली. यावेळी संघटीत असंघटीत कामगार, उद्योजक आणि परिसरातील जनता यांच्यावतीने त्यांना मागणीपत्र देण्यात आले.

या मागणीपत्रात म्हटले आहे की, एमआयडीसीमधे हजारो संघटीत, असंघटीत कामगार बांधव कार्यरत आहेत. त्याप्रमाणे शेकडो कार्यालयीन कर्मचारी आणि उद्योजक आहेत. या सर्वांच्या सोयीसाठी एमआयडीसी हद्दीमधे जागा उपलब्ध असतानाही अद्यापपावेतो अत्यंत महत्वाची गरज असुनही सरकारी हॉस्पिटल झालेले नाही. हि खेदाची बाब आहे. यासारख्या ॲमेनिटीसाठी उपलब्ध असलेल्या राखीव व खुल्या जागा काही भुखंड तस्कारांनी संगनमताने खोटीनाटी कागदपत्रे करून बळकावल्या आहेत काय ? हा प्रश्न आहे. हे प्रकरण राज्यभर गाजले आहे. याविषयी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात खटले दाखल होते.

कामगार हॉस्पिटल कृती समिती आणि कामगार संघटना महासंघ मिळुन गेल्या चार/पाच वर्षांपासुन विविध पातळीवर याविषयी संघर्ष करत आहेत. सरकारी कामगार हॉस्पिटल एमआयडीसी हद्दीमधेच व्हावे जेणेकरून येथील कामगार, कर्मचारी व उद्योजकांना अपघातानंतर त्वरीत उपचार मिळेल. सरकारी कामगार हॉस्पिटल एमआयडीसीहद्दीमधेच व्हावे यासाठी आपल्या कार्यालयाने सहकार्य करावे. हॉस्पिटलसाठी उपलब्ध असलेल्या सांभाव्य जागा कुठे कुठे आहेत त्यावर आपण सामुहिक स्थळभेट देऊन पाहणी करून तसा सरकार दरबारी सकारात्मक अहवाल द्यावेत.

यावेळी एमआयडीसी कार्यालयाचे टेकाळे उपस्थित होते. या शिष्टमंडळात कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष कॉ.प्रा.डॉ.महेबुब सय्यद, सेक्रेटरी भैरवनाथ वाकळे, सहसेक्रेटरी रामदास वागस्कर तसेच कामगार हॉस्पिटल कृती समिती अध्यक्ष दिपकराव शिरसाठ, सेक्रेटरी महादेव पालवे, सहसेक्रेटरी अरूण थिटे तसेच क्रांतिसिंह कामगार संघटनेचे बाळासाहेब सागडे, प्रशांत चांदगुडे, महादेव भोसले, आसाराम भगत, नानासाहेब खरात, वैभव कदम आदी उपस्थित होते.

अहमदनगर एमआयडीसीमधे सरकारी कामगार हॉस्पिटल त्वरीत सुरू करावे यासाठी कामगार संघटना महासंघ व कृती समिती येत्या काळात मोठे आंदोलन करणार आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हिंदू बहिण वारसा कायदा रक्षा बंधन कार्यक्रम जारी

शेत जमीनी सावकाराच्या तावडीतून सोडविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भूमाता ब्रिगेडचा पुढाकार

वेब टीम नगर : खाजगी सावकार शेतकर्‍यांच्या अशिक्षित पणाचा गैरफायदा घेऊन लाटत असलेल्या शेत जमीनी सावकाराच्या तावडीतून सोडविण्यासाठी २००५ साली बदल करण्यात आलेल्या हिंदू वारसा कायद्याचा आधार घेत पीपल्स हेल्पलाईन व भूमाता ब्रिगेडच्या वतीने हिंदू बहिण वारसा कायदा रक्षा बंधन कार्यक्रम जारी करण्यात आला असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्याशी सदर प्रश्‍नी बोलणे झाले असून, वडिलांच्या संपत्तीत कायद्याप्रमाणे बहिणीला भावाप्रमाणे समान वाटा मिळण्यासाठी तर सावकाराकडे अडकलेल्या जमीनी मुळ शेतकर्‍यांना परत मिळण्याकरिता पुढाकार घेण्याचे कळविले असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी सांगितले आहे.

भारतात १९६५  साली हिंदू वारसा कायदा अस्तीत्वात आला. या कायद्यानुसार वडिलोपार्जीत संपत्तीमध्ये मुलाला वडिलांएवढा हिस्सा देण्यात आला. मात्र यामध्ये मुलींचा हिस्सा टाळण्यात आला. स्त्री-पुरुष असमानता दर्शविणार्‍या या कायद्यामध्ये सन २००५ साली केंद्र सरकारने बदल करुन बहिण-भाऊ यांना वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार दिले. मागील वर्षी २०२० साली सर्वोच्च न्यायालयाने लग्न करुन गेल्यानंतर देखील बहिणीचा हिस्सा वडिलांच्या संपत्तीत असल्याचे स्पष्ट केल्याने हा निवाडा क्रांतीकारक ठरला आहे. यामुळे धनदांडगे व सावकारांनी अशिक्षित शेतकर्‍यांचा फायदा घेत जमीन लाटण्याचा प्रयत्न केला. मात्र बहिणीचा हिस्सा विचारात न घेतल्यानी त्यांचा हा व्यवहार पुर्ण होऊ शकलेला नाही. बहिणीच्या हिस्सा विचारात न घेता करण्यात आलेले १२ वर्षा आतील सर्व व्यवहार रद्द करुन बहिणीला जमीनीची मालकी व अधिकार मिळण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली आहे. 

धनदांडगे व सावकाराकडे गेलेल्या शेत जमीनीचा अधिकार या काद्यान्वये परत घेण्याचा अधिकार बहिणीला मिळणार आहे. तर सावकाराच्या मुसक्या आवळल्या जाणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. हिंदू बहिण वारसा कायदा कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी, तहसिलदार व पोलीस अधिकारी यांना राखी बांधून या कायद्याची अंमलबजावणी करुन सावकारापासून संरक्षण मिळण्याची मागणी केली जाणार आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बालकांवर वाढते अत्याचार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती महत्त्वाची 

न्यायाधीश कल्पना पाटील : तक्षिला स्कूलमध्ये बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

वेब टीम नगर : समाजात बालकांवर वाढत असलेले अत्याचार रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये जागृती होण्याच्या दृष्टीकोनाने तक्षिला स्कूलचे विद्यार्थी व पालकांसाठी बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्या (पॉक्सो अ‍ॅक्ट) विषयी वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राईट टू फुड अ‍ॅण्ड एज्युकेशनची माहिती देऊन विद्यार्थी व पालकांमध्ये जागृती करण्यात आली.

या वेबीनारमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तथा न्यायाधीश रेवती देशपांडे व जिल्हा न्यायाधीश कल्पना पाटील मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. समाजात बालकांवर होणार्‍या अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृतीची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे आपली काळजी घ्यावी व जागृक रहावे हे सांगण्याहेतुने या वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास हाच शाळेचा विकास हे ध्येय ठेऊन शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्राचार्या जयश्री मेहेत्रे यांनी सांगितले.

रेवती देशपांडे यांनी योग्य आहाराने शरीराचे स्वास्थ्य उत्तम राहते, शरीराचे स्वास्थ्य उत्तम असल्यास तो विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात प्रगती करु शकत असल्याचे सांगून, त्यांनी आहाराचे महत्त्व व शिक्षण यांचा संबंध व्यक्त केला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारचे अन्नघटक आहारामध्ये समाविष्ट करावे, अन्नाची नासाडी टाळावी असे आवाहन केले. तसेच शिक्षणाचे महत्त्व सांगून, मुलांना शिक्षणाचा मुलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले.

न्यायाधीश कल्पना पाटील यांनी बालकांवर वाढते अत्याचार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये या विषयाची माहिती व समज देखील महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यांनी बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (पॉक्सो) या विषयी बोलताना सेक्शन ७ व ११ यानुसार शरीराच्या कुठल्याही भागाला स्पर्श केल्यास त्याचबरोबर दुसर्‍याला अश्‍लील चित्र पाठविणे, अश्‍लील हावभाव करणे व बोलणे हे या काद्यातंर्गत गुन्हा ठरत असल्याचे सांगितले. तसेच शरीराला चांगला स्पर्श, वाईट स्पर्श म्हणजे काय? याबद्दल माहिती दिली. एखाद्या व्यक्तीकडून वाईट स्पर्श होत असल्यास तात्काळ पालक, शिक्षक किंवा जवळच्या मित्र-मैत्रिणींना सांगण्याचा सल्ला दिला. काही चुकीची गोष्ट झाल्यास निसंकोचपणे १०९८ या चाईल्ड लाईनच्या हेल्पलाइ नंबरवर संपर्क साधण्याचे सांगितले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वेबीनारद्वारे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेबीनारला विद्यार्थ्यांसह पालकांचा चांगला प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुबिना शेख यांनी केले. आभार तन्वीर खान यांनी मानले. वेबीनार यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी  सहकार्य केले.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एड्स जनजागृती : शालेय विद्यार्थ्यांचा स्पर्धेस उत्सफुर्त प्रतिसाद

निबंध व पोस्टर स्पर्धेत कार्ले आणि गायकवाड प्रथम

वेब टीम नगर :  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, जिल्हा रुग्णालय अहमदनगर, नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालयात एड्स जनजागृती पंधरवडा कार्यक्रमातंर्गत एड्स जनजागृतीवर निबंध व पोस्टर स्पर्धेस शालेय विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. या निबंध स्पर्धेत किर्ती कार्ले तर पोस्टर स्पर्धेत मिलिंद गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

एड्स जनजागृतीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- निबंध स्पर्धा प्रथम- किर्ती कार्ले, द्वितीय- भक्ती काळे, तृतीय- तन्मय गावखरे, उत्तेजनार्थ- ओमकार रोकडे, पोस्टर स्पर्धा प्रथम- मिलिंद गायकवाड, द्वितीय- तन्मय गावखरे, तृतीय- ऋतूजा गावखरे, उत्तेजनार्थ- भक्ती काळे. निबंध स्पर्धेचे परिक्षण प्रा.रंगनाथ सुंबे तर पोस्टर स्पर्धेचे परिक्षण उत्तम कांडेकर यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक चंद्रकांत भवर, प्रा.रंगनाथ सुंबे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे यांनी परिश्रम घेतले. जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, लेखापाल सिध्दार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जामखेड तहसील कार्यालयासमोर आंदोलन

वेब टीम जामखेड  : केंद्र सरकारने जाहीर केलेले शेतकरी व कृषी विरोधी ३ काळे कायदे रद्द करावेत व देशातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड.डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड येथील तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिष पारवे, लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, सामाजिक कार्यकर्ते अरुण डोळस, मच्छीन्द्र जाधव, विशाल जाधव, विशाल पवार, बाळ गव्हानचे सरपंच कृष्णा खाडे, उप सरपंच राहुल गोपाळ घरे, योगेश सदाफुले, राकेश साळवे, दिपक माळी, नामेश धायतडक, कुंडल राळेभात, देवा देवकर, संदिप धायतडक, दिनेश ओहोळ आदी कार्यकते या आंदोलनात सहभागी झाले होते. 

वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खा. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आवाहाणानुसार केंद्र सरकारच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ५ मार्च रोजी राज्यभरातील तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड.डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वा. जामखेडच्या तहसिल कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे तालुक्यातील कार्यकर्ते जमले. त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

केंद्र सरकारने केलेले कायदे देशातील शेतकऱ्यांना व कृषी क्षेत्राला उध्वस्त करणारे व भांडवल शाहीचा पुरस्कार करणारे आहेत. ते कायदे मागे घ्यावेत यासाठी गेल्या ४ महिन्यांपासून देशातील शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करीत आहेत. पाऊस, वादळ, वारा व थंडी आणि आता उन्हाळ्याच्या तोंडावर या आंदोलन कर्त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. तरी केंद्र सरकार या आंदोलन कर्त्यांचे दखल घेत नाहीत. त्या केंद्र सरकारवर ॲड.डॉ. अरुण जाधव यांनी जोरदार टीका करीत निषेध व्यक्त केला. 

तालुका प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार जे. व्ही जायकर यांनी निवेदन स्वीकारले. व आपल्या भावना सरकारपर्यंत पोहचवू असे सांगितले. बापू ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. अतिष पारवे यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

श्रीक्षेत्र धरमपुरीत श्रीसंत गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा

     वेब टीम नगर : प्रति शेगांव समजल्या जाणार्‍या नगर तालुक्यातील इसळक-निंबळक येथील श्री क्षेत्र धरमपुरीत श्रीसंत गजानन महाराजांचा प्रकटदिन साध्या पद्धतीने पण शासकीय नियम पाळून भाविकांनी उत्साहात साजरा केला.

     पहाटे श्रींच्या मूर्तीस रुद्राभिषेक करण्यात आला. मोजक्याच भाविकांनी तीन दिवस केलेल्या पारायण सोहळ्याची सांगता झाली. प्रथा म्हणून १० ते १५ भाविकांनी पालखी प्रदक्षिणा घालून मंदिर परिसरातून छोटी  मिरवणूक काढली.

     याप्रसंगी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर डॉ.महेश मुळे यांनी भाविकांना कोरोनाला घाबरु नका पण शासनाने दिलेले नियम आवश्य पाळा. लस आली तरी कोरोनाचे गांभिर्य लक्षात ठेवा. मास्क, सॅनिटायझर, स्वच्छता पाळा व प्रतिकार शक्ती वाढेल असा आहार घ्या, असे आपल्या व्याख्यानातून सांगितले.

     भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. गर्दी टाळण्यासाठी यावर्षी महाप्रसादाची जेवणावळी न ठेवता फक्त बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीक्षेत्र धरमपुरी भक्तवृंदांनी विशेष परिश्रम घेतले. भाविकांनी स्वत:हून सहकार्य केले.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

करोनाची दुसरी लाट  लवकर दूर व्हावी यासाठी राजस्थानी बहू मंडळाच्य वतीने विशाल गणपतीची महाआरती

वेब टीम नगर : भाजपच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांचे नगरमध्ये आगमन झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी नगरच्या राजस्थानी बहू मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करून दुसऱ्यांदा आलेल्या कोरोनाचे सावट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात महाआरती करून साकडे घातले. यावेळी राजस्थानी मंडळाच्या वतीने अध्यक्षा गीता गिल्डा यांनी महिला दिनानिमित्त उमा खापरे यांचा सत्कार केला.

      राजस्थानी बहु मंडळाच्या उपक्रमांची माहिती देतांना गिल्डा गिल्डा म्हणाल्या, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे आज सक्षमपणे काम करत महिलांपुढे आदर्श निर्माण केला आहे. म्हणून आज त्यांचा कर्तुत्वान महिला म्हणून महिला दिनानिमित्त सत्कार केला आहे. नगर शहरात अनेक वर्षापासून राजस्थानी बहु मंडळ सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत सन उत्सव साजरे करत आहे. शासनाच्या सर्व नियामंचे पालन करत आम्ही आता आमच्या परिसरातील आणि आमच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना कोरना संबंधी काळजी घेण्याचे सर्व नियम पाळण्यासाठी जागृती करत आहोत. तसेच मंडळाच्या वतीने सत्यमेव जयते या ग्रामला लवकरच भेट देवून महिला दिनानिमित्त अनाम प्रेमच्या दिव्यांग मुलींना भेटवस्तू देणार आहोत. त्याच बरोबर माहेश्वरी महिला संघटनेच्या वतीनेही अनाम प्रेमच्या सत्यमेव जयते ग्रामच्या स्वयंपाक घरासाठी लागणाऱ्या मोठ्या भांड्यांचा  संच भेट देणार आहेत.

      यावेळी उमा खापरे यांनी राजस्थानी बहु मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून करोनाच्या संकटात जास्तीतजास्त सामाजिक कार्य करावे असे आवाहन केले.

      यावेळी राजस्थानी बहु मंडळाच्या सदस्या शोभा सोनी, सुनीता मणियार, वंदना काकाणी, ललिता झंवर, सीमा बंग, सुरेखा मणियार, माधुरी सारडा, लीला लढ्ढा, श्रद्धा बंग, संगीता बिहाणी, अर्चना लढ्ढा, शीतल लढ्ढा, कल्पना जाखोटिया, चंदा बंग, मनीषा डागा, अल्का कलाणी, शोभा सोनी यांच्या सह यावेळी भाजपा प्रदेश संघटन सरचिटणीस दिपाली मोकाशी, सरचिटणीस सुरेखा विद्दे, प्रदेश कोषाध्यक्षा शैला मोकळ, प्रसिद्धी प्रमुख मनीषा जैन, कोमल काळभोर, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा अंजली वल्लाकटी आदी उपस्थित होत्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

''ठाणे ते श्री क्षेत्र शेगाव'' सायकल प्रवासातून  प्रमोद वैशंपायन यांचे पर्यावरण विषयी जनजागृती मोहीम          

                                

वेब टीम नगर : पर्यावरण प्रेमी इंजिनिअर प्रमोद वैशम्पायन यांनी ठाणे ते श्री क्षेत्र शेगाव सायकल प्रवास करून गावोगावी ग्राम विकासाची संकल्पना मांडत आहे.दररोज १५ ते २० किलोमीटर सायकल प्रवास करतात.वड,पिंपळ,उंबर,कडू लिंब,चिंच आदी वृक्षाचे महत्व सांगून गावोगावी भेट देऊन झाडे लावा ,झाडे जगवा,पृथ्वी प्रदूषण मुक्त करा असा संदेश देत आहेत.सैन्द्रिय शेती,जलसंपदा,वन संपदा,गो संपदा या विषयावर परिसंवाद करून शेतकरी व ग्रामस्थांना विषमुक्त शेती करून सैंद्रीय पद्धतींनी पारंपरिक शेती व्यवसाय केल्यास येणाऱ्या पिढी साठी सुदृढ आरोग्य लाभेल.यासाठी मार्गदर्शन करीत आहेत.                                                         

शेण खत व गांडूळ खत तयार करून शेती केल्यास जमिनीचा पोत सुधारतो.तसेच गावोगावी वृक्षारोपण करून शाळेतील मुलांना वृक्षारोपणाचे महत्व सांगत आहेत.नगर जिल्ह्यातील कर्जुले हर्या,टाकळी ढोकेश्वर,भाळवणी,खातगाव टाकळी,निमगाव घाना,हिंगणगाव,नेप्ती,नगर असा प्रवास त्यांनी केला आहे.आय आर बी कम्पनी द्वारे नगर -पूना रस्ता चौपदरीकरण करण्यात आला.या कम्पनीचे त्यांनी अधीक्षक अभियंता म्हणून काम केले आहे.नगर येथे माणिकनगर येथे ते वास्तव्यास होते.नगरच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------                                                                    


Post a Comment

0 Comments