वर्षाची शेवटची रात्र , ठरली तिच्यासाठी काळरात्र

 वर्षाची शेवटची रात्र , ठरली तिच्यासाठी काळरात्र 

वेब टीम मुंबई :  मुंबईतील खार मध्ये नवीन वर्षाच्या पार्टीत दोघांनी आपल्याच मैत्रिणीची हत्या केल्याचा प्रकार घडलाय. जान्हवी कुकरेजा असे हत्या झालेल्या १९ वर्षीय तरुणीचे नाव आहे. खार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत पार्टीमध्ये सहभागी झालेल्या श्री जोगधनकर आणि दिया पडणकर यांना अटक केली आहे. ही घटना मुंबईतील खार येथील भगवती हाइट्समध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववर्षाची ही पार्टी या बिल्डिंगच्या टेरेसवर ठेवण्यात आली होती. या पार्टीत जान्हवी आणि अटक करण्यात आलेले दोघे जण यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी या दोघांनी जान्हवी कुकरेजाला मारहाण केली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून श्री जोगधनकर आणि दिया पडणकर यांना अटक करण्यात आली आहे. १९ वर्षाची जानवी कुकरेजा ह्यूमन सायकोलॉजीची विद्यार्थीनी होती.

 माहितीनुसार, पार्टीत झालेल्या भांडणानंतर दोघांनी जान्हवीला मारहाण केली.  मारल्यानंतर जान्हवीच्या डोक्यातून रक्त आल्यानंतर श्री आणि दिया तिथून पळाले. या मारहाणीत श्री आणि दियाला देखील दुखापत झाल्याची माहिती आहे. दिया ही जान्हवीच्या शेजारी राहते. मात्र तिनेही या घटनेबाबत कुणाला सांगितले नाही. पोलिसांनी सांगितलं की माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. त्या मुलीला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या पार्टीत १० ते १२ लोक सहभागी झाले होते. चौकशीनंतर श्री आणि दियाविरोधात गुन्हा नोंदवत त्यांना अटक करण्यात आलं आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

या घटनेची माहिती कळताच मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त अभिषेक त्रिमुखे खार पोलीस ठाण्यात पोहोचले. दरम्यान घटनेनंतर जान्हवीच्या आईनं म्हटलं आहे, जान्हवी फारच भोळी होती. तिची हत्या करणाऱ्यांना कडक शिक्षा केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments