आरोग्य आहार
शाही कोफ्ता पुलाव
साहित्य : दोन वाट्या बासमती तांदूळ, दोन वाट्या मटार , एक वाटी तिरका चिरलेला श्रावण घेवडा, एक वाटी गाजराचे तुकडे.
कोफ्ता साहित्य : पाव किलो खवा, एक मोठा उकडलेला बटाटा , एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर, दोन हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, ५-६ लसूण पाकळ्या वाटून, मीठ, मिरपूड चवीनुसार. कोफ्ते तळण्याकरता दोन टेबलस्पून तूप, पाव चमचा शहाजिरे, ३-४ लवंगा, ३-४ हिरवे वेलदोडे, २ दालचिनीचे तुकडे, ४-५ काळे मिरे, २ मोठे कांदे उभे चिरू, मुठभर काजू ,२५ ग्रॅम बेदाणे.
कृती: पाव किलो खवा, १ उकडलेला बटाटा घालून श्रीखंडाच्या यंत्रातून गाळून घ्यावा त्यात एक चमचा कॉर्नफ्लोअर, वाटलेला आल , मिरची , लसून घालाव. चवीनुसार मीठ , मिरपूड घालावी. हलक्या हाताने ४०-४२ छोटे गोळे करावे. तुपात तळावेत. तुपात गोळे फुटू लागल्यास थोडा कॉर्नफ्लोअर जास्त घालावा .
निम्मा चिरलेला कांदा व काजू तळून बाजूला ठेवावे. जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून जिरे , वेलदोडे , लवंगा, दालचिनी घालून फोडणी करावी व त्यात उरलेला कांदा घालून परतावा त्यावर भाज्या घालून परतावे. धुवून निथळून ठेवलेले तांदूळ घालून परतावे , तांदळाच्या दुप्पट उकळते पाणी घालून चवीनुसार मीठ घालावे . पातेल्या खाली तवा ठेऊन मंद आचेवर पुलाव शिजू द्यावा.
पुलाव सर्व्ह करतांना वरून तळलेले कोफ्ते , काजू व कांदा घालून गार्निश करावे.
टीप :
* खव्याचे कोफ्ते खूप हलके होत असल्याने पुलाव शिजतांना घालू नयेत, नाहीतर कोफ्ते फुटतात .
* कोफ्ते करतांना गोळ्यात काजू , बेदाणे आवडत असल्यास घालावेत.
0 Comments