नगर बुलेटीन
नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या प्रयत्नातून
कापड बाजारातील मस्ज़िदचा मनपाचा कर माफ
वेब टीम नगर : कापड बाजार येथील बोहरी समाजाची मस्ज़िद आहे. या मस्ज़िदला महानगरपालिकेने वाणिज्य दराप्रमाणे आकारलेला कर व त्यावर लावलेली शास्तीबाबत बोहरी मस्ज़िदच्या पदाधिकार्यांनी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना याबाबत माहिती दिली. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी यात लक्ष घालून संबंधितांकडून माहिती घेऊन नियमाप्रमाणे जादा आलेला कर माफ करुन दिला. याबाबतचे पत्र नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी बोहरी समाजाचे धर्मगुरु शेख औनअली डुंगरपुरवाला यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी परेश लोखंडे, जमातचे सेक्रेटरी शेख अब्बासभाई, कमिटी मेंबर शेख हुसेनभाई, जोहेरभाई, शब्बीरभाई, सैफीभाई व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले, कापड बाजार येथील बोहरी समाजाच्या मस्ज़िद मध्ये फक्त धार्मिक कार्यक्रम होतात. त्यांचा व्यवसायिक वापर नसल्याने मनपाने चुकीच्या पद्धतीने संकलित कर आकारण्यात आला होता. वास्तविक पाहता मनपा अधिनियमन 132(1) (ब) प्रमाणे फक्त धार्मिक कार्य होत असलेल्या ठिकाणी अशा पद्धतीने कर आकारणी करता येत नाही. याबाबत आम्ही मनपाकडे कायदेशिररित्या सातत्याने पाठपुरावा करुन चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेला कर मागे घेण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे नगरमधील कोणतेही धार्मिकस्थळ जसे मंदिर, मस्ज़िद, गुरुद्वारा, चर्च आदिंचा वापर जर व्यवसायिक होत नसेल तर त्यांचाही कर कमी करण्यासाठी आमच्याशी किंवा मनपाशी संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.
याप्रसंगी शेख अब्बासभाई म्हणाले, शासनाच्या नियमाप्रमाणे धार्मिक स्थळांचा जर वापर व्यवसायिक होत नसले तर त्यांना त्याप्रमाणे कर आकारले जातात. परंतु या मस्ज़िद ट्रस्टला व्यावसायिक दराने मनपाने कर व शास्ती आकारली होती. याबाबत कायदेशीर बाबी लक्षात घेऊन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना याबाबत सांगितले, त्यांनी मनपाकडे पाठपुरावा करुन हा जादा कर कमी करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे यापुढील काळात मस्ज़िद नियमाप्रमाणे नियमित कर भरले, असे सांगून याकामी मदत केल्याबद्दल बोराटे व मंगलताई लोखंडे यांचे आभार मानले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पो.नि.नितीन गोकावे यांची सुपा येथे झालेली बदली रद्द करावी
उद्योजक महेश भांबरकर यांची पोलीस महासंचालक यांच्याकडे मागणी
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भिंगारच्या पाणीप्रश्नासाठी दि २१ रोजी कॅंटोन्मेंट बोर्ड वर मोर्चा
वेब टीम भिंगार : भिंगारच्या सदरबाजार मधील सर्व नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला पाणीपट्टी वेळेवर भरून सुद्धा पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नाही वर्षातून १०० ते १२० दिवस पाणी अपुरे व कमी दाबाने सोडले जाते ,त्यामुळे पिण्यासाठी व वापरासाठी पाणी विकत घ्यावे लागते हक्काचे पाणी मिळत नाही , आज कॅंटोन्मेंट बोर्ड त्यांच्या पदाचा गैरवापर करून सर्व जनतेला नाहक वेठीस धरत आहे .
आपल्या शांततेचा व सहनशीलतेचा कॅंटोन्मेंट बोर्ड गैरफायदा घेत आहे .त्यासाठी आपण सर्वजण वार्डभेद ,राजकीय पक्ष मतभेद विसरून एकजूट होऊन कॅंटोन्मेंट बोर्ड ला जाब विचारण्यासाठी तसेच नियमित पुरेशा दाबाने भरपूर पिण्याचा पाणीचा पुरवठा होण्यासाठी सोमवार दि २१-१२-२०२० रोजी कॅंटोन्मेंट बोर्ड कार्यलयावर मोर्चा काढण्यात येणार आहे .तरी आपण आपल्या हक्कासाठी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महेश नामदे व प्रकाश लुणिया यांनी केले आहे तसेच भिगार व सदरबाजार मधील सर्व लहान मोठे व्यापारी ,भाजीपाला व्यवसायिक ,चहा व्यवसायिक ,टपरी चालक आदी सर्वानी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत आपली दुकाने ,व्यवसाय बंद ठेऊन निषेध करण्यासाठी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहेत सोमवार दि २१-१२-२०२० रोजी सकाळी ११ वाजता सर्वानी श्री मारुती मंदिर भिंगार वेशीजवळ जमा व्हावे यावेळी सर्वानी सुरक्षित अंतर ठेऊन व मास्क लावून या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन महेश नामदे व प्रकाश लुणिया यांनी केले आहेत .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ 'वंचित'चे
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
वेब टीम नगर : महाराष्ट्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरुस्ती करणारा अध्यादेश त्वरित काढावा व विधान सभेच्या हिवाळी अधिवेशनात शेती मालाला हमीभाव मिळण्यासाठी तरतूद करावी यासह शेतकऱ्यांच्या इतर मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार झालेल्या या आंदोलनात पक्षाचे प्रवक्ते तथा प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण, आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सह समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, महासचिव योगेश साठे, जेष्ठ सल्लागार जीवन पारधे, उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, बाळासाहेब कांबळे, चंद्रकांत नेटके, नंदकुमार गाडे, दत्तात्रय अंदुरे, ज्ञानदेव उच्छे, चंद्रकांत डोलारे, संतोष गलांडे, योगेश सदाफुले, बन्नू भाई शेख, सुनील बाळू शिंदे, फिरोज पठाण, भीमराव चव्हाण, सुरेश खंडागळे, वसंत नितनवरे, प्यारेलाल शेख, रवींद्र म्हस्के, अतिष पारवे, सोमनाथ भैलुमे, महेंद्र थोरात तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे स्वप्निल मोकळ, प्रकाश भालेराव, भूषण चव्हाण, संतोष कांबळे, आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. या धरणे आंदोलनास राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष उदमले, युवक अध्यक्ष बाळासाहेब केदारे यांनी जाहीर पाठिंबा दिला.
शेतकरी विरोधी जुलमी कायदे मंजूर करणाऱ्या केंद्र व राज्य शासनाचा निषेध करीत हे जुलमी कायदे रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. शेतमालाची वाहतूक करण्यासाठी मुख्यतः भारतीय रेल्वेचा वापर होतो. या भारतीय रेल्वेचे खाजगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा इरादा आहे. खासगीकरणामुळे शेती मालाची वाहतूक प्रचंड खर्चिक होईल व सर्व सामान्य ग्राहकांवर वाढीव दराचे ओझे लादले जाईल. यामुळे रेल्वेच्या खासगीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने ताबडतोब रद्द करावा. दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या आजच्या शेतकरी बांधवांच्या आंदोलनाने भारतीय रेल्वेच्या खासगीकरणा ला व मोदी सरकारच्या सर्व सार्वजनिक सेवांच्या खासगीकरणाला विरोध करण्याची भूमिका घ्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले व या शेतकरी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा जाहीर करण्यात आला.
केंद्र सरकारने लॉक डाऊनच्या काळात कुठलीही चर्चा न करता शेती संबंधी ३ नवीन कायदे संसदेत केवळ संख्या बळाच्या आधारावर मंजूर करून घेतले आहेत. या नवीन विधेयकामुळे भारतीय शेतकरी देशोधडीला लागणार आहे. जागतिकीकरण व मागून येणाऱ्या खासगीकरणातून शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल भावाने विकत घेण्याची मुभा आणि त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करण्याचा राजमार्ग या नवीन विधेयकात आहे. या कायद्या विरोधात दिल्ली येथे देशातील शेतकरी न भूतो न भविष्यती असे आंदोलन करीत आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून गुरुवार दि. १७ डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, समस्थ बहुजन समाजातील सर्व शेतकरी व जनता सहभागी होऊन हा काळा कायदा रद्द व्हावा म्हणून विरोध दर्शविण्यासाठी धरणे आंदोलन या लोकशाही मार्गाने प्रयत्न करीत आहे.
आपल्या मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले. धरणे आंदोलना दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी प्रतिक बारसे, अरविंद सोनटक्के, संतोष गलांडे, स्वप्निल मोकळ यांची भाषणे झाली.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शिक्षण क्षेत्रातील कोहिनूर हिरा म्हणून रमाकांत काठमोरे जिल्ह्याला लाभले
बाबासाहेब बोडखे : शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांचा शिक्षकांच्या वतीने सत्कार
वेब टीम नगर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांचा शासकीय विश्रामगृह येथे प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक परिषदेचे नेते व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी काठमोरे यांचा सत्कार केला. तसेच उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे यांची शिक्षणाधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा देखील माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे यांनी सत्कार केला. यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रामदास हराळ, अजिंक्य झेंडे, दिलीप बोठे, बद्रीनाथ शिंदे, बोडखे, सावंत आदि शिक्षक उपस्थित होते.
राज्य सरकारने पदोन्नतीचे आदेश जारी केले असून, काठमोरे यांची औरंगाबाद येथे महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेच्या शिक्षण उपसंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे. बाबासाहेब बोडखे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रातील कोहिनूर हिरा म्हणून रमाकांत काठमोरे जिल्ह्याला लाभले. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. शेतमजूरांच्या विद्यार्थ्यांची फी भरण्यापासून ते स्कॉलरशिपचा अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन व कार्यशाळा घेण्याचा उपक्रम हाती घेतल्याने त्यांनी पदभार घेतल्यापासून गुणवत्तेत १०टक्क्यांनी वाढ झाली. तर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना कला-गुणांना वाव मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे चित्रकला व काव्यांचा समावेश असलेली पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. टाळेबंदीत ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोन नसलेले गरिब विद्यार्थी तसेच गावाकडे मोबाईल रेंजची समस्या असल्याने स्वाध्याय पुस्तिका वाटपाचा उपक्रम हाती घेऊन शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या हातात स्वाध्याय पुस्तिका आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकासान होण्यापासून वाचले. या उपक्रमशील शिक्षणाधिकारी यांची पदोन्नती झाली असून, शिक्षण क्षेत्रात ते निश्चितच उत्कृष्ट कामगिरी बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या वतीने
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर कामगारांची निदर्शने
महागाई निर्देशांकानुसार वेतनवाढ मिळण्याची मागणी
वेब टीम नगर : अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत संपली असताना नवीन करार करुन महागाई निर्देशांकानुसार ८ ते १२ हजार रुपया पर्यंत वेतनवाढ मिळण्याच्या मागणीसाठी लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात युनियनचे अध्यक्ष सतीश पवार, लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, भाकपचे राज्य सहसचिव अॅड. कॉ. सुभाष लांडे, उपाध्यक्ष संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचारणे, सुनिता जावळे, बबन भिंगारदिवे आदिंसह कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ट्रस्ट व युनियनचा वेतनवाढीचा करार २०१७ रोजी झाला होता. त्याची मुदत मार्च२०२० मध्ये संपली आहे. कोरोना महामारीचे कारण पुढे करुन ट्रस्ट कामगारांना वेतनवाढ देण्यासाठी आडमुठीपणाची भूमिका घेत असून, वेतनाच्या फक्त ७ टक्के वेतनवाढ करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. सदर प्रकरणी महागाई निर्देशांकनुसार ८ते १२ हजार रुपया पर्यंत वेतनवाढ युनियनने सहा कामगार आयुक्तांकडे दाद मागितली आहे. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात तीन तारखा होऊन देखील ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित राहिलेले नाही. हा प्रश्न त्वरीत सोडविण्यासाठी कामगारांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. गुरुवार (दि.१७ डिसेंबर) ची तारीख एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याने देखील कामगारांनी संताप व्यक्त करुन गुरुवारीच ट्रस्टच्या विश्वस्तांना बोलवून चर्चा घडवून आनण्याचे स्पष्ट केले. युनियनच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांच्याशी कामगारांच्या विविध प्रश्नावर चर्चा केली. सहाय्यक कामगार आयुक्त राऊत यांनी सकारात्मक दृष्टीने चर्चा करुन कामगारांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन देत ट्रस्टच्या विश्वस्तांशी संपर्क साधून त्यांना तारखेला बोलवले, तरी देखील विश्वस्त उपस्थित राहिले नाही. ही बैठक शुक्रवारी पुन्हा बोलवण्यात आली आहे.
अॅड. कॉ.सुधीर टोकेकर म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात कामगारांनी ट्रस्टच्या विश्वस्तांना समजून घेतले. महागाईच्या काळात जगण्यासाठी कामगारांना पुरेश्या प्रमाणात वेतन मिळणे आवश्यक आहे. मात्र पगार वाढ न करणे व आडमुठीपणाचे ट्रस्टचे धोरण कामगारांना मान्य नाही. कोरोना काळात ट्रस्ट खरेदी व्यवहार करतात, मात्र कर्मचारी वर्गासाठी पगार वाढ न देणे हे अन्यायकारक आहे. ट्रस्टने इतर खर्च कमी केल्यास कामगारांना पगारवाढ देणे सहज शक्य होणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. अॅड. कॉ.सुभाष लांडे यांनी कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्न सोडविण्यासाठी विश्वस्तांनी चर्चेला आले पाहिजे. किमान वेतन, सेवा शाश्वती, सेवा पुस्तक आदि विविध हक्काच्या मागण्यांसाठी कामगारांचा हा संघर्ष असून, वेळ पडली तर कामगार न्यायालयात देखील दाद मागणार असल्याचे सांगितले. युनियनचे अध्यक्ष सतीश पवार म्हणाले की, अवतार मेहेरबाबा ट्रस्ट बाबांचे नांव घेऊन कामगारांवर अन्याय करीत आहे. न्याय हक्काच्या मागण्यांसाठी ट्रस्टचे कामगारांना रस्त्यावर येण्याची वेळ आनली आहे. कामगारांना किमान जगता यावे व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येण्यासाठी वेतन पुरेश्याप्रमाणात देण्याची कामगारांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पाथर्डीतील ज्योती गायके खून प्रकरण सीआयडी कडे वर्ग करण्याची मागणी
दीड वर्ष होऊन देखील आरोपी सापडत नसल्याने कुटुंबीयांची न्यायासाठी प्रतिक्षा
वेब टीम नगर : ज्योती सर्जेराव गायके खून प्रकरणात पाथर्डी पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी रमेश काशीराम रत्नपारखी व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी केलेल्या तपासाबाबत समाधानी नसून, दीड वर्ष होऊन देखील आरोपी सापडत नसल्याने हा तपास सीआयडी कडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी गायके कुटुंबीयांनी मागील दोन दिवसापासून पोलीस अधिक्षक कार्यालया समोर उपोषण सुरु केले आहे. यावेळी सर्जेराव गायके, गणपत गायके, सामाजिक कार्यकर्ते विश्वास वैरागर आदि कुटुंबीय सहभागी झाले आहेत.
गायके कुटुंबीयांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ज्योती गायके यांच्या खून प्रकरणावर पडदा टाकण्याच्या उद्देशाने आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांकडून आर्थिक तडजोड करून खुनाचा तपास करणेकामी दिरंगाई केली आहे. त्यामुळे मयत ज्योती हिचा खून करणारे मारेकरी कायद्याच्या कचाट्यातून मोकळे सुटले आहेत. अनेक वेळा पाथर्डी पोलीस स्टेशन तसेच अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात न्याय मिळावा या मागणीसाठी अधिकारी वर्गाला भेटून आरोपींना अटक करण्याची वारंवार मागणी केलेली आहे. तरीही पोलिस यंत्रणा कारवाई करीत नाही. त्यामुळे पाथर्डी पोलिसांच्या एकूण भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. तपासी अधिकारी यांच्या अकार्यक्षमतेमुळे आरोपी समाजात सर्रासपणे फिरत आहे. संशयित आरोपींनी पोलीसांशी आर्थिक तडजोड केली असल्याचा आरोप गायके कुटुंबीयांनी केला आहे. आरोपी हा विषय सोडून द्या, तडजोड करून हे प्रकरण मिटवून टाका, नाहीतर तुमची सुद्धा ज्योती सारखीच गत होईल अशा पध्दतीच्या धमक्य देत आहे.
सदर खुनाचा तपास जलदगतीने व्हावा म्हणून तपासी अधिकारी रत्नपारखी यांना भेटण्यास गेलो असता तेच कुटुंबीयांना धमकावून पोलीस स्टेशनला येऊ नका, या प्रकरणात मला फोन करू नका, आम्हाला एवढाच उद्योग नाही अशा प्रकारे बोलून आम्हास पोलीस स्टेशन बाहेर हाकलून देत असल्याचा अरोप देखील पिडीत कुटुंबीयांनी केला आहे. अशा परिस्थितीमध्ये तपास अधिकारी रत्नपारखी हे ज्योती गायके खून प्रकरणातील आरोपींना अटक करुन न्याय देऊ शकत नाही. त्यांचा तपास हा अपयशी ठरला असून, हे प्रकरण दडपण्यासाठी दिरंगाई होत असल्याने सदर तपास पाथर्डी पोलिसांकडून तात्काळ काढून सीआयडी कडे देण्याची मागणी गायके कुटुंबीयांनी केली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंचायतराजचे पावित्र्य जपण्यासाठी व मतदारांना जागरूक करण्यासाठी
रविवारी पंचायतराज मतकोंबाड सत्यबोधी सुर्यनाम्याचे आयोजन
मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा पुढाकार
वेब टीम नगर : महाराष्ट्रासह जिल्ह्यात ग्रामपंचायतची रणधुमाळी सुरु झाली असताना, पंचायतराजचे पावित्र्य जपण्यासाठी व मतदारांना जागृक करण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने पंचायतराज मतकोंबाड सत्यबोधी सुर्यनामा केला जाणार आहे. रविवार दि.२० डिसेंबर रोजी हुतात्मा स्मारक येथे सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सुर्यनामा केला जाणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यातील हजारो ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे. यामध्ये सत्ता मिळवण्यासाठी पैसा, दारु व जातीचा वापर होणार आहे. स्वातंत्र्यानंतर लोकशाहीला लागलेला हा कॅन्सर असून, या प्रवृत्तीमुळे गावांचा विकास झालेला नाही. राळेगणसिध्दी, हिवरेबाजार अशा मोजके गाव सोडले तर चुकीच्या राजकीय प्रवृत्तीमुळे अनेक गावांच्या विकासाचा बट्टयाबोळ झाला आहे. पैसा, दारु व जातीचा वापर करुन उमेदवार निवडून येतात व विकासाच्या निधीवर डल्ला मारतात.
मतकोंबाड सत्यबोधी सुर्यनामाच्या माध्यमातून नागरिकांना जागृक करण्याचे काम केले जाणार असून, योग्य उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. मतंकोंबाड, मतंकुभकर्ण व जातमंडूक मतदार ओळखा व सर्वांना कळवण्याची घोषणा केली जाणार आहे. कॉन्टम फिजिक्स ऑब्झर्वर इफेक्टने सिध्द झाले आहे की, चुकीच्या प्रवृत्तीकडे लक्ष ठेवल्यास त्यांच्यात सकारात्मक बदल घडतो. समाजविघातक कृती करणार्यांकडे लक्ष दिल्यास बदनामी होण्याच्या भितीने चुकीच्या गोष्टी करण्यापासून ते परावृत्त होत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या जनजागृती मोहिमेसाठी अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, जालिंदर बोरुडे, अशोक भोसले, सखुबाई बोरगे, प्रमिला घागरे, सुरेखा आठरे, बाबासाहेब सरोदे, पोपट भोसले आदि संघटनेचे पदाधिकारी आग्रही आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वाचन संस्कृतीला बळ देण्याची गरज
पै. नाना डोंगरे : निमगाव वाघा येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास पुस्तकांची भेट
वेब टीम नगर : ग्रामीण भागातील विद्यार्थी व युवक-युवतींमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी व स्पर्धा परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध होण्याकरिता निमगाव वाघा (ता. नगर) येथे धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय सुरु करण्यात आले आहे. या वाचनालयास साहित्यिक मिराबक्ष खुदाबक्ष शेख (बागवान) (रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) यांनी पुस्तकांची भेट दिली. या पुस्तकांचा स्विकार वाचनालयाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी स्विकार केला.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, स्मार्ट फोन हातात आल्याने ज्ञानार्जन करणारे विद्यार्थी वाचनापासून दुरावत आहे. वाचनाने उद्याच्या पिढीचे उज्वल भवितव्य घडणार आहे. या भावनेने गावात वाचनालय सुरु करण्यात आले असून, वाचन संस्कृतीला बळ देण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी गावात वाचनालय सुरु करुन विद्यार्थ्यांसह युवक-युवतींना भविष्य घडविण्यासाठी एकप्रकारे दिशा देण्याचे कार्य केले आहे. वाचनाने विचार समृध्द होत असतात व जीवनाला एक वेगळी दिशा मिळत असते. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सुरु असलेल्या या चळवळीत पुस्तकांची भेट देऊन खारीचा वाटा उचलला असल्याचे साहित्यिक मिराबक्ष खुदाबक्ष शेख (बागवान) यांनी सांगितले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नगर तालुक्यात युवक काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसाठी मोर्चेबांधणी
कार्यकारिणी गठित करण्याच्या जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले यांच्या सूचना
वेब टीम नगर : नगर तालुक्यात युवक काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसाठी पक्षाच्यावतीने मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा बिगुल वाजला असताना त्याचवेळी तालुक्यात युवक काँग्रेसने संघटनात्मक बांधणीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे. युवक जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले यांनी लवकरात लवकर तालुका कार्यकारिणी गठित करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिल्या आहेत.
नगर तालुका युवक काँग्रेस आणि एनएसयुआयची संघटनात्मक आढावा बैठक उगले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. काँग्रेसचे नगर शहर जिल्हाध्यक्ष तथा एनएसयुआय, युवकचे जिल्हा समन्वयक किरण काळे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी युवक काँग्रेसने तालुकाध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, एनएसयूआयचे सुजित जगताप, शहर क्रीडा काँग्रेसचे प्रवीणभैय्या गीते, प्रमोद अबुज, अमित भांड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उगले म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून काँग्रेसचे मोठे वजन आहे. ना. बाळासाहेब थोरात, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीतदादा तांबे यांच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी युवक काँग्रेस काम करेल.
शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, नगर तालुक्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव म्हस्के, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस संघटनेची बांधणी उत्तम प्रकारे सुरू आहे. युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, दक्षिण कार्याध्यक्ष राहुल उगले, उत्तर कार्याध्यक्ष सुभाष सांगळे अशी नव्या दमाची टीम युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काम करत आहे
युवक तालुकाध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, सुजित जगताप आदींची यावेळी भाषणे झाली. जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उगले यांचा हा पहिलाच दौरा असल्यामुळे निवडीबद्दल किरण काळे यांच्या हस्ते उगले यांचा बैठकीत सत्कार करण्यात आला. यावेळी नगर तालुक्यातील विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लवकरच एनएसयूआयच्या तालुकाध्यक्ष पदाची निवड करणार - काळे
यावेळी किरण काळे म्हणाले की, नगर तालुका एनएसयूआयच्या तालुकाध्यक्ष पदाचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. ना.बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि संपतराव म्हस्के, प्रताप पाटील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत काही नावांवर चर्चा सुरू आहे. अध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच आहे. लवकरच त्या बाबतीतला निर्णय घेतला जाणार असून नगर तालुक्यातील विद्यार्थी संघटन मजबूत केले जाणार आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 Comments